तिच्या आणि त्याच्या शब्दातली मैत्रीण!

मैत्रितली मैत्रीण आणि प्रेमतली मैत्रीण त्यात फरक आहेच…

तिच्या आणि त्याच्या शब्दातली मैत्रीण!

एक मैत्रीण मिळाली नवीन मला. तशी ती जुनीच आहे म्हणा आता नव्या रूपाने मिळाली असं म्हणेन मी. कारण मैत्रीण नुसतीच नावाला असणं आणि मैत्रिणीसारखं वागणं सर्वच नाही ना करत. आपण म्हणतो ना आपल्या मनातल्या गोष्टी सांगून मन हलकं होत असत आणि ते पण आपल्याला वाटलं तरच. खरं तर बोलतोच आपण ते आणि नकळत ते नव्या कुणाकडे तरी निघून जात. आपल्याला थोडंसं अवघडल्यागत होतं. आता याला कळलं मग हा काय विचार करेल आपल्याबद्दल आणि खूप गोष्टी पुन्हा उलगडायला लागतील.

ते सर्व सांगायचं याला, जे मी विसरण्याचा प्रयत्न करत आहे, नाही सांगितलं तर हा काय विचार करेल माझ्याबद्दल त्यालाच माहित. तसं मला माहित आहे कि हा काहीपण विचार नाही करणार, पण तरीही त्याच्यासाठी मी तितकी जुनी म्हणजेच त्याच्या मैत्रीत रुळलेली नाहीये. बराच वेळ झालाय आता तसा आमच्या मैत्रीला आणि तसपण मैत्रीत आपण काळ वेळ मोजायला नकोच कारण चार पाच वर्ष जुनी मैत्री आणि काही दिवसांची मैत्री यात सहसा काही फरक नसतो. त्यातला फरक त्यांच्यातलं नातं सांगू शकतो, ते वागतात कसे यावरून पण सिद्ध होत कि त्यांच्या मैत्रीतली गाठ किती घट्ट आहे. कुठे बोलत होते मोजकच याच्याशी कित्येक दिवस आणि कुठे आता पटपट बोलू लागले. खरतर जरासं बरं वाटलं बोलून, किती दिवस मनात ठेवू कुठेतरी वाट हवी ना माझ्या मनातल्या गोष्टींना ती तिथेच नेमकी येऊन पोहचली.

आणि मला त्यात काही वावगं वाटत नाही. मलाही वाटत काही जण आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष कारण घेऊनच येत असतात. एकतर ते खूप चांगल्या हेतूने किंवा काहीतरी दुसरं मनात ठेवून. खूप क्वचित मुलं असतील जे मित्र म्हणून शेवट पर्यंत राहतात. असं नाही कि त्यांचं आपल्यावर प्रेम झालेलं नसतं पण ते होऊन हि जेव्हा त्यांना मैत्रीची आणि प्रेमातली गल्लत कळते त्यावेळी ते स्वतःला अगदी उत्तम पणे सांभाळून घेतात. आणि जर नाहीच जमलं सांभाळायला तर मग मित्र असतातच पण खरं सांगायचं तर या गोष्टी मित्रांकडे कमी मैत्रिणींकडे जास्त बोलल्या जातात. कारण एका मुलीच मन एक मुलगीच ओळखू शकते मग त्याला आपण कितीही चुकीचं म्हटलं तरी.

मुलांना वाटतच असतं कि एक दोन मैत्रिणी असाव्यात आपल्याला सांभाळणाऱ्या म्हणजे मनाला थोडासा आधार म्हणून आणि काही जण या बाबतीत खूप लकी असतात. त्यांना भेटतात सुद्धा त्या जीव लावणाऱ्या. काही तर म्हणतात कि, मैत्रीण कशी जास्त रुसत नाही आपल्याला समजून घेते चुकल तर मार्ग दाखवते. जास्त जबाबदारी नसते मनावर कसलीच आणि कुठली भीती सुद्धा नसते. जरी आपली फॅमिली असली आणि ती आपल्याशी कितीही जवळ असली तरी सगळ्याच गोष्टी त्यांना सांगू शकत नाही. आयुष्यात अश्या काही जागा असतात ज्या आपल्या परिवारासाठी आणि आपल्या मित्रमैत्रिणींसाठी असतात.

