सण साजरे करतात म्हणे…
आजवर सण साजरे केले गेले ते फक्त माणसाच्या स्वार्थासाठी. इतकं सोपं आहे ते ओळखून घेणं. त्याव्यतिरिक्त कारण तरी काय असणार? आणि खरेपणाने साजरा करण्यात येतो सण, हे तरी कित्येक लोकांना ठाऊक आहे. सगळे करतात म्हणून मी पण करणार. त्यांनी असं केलं, मी या पेक्षा काहीतरी नवीन सुचवून आणखी काही वेगळं करून दाखवणार आणि माझ्या येणाऱ्या पिढीला सुद्धा खोट्या-नाट्या संस्कृतीशी सलगी करून देणार.
कसली आली आहे संस्कृती नी कसल्या परंपरा. त्या परंपरा सगळ्या बोगसच आहेत जिथे माणुसकीचा खून केला जातो. सणाच्या नावाखाली कित्येक रुढी लागू करता. त्या मागचं कारण अद्याप माहित नाही. का देईल कारण कोण? यावर तर पोटपूजा चालते ना बहुतेक लोकांची. मग आपल्या हातची थाळी जाऊच कशी देऊ शकतं कोणी. त्यात कोणी वाचा फोडली तर त्याला गजाआड करण्यात कितीसा वेळ लागतो. अगदी शुल्लक आहे हे करणं त्या लोकांसाठी जे डोळे बंद करून सगळ्यांवर विश्वास ठेवतात. सोक्ष मोक्ष न लावता उचलतात जीभ नी टाळ्याला लावतात.
सण साजरा करतात म्हणे. आताच एक सण झाला होळीचा. त्यात लाकूड जाळतात. नारळ वाहून त्यात टाकून देतात. त्या अग्निला नमस्कार करून बरच काही मागतात. पण कोणी एक तरी व्यक्ती असतो का जो स्वतःचा राग, क्लेश, लोभ, मोह, तृष्णा त्यात जाळतो. नाही करत असं कोणी कारण सगळे आपला स्वार्थ बघण्यात मग्न असतात. मला कसं काही जास्त मिळवता येईल आणि कसं कोणाला तरी नीचा दाखवता येईल. बघ माझ्याकडे इतकं आहे तू असं करूच शकत नाहीस. म्हणजे स्वतः लालची व्हायचं आणि दुसऱ्यांना सुध्दा भाग पडायचं तसं बनायला.
आणखी एक सण येतो दसऱ्याचा त्यातही तेच रावण दहन करतात म्हणे. त्याला दहन फक्त आपली नाचक्की लपविण्यासाठी करतात. कारण तितकी क्षमता नाही ना कोणामध्ये. त्यात का नाही तुम्ही घाणेरडी वृत्ती दहन करत. समोरच्याचे वाईट होईल असे येणारे विचार का नाही जाळून टाकत त्यात. नाही ना होणार तसं. कारण मनच भरत नाही लालसेने, संपतच नाही मनातली मागणी. हवंच आहे, हाव काही संपत नाही.
असे कित्येक सण येतात ज्यात लोक जमा होतात, कशासाठी तर मद्य प्यायला. ज्या मूर्तीला तुम्ही पुजता त्याच मूर्तीच्या नावाखाली कित्येक कुरघोडी करतात. चोऱ्या करतात, एकमेकांना भुरळ पाडून एकमेकांनाच लुटतात. तेव्हा नाही माणुसकी आठवत, तेव्हा फक्त सण आहे यात एवढं चालतं. असंच चालतं चालतंं करून कित्येक लोकांचे घात केलेत.
निष्कर्ष इतकाच की फक्त स्वार्थ आणि स्वार्थ साधून घेण्यासाठी सण साजरे करतात आणि ते ही त्यामागचं मुख्य कारण स्वतः पासून अजाण ठेवून. त्यात बदल येण्याला एक अख्खी नवी पिढी जन्माला घालावी लागेल, ते ही खरं आणि रीतसर ज्ञान देऊन. जे सत्य आहे तेच सत्य आहे. खोटं सत्य बनून फक्त काही काळ राहतं. जास्त वेळ ते कधीच राहू शकत नाही.