थोडक्यात काय! शिक्षण

हे शिक्षण गरजेचं आहेच आजच्या घडीला…

थोडक्यात काय! शिक्षण
थोडक्यात काय! शिक्षण

खरं तर विषय साधा आणि सोपा आहे. पण गोष्ट अशी आहे कि लोकांना आजच्या घडीला सुद्धा मोकळेपणाने बोलता येत नाही. त्याची बरीच उदाहरणं आहेत. जसं की, मासिक पाळी, स्वप्नदोष, आणि लैंगिक गोष्टींबद्दलच ज्ञान आणि त्यावर मिळणारं अपुरं शिक्षण. ह्या प्रमुख गोष्टी आहेत ज्यावर जरा लक्ष द्यायला हवंय. आजही आपल्या घरात आपण ह्या गोष्टींविषयी बोलायला जावं तर अडचण येते. त्यावर आपण मोकळेपणाने बोलू किंवा मत देऊ शकत नाही. मला हे ही माहित आहे काही घरांमध्ये ह्याला मुभा आहे कारण ते समाजापेक्षा नात्याला महत्व देतात.

असलं शिक्षण फक्त सायन्सवाल्यांना दिलं जातं आम्हाला हे बोलायला लाज वाटते. पण मग असं असेल तर सगळ्यांना शिकवायला हवंय आणि हे फार गरजेचं आहे. पण का? विचार केला का कधी या गोष्टीचा. आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेणं म्हणजे निरोगी राहणं असलं तरी शरीराला काही खाजगी अवयव सुद्धा असतात ज्यांची आपण अजिबात काळजी घेत नाही. ती घेणं फार गरजेचं असतं. मुलगी असो वा मुलगा असो, त्यांना ते अवयव साफ सुधरे ठेवता आलेच पाहिजेत. आणि त्यावर बोलताना लाज नाही वाटली तर त्याहून उत्तम.

जगात बऱ्याच ठिकाणी लैंगिक शिक्षण सुरु आहे, भारतात देखील आहे. पण आपल्याकडे निरोध म्हटलं तर लोकांचे हावभाव असे बदलतात जसं कि कोणता गुन्हा केलाय. तसंच जर मुलींचे मासिक पाळीला लागणारे पॅड आणायला गेलात किंवा त्याबद्दल काही बोललात तरीही तशीच प्रक्रिया असते. कधी स्वप्नदोष झाला तर त्यात इतकं अवघडल्यासारखं होत की त्यावेळी शब्दांना जागाच नसते. ते एक विचित्रच समीकरण असतं. पण त्यावर एक सामान्य भाव देऊन का सोडू शकत नाहीत.

थोडक्यात काय! शिक्षण
थोडक्यात काय! शिक्षण

मुळात ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत आणि त्याला जर आपण आताच्या घडीला उपाय म्हणून वापरतो. तर मग लपून छपून का बोलावं किंवा ते बोलणं पाप असल्यासारखं भासवून का द्यावं! मी असं नाही म्हणत कि जगाला सांगत सुटा वगैरे, मला माहित आहे बऱ्याच जणांच्या मनात असं आलंच असावं. पण किमान त्या आपल्या घरच्यांशी किंवा आपल्या जवळच्या लोकांशी बोलताना त्याची लाज तरी वाटली नाही पाहिजे.

आजकाल या अपुऱ्या लैंगिक शिक्षणामुळे कित्येक जीव जगात येण्याआधीच मारले जातात. का तर त्यांनी शारीरिक सबंध ठेवताना योग्य ती काळजी नाही घेतली म्हणून. कधी गोळ्या तर कधी नको नको त्या गोष्टी. मला मान्य आहे बरेच जण दुखावले जात असतील त्या क्षणाला पण काय करणार! चुकीला दुरुस्त करायचं असतं, पुढचं आयुष्य जगायचं असतं. वाटेत आलेल्या गोष्टींना बाजूला सारत पुढे जायचं असतं. हेच तर असतं ना! योग्य आणि अपूर्ण ज्ञान ह्यामधला फरक कारणीभूत ठरतो सगळ्या गोष्टींना.

वस्तुस्थितीला आणि गोष्टींना जितक्या लवकर आहेत तश्या मान्य केल्या तर खूप सोपं जातं आयुष्य जगायला. मुद्दा साधाच आहे पण तो मांडताना विचार मध्ये येतातच नाही का!

@UgtWorld

Related Posts