अस्तित्वात असलेल्या भावना काल्पनिक नसू शकतात का?

भावनिक मन अस्तित्वात नेहमीच वेगळं असतं…

अस्तित्वातल्या भावना काल्पनिक नसू शकतात का?

अस्तित्वात असणं, समोर असणं, जवळ असणं याने काही साध्य होत नाही कारण त्यात भावना असतीलच असं नाही. अस्तित्वात असलेल्या भावना काल्पनिक नसू शकतात का? त्यासाठी भावनिक मनात काही गोष्टींची जागा लागते. त्यात प्रेम, संवेदनशील क्षण, सोबतीच्या आठवणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना विसरतेची झालर कधीही न लागणं.

त्या गोष्टींत, त्या क्षणात जितक्या सहजतेने हरवता येतं, तितक्या सहजतेने इतर कोणत्या गोष्टींमध्ये मला तरी वाटत नाही कुठे हरवता यावं. कारण त्या मनात येणारा विचार आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे त्याचं चित्रीकरण झालेलं अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसतं.

त्या तिथल्या ठिकाणी आपण हवं ते अस्तित्व तयार करतो आणि मग त्यानुसार त्यात जगायला सुद्धा तयार होतो. तयार होतो म्हणण्यापेक्षा आपण जगून झालेलो असतो म्हणणं योग्य ठरेल. त्यात पुन्हा पुन्हा रमण्याची इच्छा निर्माण होते. अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींपेक्षा जास्त रमणीय आणि आपल्याला हव्या असणाऱ्या एका वेगळ्याच जगात राहण्याची मजा घेत असतो. ज्यात हव्या त्या व्यक्ती असतात, हव्या त्या ठिकाणी जाता येतं, काहीही बनता येतं.

अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींना, व्यक्तींना तिथे हवं त्या अवतारात-रुपात बघता-भेटता येतं. त्यात हरवता येतं, कसलंही बंधन न ठेवता, कोणताही वेळेचा बांध तुटू न देता अगदी सहज त्यावर चालता येतं. मजा तर असतेच त्यात पण एक नाजूक धागा जोडलेला असतो, जो या धावत्या आयुष्याशी जोडला गेलेला असतो आणि तो त्या आवडत्या जगातून आपल्याला ह्या धावत्या, अस्तित्वात असलेल्या आणि कदाचित नावडत्या अशा या जगात आणून ठेवतो.

आपलं पात्र बदलून जातं मग, त्या क्षणांतून दुसऱ्या क्षणातच!

@UgtWorld



Related Posts