निःशब्द भावनांच्या सोबतीतली सवारी

सवारी- कहाणी एका प्रेमळ सहवासातली

निःशब्द भावनांच्या सोबतीतली सवारी

[1]

हिवाळा म्हटलं की थंडी आणि ती थंडी जर गुलाबी थंडी असेल तर अजूनच धमाल, नाही का! आणि त्याच गुलाबी थंडीत जर एक सवारी असेल, तीही लांब ठिकाणाची, अहा! किती मस्त! खुश तर होणारच ना आपण, अशा हटके वातावरणात सगळ्यात जास्त मजा करतो म्हटल्यावर. सगळ्यात जास्त फिरतो आणि सेलिब्रेशन तर त्याहूनही जास्त असतं. सोबत मित्रमैत्रिणी तर कधी आपली फेवरेट फॅमिली असते. सोबत छान असेल तर आपला वेळ किती चांगला जातो. त्यासोबतीलाच आठवणींच गाठोडं भरून जातं.

एक अशीच गुलाबी थंडीतली सवारी म्हणजेच एक आवडीची पिकनिक जी कायम लक्षात राहू शकते, त्या सर्व लोकांमुळे नाही तर सोबतीला असणाऱ्यांपैकी एक व्यक्ती त्यासाठी पुरून उरते. ती व्यक्तीच खूप असे क्षण देऊन जाते की आपल्याला सावरायला कठीण होतं. कायम लक्षात राहतील असे मनाला झालेले स्पर्श आणि हृदयाला भेटलेली संगीताची मैफिल. एका सवारीमध्ये बाजूला जर आपली जवळची, खूपच जवळची कोणी असेल तर आपण काय करू आणि काय नको असं होतं.

आपलं वागणं जणू नवजात बालकासारखं होऊन जातं, सुरुवातीला पहिल्यांदा भेटल्यासारखं वागू लागतो. एकदा का तो सूर गवसला ओळखीचा की मग काय बघायलाच नको. मस्ती सुरू होते, प्रेमाची छेडछाड होते, कुणी आपल्याला पाहत तर नाहीये ना याची दखल घेतली जाते. असायला कितीही काहीही असलं ना तरी त्यावेळी फक्त दोन जीव असतात जे आपल्या सहवासात इतके गुंग असतात की त्यांना सभोवताली काय आहे हे दिसतच नाही, आणि तिथून खरी गंमत सुरू होते.

सुरुवात होते ती नावाने आणि हो, नेहमीच्या नाही हा! आपण ठेवलेल्या नावाने. प्रत्येकाला एक टोपण नाव असतंच ना तसच काहीस आणि त्याच व्यक्तीला ते माहित असतं. बरं, ते फक्त माहित असून चालत नाही, ते कुणाला न कळता कसं आपल्याला चिडवता येईल ह्याची जास्त आणि पुरेपूर काळजी घेतली जाते. पुढे काय मग, शब्दांची छेडखाणी सुरु आणि तीही अशी तशी नाही,एकदम निराळीच जी फक्त त्या दोघातच चालू असते. तिथून पुढे जाता हळू हळू अंगाची मस्ती सुरू झाली.

माझी फेवरेट मस्ती तर गुदगुल्या करण्याची आहे. तीच करताना सगळ्यात जास्त, खूप जास्त मजा येते आणि समोरच्याला त्या पटकन होत असतील तर अजून धमाल. बसल्या जागेवरून चटकन अंग हवेत उडतं, उडतं म्हणजे आपण दचकतो ना तसंच. असंच गुदगुल्या करताना हात पकडला ना तिने यार आणि मग काय, हातांचीच मस्ती सुरू झाली. बोटांची लढाई सुरू होती त्या पोटापर्यंत पोहचायला आणि तिची बोटं माझ्या बोटांना रोखत होती.


[2]

त्या लढाई मध्ये हळूच ती संधीचा फायदा घेत मलाच गुदगुल्या करू लागली. आधी मी गुदगुल्या करत होतो तेव्हा ती रोखत होती, आता ती गुदगुल्या करत होती आणि मी थांबवत होतो. ही मस्ती जेव्हा थांबली तिथून काही शब्द कानी पडले,”तू हवंतर माझा हात पकडून बस पण गुदगुल्या करू नकोस”. ते ऐकल्यावर मग काय, झालं मन शांत त्यावेळी आणि बसलो मग हात धरून तिचा तसंच निवांत. जसं केस गोंजारतो तसं तिचा तो मऊ कापसासारखा असलेला हात मी माझ्या बोटांनी गोंजारत होतो. ही अशी सुंदर गोष्ट फक्त प्रेम मिळत असतानाच घडते. तो क्षण इतका रुजून बसला आहे काळजात की तो स्पर्श अजूनही जाणवतो माझ्या हातावर.

स्पर्शावरून अजून एक आठवलं, जेव्हा तिचा तो हात माझ्या हातात होता, माझं डोकं अगदी अलगदपणे तिच्या खांद्यावर निजलेलं होतं. त्याला हळूच आपल्या मऊ हाताने सावरत थोडं अजून वर केलं. तिच्या हातांची ऊब माझ्या गालाला जाणवली आणि तिच्या गालाला माझ्या कपाळाचा स्पर्श होत होता. त्यामुळे तो क्षण आणि त्यावेळचा तो स्पर्श सुद्धा खूप वेगळा होता. जणू हृदयातलं प्रेम स्पर्शातच उतरलेलं. त्या प्रेमाच्या दुनियेत तितकंच वेळ निजून राहणं होतं बहुतेक, पण तसं झालं नाही. अजूनही बाकी होतं बरंच काही. तो स्पर्श आणि त्यातली प्रेमाची झोप. तिला माझ्या मांडीवर डोकं ठेऊन झोपता आलं नाही. तसं तिने सांगितलं तर होतं पण नकळत तिला ते विस्मरण झालं असावं.

कुणाला आवडणार नाही की, आपल्या प्रेमाला कुरवाळत, त्या प्रिय व्यक्तीला मांडीवर झोपवायला. ते ही तिच्या केसांवर हात फिरवत तिला झोपेतल्या स्वप्नांची मनाजोगती दुनिया मिळवून द्यायला. तिला जरी ते शक्य झालं नसेल तरी ते मला तिने शक्य करून दिलं. कसलाही नकार न देता आपल्या मांडीवर मला अलगदपणे झोपू दिलं, माझ्या केसांवर हात फिरवत माझ्या झोपेची दखल घेत ती बसली होती त्या सवारीमध्ये. तिचा एक हात माझ्या केसांना कुरवाळत असताना दुसरा हात माझ्या पाठीवर होता.

पुन्हा एकदा तशीच जाणीव झाली. तो प्रेमाचा स्पर्श तिच्या हातात होता. त्याची मिळणारी प्रेमळ ऊब जी माझ्या अंगाला त्या गुलाबी थंडीत मिळत होती. माझ्या अंगाचा ती भार तिने सहज झेलून घेतला होता त्या सवारीमध्ये. या पेक्षा अजून काय हवं असणार सहवासात. एका स्वच्छंद प्रेमाला मिळालेला हा सहवास त्याच आयुष्याला आनंदाच्या कुठल्या थराला नेऊन सोडेल याची आपण कधी कल्पना करूच शकत नाही. फक्त त्याचा अनुभव घेऊ शकतो प्रेम करून, आणखी काही नाही.

ही सवारी तिच्या सोबतीची, स्वप्ननगरी पेक्षा कमी नव्हती. अशी सवारी माझी तिची, एका प्रेमळ सहवासातली…

@UgtWorld

Related Posts