त्यांची गफलत नाही केलेलीच चांगली, मला नाहीच आवडत ती. प्रत्येकाचं मन वेगवेगळा विचार करतं असतं. त्यानुसार प्रत्येक मुलगी वेगळी असते तीच मन तिची वागणूक तिची मैत्री करण्याची पद्धत हे सर्वच निराळं असत. माझी पण पद्धत वेगळीच आहे माझे पण मोजकेच मित्र मैत्रिणी आहेत जे सर्वांचेच खास असतात आणि जवळचे असतात. मुलींचं जग वेगळं असतं मुलांपेक्षा, थोडंसं का असेना ते वेगळंच असतं. आमची शेअरिंग करण्याची पद्धत आणि प्रेम करण्याची सुद्धा नेहमीच वेगळी राहील कदाचित. माणूस नेहमीच वाईट नसू शकतो त्याला त्या परिस्थितीमुळे वाईट व्हावं लागतं हे आपण सर्वच ओळखतो.

त्यानुसार आपण काही नाती तोडून टाकतो मग ती कितीही मनाजवळ घर करून बसलेली असतील तरी. खरं सांगते हे करताना कुणालाच आवडत नसतं. पण ते करायला भाग पाडतात आणि मग आपण नाईलाजाने ते करतो. मनावर दगड ठेवून ते इतक्या वर्षाच किंवा खूप प्रेमाने भरलेलं नातं सोडून देतो. आपल्या जगातून त्या व्यक्तीला कायमच विसरून जायला लागतो. आता साहजिकच आहे तसं लगेच होत नाही पण त्यावाचून काही पर्याय नसतो. कुठल्याच मुलीला तिची नाती तोडायला आवडत नाही आणि मुलांनाही आवडत नसावी पण एकदा का मर्यादा संपली कि तसं करणं सोयीचं ठरतं. उगाच आपणच त्या नात्याचं ओझं का वाहायचं आपल्या अंगावर, नाही का?

तिचं मन तिने मांडलं आणि ते नितळ पाण्यासारखं आहे. ह्या मैत्रिणीला जाणताना थोडी उत्सुकता आहे कारण नव्या गोष्टींची आतुरता सर्वानाच असते. काही जणांना तर खूप आवड असते. एखाद्या नव्या व्यक्तीला जाणून घ्यायचं म्हटलं का उत्साह असतोच. कळत नकळत त्यात मीही मोडतो. तसही कुणाला नुसतंच सांगण्यापेक्षा समोरच्याच ऐकलं कि समोरच्याला आपण हव-हवंस वाटतो. त्याला आपल्याबद्दल सहानुभूती वाटू लागते, आपल्यावरचा विश्वास वाढतो. हळूहळू त्याचं गुपित आपल्याकडे येऊ लागतं आणि कालांतराने आपणच ती व्यक्ती होऊन जातो जिथे सर्व गुपित आणि मनातले भाव दडलेले असतात. आणि ह्याच गोष्टीचा समोरच्याला हेवा वाटतो.

मैत्रिणी असतातच अश्या त्यांच्याशी आपण भांडतो, मस्ती करतो, त्यांना खूप काही बोलून जातो पण तरीही त्या समजून घेतात आणि हो प्रेम सुद्धा करतो. त्या प्रेमाचं वेगळेपण असं कि ते मैत्रीसाठीच असतं, त्यात अपवाद म्हणून काही जण आपल्या इतक्या जवळ येतात कि मैत्रीचं रूपांतर प्रेमातच होतं. सगळेच म्हणतात मैत्रिणीपेक्षा सुंदर जोडीदार नाही पण ती कुणी एकच असावी. कारण आयुष्यात मैत्रिणी अनेक असतील पण त्यातून काही मैत्रिणी या खूप खास असतील तर काही मैत्रिणीनंपैकी एक जण आपली प्रेयसी बनून जाईल.

एक गोष्ट कधीच एकत्र होणार नाही ती म्हणजे प्रेयसी आणि मैत्रिणीची एकी. आणि होऊ पण नये कारण दोघांचं अस्तित्व वेगळं आहे त्यांचं राहणीमान वेगळं असत. मुळात माणसाला सगळ्यात जास्त गरजेचं असत ते प्रेम आणि हेच दोघांचं निराळं आहे. आणि वेगळेपण हे त्यांना त्यांच्या वागणुकीतून मिळतं. ते वेगळेपण नेहमीच राहील कारण मैत्रीण ही मैत्रीची एक अमूल्य गोष्ट आहे, ती आपण नाकारू शकत नाही. दाद तेव्हाच मिळते जेव्हा एका मैत्रीत तितकंच वेगळं प्रेम असतं जितकं ते स्वच्छंद असतं आणि जे त्या दोघांना सोडून कुणालाच समजत नसतं.

@UgtWorld



Related Posts