तिच्या शृंगारतली तिची बोलकी झलक…
अहा! काय ते दिसणं होतं, किती छान पेहराव होता तो! जेव्हा एखादी तरुण मुलगी साडी नेसते तेव्हा तिचं रूप जणू अजूनच निखरतं, दिसण्याची अदाच बदलून जाते. किती तरी शब्द येतात ओठांवर वर्णन करायला, पण नेमकी सुरुवात कुठून करावी हा प्रश्न असतो. त्यादिवशी तिची झलक बघून हे असंच झालेलं.
सिरियसली, काय दिसत होती यार ती! ते आजकाल म्हणतात तसं अगदी ‘लट्टू झालो मी तर’ तिच्या लुक वरच. इतक्या लोकांमध्ये सुद्धा माझं लक्ष फक्त तिच्याकडे होतं, फक्त तिलाच न्याहाळत होतो आणि शोधत सुद्धा होतो. शोधणं स्वाभाविक होतं म्हणा, कारण तिची माझी नजरेची भेट पहिल्या क्षणीच झाली होती ना, म्हणून तर नजर तिच्याच शोधात होती. सांगायचं राहूनच गेलं की, मी माझ्या खास मैत्रिणीच्या लग्नात आलो होतो. माझी मैत्रीण पण खूप सुंदर दिसत होती आणि तिचं ते सुंदर दिसणं हे तिच्या बाजूला असलेल्या त्या एका व्यक्तीसाठी पुरेसं होतं आणि तो म्हणजे अर्थातच तिचा होणारा जोडीदार. दोघेही एकमेकांसाठी ‘परफेक्ट मॅच’, तसंही त्यांना प्रेमानेच जुळवून दिलं होतं, मग ते तर होणारच होतं, ‘लव्ह मॅरेज जे अरेंज झालं फॅमिली च्या आशिर्वादाने’.
नजरेची फेरी परत चालू झाली, पुन्हा तिला शोधू लागली. तिचं रूप वर्ण-वायचं म्हणजे डोळे आधीच इतके सुरेख, त्यात तिच्या डोळ्यातलं काजळ घातच करत होता माझ्या हृदयावर. केसांची मांडणी एकदम उत्तम पणे केलेली होती. लांब सडक केसांना सहजपणे आंबाड्यात गुंडाळून ठेवले होते आणि त्यांची अजून शोभा वाढवत होते. ओठांवरच्या लाल लिपस्टिक ने ओठांना अजून आकर्षक बनवलं होतं. कानातले ते झुमके लाल आणि सोनेरी रंगात गुंफलेले. त्यात कपाळावरची छोटीशी टिकली त्या गोंडस चेहऱ्याला देखणं बनवत होती. हातातल्या त्या बांगड्या, त्याही सोनेरी रंगाने चमकत होत्या आणि सोबत त्यात जडलेले मोती सुद्धा चमकवत होत्या.
मुळात हे सगळं त्या साडीमुळे, कारण त्या साडीचा रंग तिच्या अंगाने असा काही आपलासा करून घेतला होता की, तिच्या त्या वेगळेपणामुळे हा सर्व साज शृंगार अगदी उठून दिसत होता. ती साडी संपूर्ण लाल रंगाची होती जिचा काठ काळ्या रंगाचा होता. मी तर तिला पाहिल्या क्षणी तिथेच चारोळी सुद्धा रचली. हा आता फक्त मनात ठेवली आणि तिला ऐकवली नाही, ही गोष्ट वेगळी. ती अशी होती की,
“प्रेम रंग लाल असा,
तिच्यामध्ये बरसला,
साडी अशी नेसली तिने,
बेधुंद करून टाकलं मला”
आता असं वाटणं साहजिक आहे मनाला की, एकदाच बघून गेली आणि इतक सगळं कसं लक्षात राहिलं माझ्या? तर महत्वाचं असं आहे की, ती सोबतच होती सुरुवातीला, कारण ते लग्न तिच्या सुद्धा मैत्रिणीच होतं. होय! ज्या मैत्रिणीच्या लग्नात आम्ही आलेलो ती आमची कॉमन मैत्रीण. तीच मैत्रीण आमच्या दोघांची पण खास आहे, फरक इतकाच की ही अगोदर पोहोचली होती तिथे आणि मी जरा उशिरा. आणि पोहोचल्या पोहोचल्या हिलाच भेटलो, तिथे पोहोचता क्षणीच तिने ज्या नजरेने माझ्याकडे पाहिलं, ‘यार मी तर फिदा च झालो’.आधी लट्टू आणि आता फिदा,अर्थ तर एकच म्हणा, तरी अशावेळी एकाच अर्थाचे अनेक शब्द होऊन ओठांवर येतात कारण आपलं तर आधीच भान हरपलेलं असतं. तिने होकारच दिला होता जणू मला नकळत त्या वेळी कसलाच विचार न करता.
“प्रेमाची सुरुवात करणारी ती एक झलकच होती, फक्त तिची एक ‘झलक’ आणि मी तिचा कायमचा होऊन बसलो”