अस्थिर प्रश्नांची बोलकी पाऊलवाट…

अडखळलेली पाऊलवाट आणि मनाची चलबिचल

अस्थिर प्रश्नांची बोलकी पाऊलवाट…

मन नाही मानत आहे. कोण जाणे काय झालंय त्याला. सगळ्यांतून नुसती पळवाट शोधत आहे आणि काय करावं हेच कळत नाहीय मला. इतकं सगळं मनात सुरू असताना कोणती पाऊलवाट मोकळी आहे, हे शोधणं हेच मुळात एक कठीण प्रश्न आहे.

त्या प्रश्नांना पाऊलवाट अगदी सहज मिळत जाते पण उत्तरांना मार्ग काही सापडत नाही. जणू त्या उत्तरांच्या पायवाटांवर प्रश्नांचे मोठमोठे दगड पडले आहेत आणि त्या प्रत्येक दगडावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि त्यांचे ओझे आहे, जे झेपणं मुळातच अवघड आहे. त्याने या उत्तरांचा कणाच मोडून टाकलाय, ज्यामुळे उत्तरांना सावरता येणं फार कठीण होत चाललंय.

प्रश्न त्यांचे वजन काही कमी करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. मला तर वाटतं, मोडलेल्या कण्याच्या उत्तरांना घेऊन राहण्यापेक्षा नव्या उत्तरांना जवळ केलेलं फार बरं पडेल. नवीन पाऊलवाट शोधायलाच हवी, त्या प्रश्नांच्या वाटेवरून जाण्याऐवजी कारण आयुष्यात काय एकच वाट नसते.

सोबतीला एखादी जास्तीची वाट असतेच. जरी जुनी वाट सोडायची नाही असं मनात येत असलं तरी ही पुढल्या वाटेवर जाणं हे सोईस्कर असतं. पण जर वाटलंच की जुन्या वाटेवरून जायचंच तर मग एकेक करून त्या प्रश्नांचे दगड बाजूला सारणारे ताकदवान उत्तरं जवळ घेऊन चालायचं. जेणेकरून वेळ सरता सरता आपण ती वाट सर करू आणि निदान सुटकेचा निःश्वास घेता येईल, जरी तो क्षणिक असला तरीही!

याने तुटलेले विचार सावरायला माफक वेळ मिळेल आणि मिळालेल्या त्या विचारांना एक आधार म्हणून जोडविचार म्हणजे इच्छेतून निघालेल्या मार्गावर वाटचाल करणारे विचार देखील येतील. या संगतीतून अनेक प्रश्न सुटतील आणि विचारांना देखील आरामाची सुखद चव घेता येईल. मनाविरुद्ध नाही पण मनाजोगतंही नाही, यामधला तो मध्य साधणं गरजेचं आहे.

अशा अफाट विचारांच्या आणि मनाच्या प्रश्नांच्या विश्वात एक सुटकेचा चहाचा कप जर आपल्याला मिळाला तर फार बरं होईल. आणि त्या चहामध्ये आपली जिद्द, बदल मान्य करण्याची इच्छा आणि आपली मानसिकता असावी, त्यावर दृष्टीकोनाची चव टाकली तर अजून च उत्तम, नाही का?

@UgtWorld

Related Posts