हिल स्टेशनवर झालेल्या अनपेक्षित घडामोडी!
जेव्हा जेव्हा गोष्टी अनपेक्षित रित्या घडत जातात. एक तर त्या अविस्मरणीय बनून जातात किंवा मग पश्चात्ताप म्हणून जवळ राहतात. इथे दोन्ही गोष्टी झाल्या होत्या. खूप काही सांभाळून देखील काही ना काही होणारच ह्याची जेव्हा आपल्याला शाश्वती असते. तेव्हा आपल्याला अंदाज येतो कि एकतर ट्रिप खूप जास्त छान होणार किंवा मग अजिबात आपल्या मनासारखी होणार नाही.
आपल्याला जर चांगला वेळ मिळवायचा असेल तर वाईट वेळेला आधी सामोरं जावं लागतंच. आमचही काही तसंच झालं पण तितकसं ते वाईट वाटलं नाही कारण आम्ही त्या गोष्टी साठी आधीपासूनच तयार होतो. त्याचा फायदा असा झाला कि जेव्हा आम्ही हिल स्टेशनला पोहचलो तिकडचं वातावरण खूप छान होतं. इतकं छान कि त्या गारव्याला फक्त आपल्या अंगावर घेऊ शकतो. आपण त्यांना शब्दांची झालर नाही देऊ शकत. ह्याला साक्ष म्हणजे आपल्याला माहित असणारी एक गोष्ट म्हणजेच “काही गोष्टी फक्त अनुभवता येतात त्या शब्दात व्यक्त करता येत नाहीत.”
तिथे पोहचल्यानंतरची पहिली मजल ही गाठली कि प्रवासात न थकता आम्ही फिरायला देखील निघालो. अर्थात तिथे पोहचल्या पोहचल्या जेवण पहिलं केलं, कारण ते जास्त गरजेचं होतं. पुढे वाटचाल जशी-जशी सुरु झाली आम्ही त्या अरण्यात शिरू लागलो. त्या रस्त्यावर फक्त आमच्या चालण्याचा आणि आमच्या गप्पांचा आवाज होता. त्या आवाजामागे कित्येक आवाज दाबले गेले असतील असं वाटत होतं. पण असं काहीही झालं नाही त्या क्षणाला त्या जंगलातून येणारा आवाज हा खूप जास्त तीव्र होता. पक्षी, रान-किडे, बारीक प्राणी, हवेच्या प्रवाहाने झाडांचा होणारा आवाज असं सगळं होतं.
त्या अरण्यात खूप बंगलो होते जे कदाचित राहण्यासाठी उचित नव्हते. पण माणसं मात्र बोटावर मोजण्याइतकीच होती. तिथल्या काही घटना असतील म्हणा. पण ते सभोवताल बघून इतकं नक्की जाणवलं कि त्या ठिकाणी न गेलेलंच बरं. विचार भरमसाठ आलेले कि एकदा जाऊन बघू एखादया तरी घरात पण सगळ्या ठिकाणी एकसारखीच अडेबाजी केलेली. कुठे गेटला साखळी ने बांधून ठेवलेलं, तर कुठे काटेरी फांद्या टाकून ठेवलेल्या अगदी आत येण्याच्या ठिकाणीच. ज्यामुळे खरं तर तिथे जाता आलं नाही. हे सगळं बोलणं चुकीचं जरी वाटत असलं तरीही त्या जागेकडे तितकी ताकद होती आम्हाला आकर्षित करून घ्यायला. अगदी आम्हाला प्रवृत्त करण्याइतपत.
रस्ता चुकलो होतो म्हणा आता आम्ही पण शेवट नव्हता त्यामुळे ‘पुढे जाऊ बघू, पुढे जाऊ आपण’ असं करत शेवटाला पोहचलो आणि डेस्टिनेशन सापडलं. त्या डेस्टिनेशन ला पोहचण्याचा जितका आनंद होत नव्हता तितका आमच्याकडून चुकवून घेतलेल्या रस्त्यांवर जास्त हसू येत होतं. मला नक्की नाही माहित ते नेमकं काय होतं त्याक्षणाला पण तो क्षण मनात रुजून गेला. आता मनात प्रश्न असेलच आपसूकच कसे रस्ते चुकतात तर एकदा असा प्रवास करून बघावा. त्यात आम्ही सोबत होतो सगळे अजून काय हवं होतं आम्हांला. एक परफेक्ट ट्रिप हिल स्टेशनला झालेली. हा तर एकच किस्सा होता अजून बरंच काही आहे.