गोष्टी बदलतात अगदी पुढल्या क्षणात!

ज्या गोष्टी आपण गृहीत धरून चालतो…

गोष्टी बदलतात अगदी पुढल्या क्षणात!

ज्या ज्या क्षणी वाटतं की ह्या गोष्टी चालतील अगदी मनाला वाटेल तितका वेळ. त्या त्या क्षणाला एक गोष्ट मनात पक्की करून ठेवायची, काहीही शाश्वत राहत नाही. सगळं क्षणभंगुर असतं. कारण जेव्हा गृहीत धरलेल्या गोष्टींना वाटा मिळू लागतात, त्या निघून जातात. त्या क्षणभरही थांबत नाहीत. त्यांना मुळातच याची जाणीव करून द्यायची असते की मनातला भ्रम टाळा, तो भ्रम जो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अयोग्य आहे.

आपण कधीच एका गोष्टीवर अवलंबून राहू नये. त्याचा परिणाम हा आपल्याच यशाच्या मार्गात अडथळा आणून ठेवतो. ज्याचा भाग म्हणून मन इतकं बेचैन होतं आणि नको नको ते विचार आणून पुढ्यात मांडत सुटतं. ज्याचा कशाशीही काडीमात्र संबंध नाही, पण काय करणार? आपल्या हातात सगळ्या गोष्टी नसतात असं सांगितलं जातं ना! जे पूर्णतः बरोबर नाही, असं मला तरी वाटतं.

एकतर आपण ती गोष्ट करू शकतो किंवा मग नाही करू शकत. तो जो मध्य साधण्याचा प्रयत्न असतो, तोच खरा निष्कर्ष काढतो. कारण गोष्टी जेव्हा आपल्या हातात असतात तेव्हा आपण त्या सांभाळत नाही आणि मग त्याला आपण नंतर पश्चातापात बघतो. जे चूक नाही म्हणा, पण त्या झालेल्या गोष्टींमागे रडत बसणं हा मात्र गुन्हा आहे.

कधी-कधी कळत नकळत आपण कोणाचं तरी मन दुखावतो. ते करायचं नसेलही पण ते होतं. ते होणं गरजेचं ही असतं म्हणा. आयुष्यातल्या शाळेत सगळंच सहज शिकायला मिळतं असं नाही. त्या त्या गोष्टी शिकण्यासाठी त्या त्या वेळेतून, घटनेतून, भावनेतून जावं लागतं. आणि तेव्हाच त्या सगळ्या गोष्टींची जाण होते. ज्या आपण केल्या आहेत, ज्या आपल्या हातून झाल्या आहेत आणि मग तिथून पुढे आयुष्यात काय करायचं राहून गेलं, काय झालंय आतापर्यंत याची आठवण होते.

ती आठवण पणाला लागली की आपण तयार होऊ लागतो. अर्थात स्वतःमध्ये बदल घडवण्याऐवजी आपण चुकांकडे दुर्लक्ष करतो सहजच. त्याच चुका भविष्यात पुन्हा होतात आणि पुन्हा मग ती वाटचाल सुरूच. जोपर्यंत आपल्याला ती चूक पुन्हा करायची नाही याची खात्री होते तेव्हा बऱ्याचपैकी सगळ्या गोष्टी सुधारता येतात पण जो अहंकार असतो स्वतःप्रती तो मात्र काही केल्या करू देत नाही.

आपल्याला बाकीचे कमी लेखतील ही जी वाईट वृत्ती आहे ना तीच सगळ्यात जास्त कारणीभूत आहे या पराभवाला. वेळ कधीच जात नाही कारण ती कधी नष्ट होणारी नसते पण आपण कायम राहत नाही त्यामुळे शरीरात श्वास आहे तोपर्यंत गोष्टी बदलता ही येतात आणि आपल्या बाजूने त्या फिरवता ही येतात.

@UgtWorld



Related Posts