शोध आता अनामिक कहाणीतल्या खरेपणाचा!
मिळालेल्या अनामिक पत्त्यावर पोहचताच तो कॉल लावायचा प्रयत्न करतो, पण पुन्हा स्विच ऑफ. तो जस जसं पुढे जातो त्याला कळतं की, आपण इथे या अगोदरही आलो होतो. तो एका किल्ल्याचा प्रवेशद्वार होता. त्या वेळी त्या परिस्थितीच्या भीतीने तो विसरूनच जातो की ही जागा त्याने पहिली आहे. तो तिला शोधत शोधत पुढे पाऊले टाकत आत जातो. मागून कसला तरी आवाज येतो तो वळून बघतो तिथे कोणी नसतं. तो पुढे बघायला वळतो तितक्यात त्याला काही जण पकडतात. तोंडावर मास्क असल्यामुळे त्याला त्यांचा चेहरा दिसत नाही. ते त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधतात आणि त्याचे हाथ ते त्याच्याच रुमालाने बांधतात.
“काय हवंय तुम्हाला? कुठेय जागृती?” “जास्त आवाज नाही करायचा नाहीतर बंदुकीतल्या सर्वच गोळ्या घालेन. गप्प उभा रहा” डोळे बंद, पाठीवर बंदुकीची नोक, त्याच्या हृदयाची नूसती धाकधूक सुरु होती. त्याला त्यांनी किल्ल्यातल्या एका अंधाऱ्या ठिकाणी आणून सोडलं. घामाच्या रेघा चेहऱ्यावरून अश्या येत होत्या, जणू काही पावसाच्या सरी बेभान होऊन कोसळत आहेत. त्याच्या डोळ्यांची पट्टी काढून त्याचे हाथ खोलून त्याला हलकासा धक्का देत ते तिथून निघून जातात. तो स्वतःला सावरत उठतो. इकडे तिकडे बघू लागतो पण सगळीकडे एकदम अंधारच, धूसर सूर्यप्रकाश त्या ठिकाणी असेल तितकाच काय तो उजेड तिथे. पण त्या हलक्या प्रकाशाला मार्ग देणारा तो दरवाजा आणि त्याच्या आकारातूनच बाहेरचा परिसर स्पष्ट दिसत होता. तो मोबाइल काढायला जातो तर कळतं त्यांनी मोबाइल सुद्धा काढून घेतला आहे, कसबस करून तो त्या दरवाज्याकडे पोहचतो.
बाहेर येताच डोळ्यावर येणारं तीव्र ऊन अंगाची आग करत होतं. त्या तापत्या उन्हात तो तिला शोधत असतो. शेवटी थकून तो त्याच जागी बसतो. खांद्यावर कुणाच्या तरी हाताचा स्पर्श झालाय असं जाणवताच पटकन वळून बघतो, पण हा त्याचा भास असावा असं समजून तो अधिकच हैराण होतो. कारण तिथे कुणीच नसतं. तो त्याचा शोध पुन्हा चालू करतो. फिरून फिरून तो त्याच जागी येतो ज्या अंधाऱ्या जागेतून तो बाहेर आलेला.
अचानक त्याला त्या अंधारातून आवाज येतो “पंकज!” तो त्या आवाजाच्या दिशेने पुन्हा त्याच ठिकाणी धावत सुटतो. त्या ठिकाणी पोहचताच त्या अंधुक प्रकाशात तिला शोधायचा अतोनात प्रयत्न करतो. पण पुन्हा तेच काहीच मिळत नाही आणि ती ही भेटत नाही. ज्या दरवाज्यातून तो आलेला असतो त्याच्या समोरच्याच दरवाज्याकडे तो जाऊ लागतो. आजूबाजूला कुणीतरी आहे असं त्याला जाणवतं, आणि तो पुढे येणार तितक्यात एक आवाज होतो “फटाक” जस काही कोणी गोळीच चालवली आहे अश्याच प्रकारचा. तो अजून काळजीत पडतो. काही झालं तर नसेल ना तिला? आणि मान खाली घालून आपल्या गुडघ्यावर बसतो आणि रडायला लागतो.
तितक्यात “पंकज डोळे उघड, मी आहे बघ जागृती” तो डोळे उघडून बघतो ती खरंच त्याच्यासमोर उभी असते. तो तिला विचारपूस करायला सुरु करतो, इतका घाबरलेला असल्यामुळे तो काय बोलतोय त्याचं त्यालाच कळत नव्हतं. त्याला इतकं बेचैन झालेलं पाहून तिच्या डोळ्यात देखील पाणी येतं. ती त्याचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत घेते “पंकज, पंकज शांत हो! शांत हो आधी!” आणि पुढल्याच क्षणी त्याला घट्ट मिठी मारते” हे बघ मला काहीही झालेलं नाहीये, आय एम सॉरी. मला माफ कर” तितक्यात त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या पडतात. सगळीकडून “पंकज जागृती, पंकज जागृती” असं दोघांच्या नावाचा आगाज सुरू होतो.
जे मित्र सकाळी कॉल घायला टाळत होते आणि कारणं देत होते तेच याचे काही प्रमाणात सूत्रधार होते. त्या वेळी त्याला तसं पाहून सर्वजण त्याला सॉरी म्हणतात. ती त्याचा हात आपल्या हातात धरून तिच्या गुडघ्यावर बसून एक छानशी रिंग पुढे करून त्याला विचारते “पंकज, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. लग्न करशील माझ्याशी ?” हे सर्व असं होईल ह्याची त्याला कल्पनाच नव्हती. अखेरीस जरासा शांत होऊन, एक गोड स्मित हास्य देत. तो तिला आपल्याजवळ घेतो आणि म्हणतो “हो !!करेन ना ” असं म्हणून तो तिला मिठीत घेतो. सर्व मित्रमैत्रिणी त्यांच्यासाठी त्यांच्या नावाचा गजर पुन्हा सुरु करतात.
जाता जाता त्याला ती हळू आवाजात सांगते “मी जरी आता प्रपोज केलं असलं तरी मला मिळवणं तितकसं सोपं नव्हतं ना! की होतं?” “हो ! सोपं तर नव्हतंच, पण तुला मिळवण्यासाठी तू जी माझी फिरकी घेतलीस ना त्यातच कळलं मला सगळं, की माझ्यासाठी तू किती महत्त्वाची आहेस”…