मनातला नको असलेला घातक राग

मनाच्या हसण्यावर राग नेहमी भारी पडतो…

मनातला नको असलेला घातक राग

फक्त दोन अक्षरं आणि एकच शब्द पण त्याची ताकद मात्र भयंकर. सर्व काही एक क्षणात संपवून टाकेल अशी. राग म्हटलं का तिरस्कार जो हिंस्र रूपाने किंवा वाढत्या आवाजाने कुठल्याही गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करवतो. बऱ्याचदा शुल्लक कारणावरून गरज नसताना झालेले संवाद हे वादाला कारणीभूत ठरतात,ज्याचं रूपांतर हळू हळू रागात होतं. एखादी न पटणारी गोष्ट कोणी बळजबरीने लादायचा प्रयत्न करतात त्यावेळी झालेला तो असंतोष असतो आणि नावडीची गोष्ट झाल्यामुळे राग येणं स्वाभाविक आहे.

त्याला प्रकार वैगेरे असं काही नसतं, फक्त तिरस्काराच्या किंवा द्वेषाच्या भावना असतात. सहसा राग चटकन येतो, त्याला साहजीकरित्या माणसाचा स्वभाव कारणीभूत ठरतो. खूप कमी जण असे मिळतात जे स्वतःच्या रागावर संयम ठेऊन असतात आणि ज्यामुळे ते त्या रागाचं निवारण तिथल्या तिथे करू शकतात. ज्यांना कित्येकदा आपण समंजस अस म्हणतो. पण त्यांना ही कला जन्मजात अवगत झालेली नसते. ते ही या रागाच्या समुद्रातूनच गेलेले असतात.

ज्या क्षणी वाटेल वायफळ बोलून वाद होतील किंवा आपली मनस्थिती अस्थव्यस्त होईल, त्यावेळी जर शांत राहता आलं तर झालंच तुमचं काम आणि ते सुद्धा रागावर नियंत्रण ठेऊन. त्यामुळे बाकीचे सुद्धा आपल्याला समजदार म्हणू शकतील. जगात हजारो लाखो ठिकाणी राग नियंत्रण करण्याचे शिक्षण दिले जाते, बरेच जण तिथे जातात सुद्धा. जे जातात ते यशस्वी होतातच असं नाही. कारण प्रत्येकाला सांगणं आणि त्याने ते करणं महत्वाचं असतं.

उगाचच नावाला काही किंवा दिखाव्यापुर्ती करण्याला अर्थ तर उरतच नाही. पण काही जण मात्र होतात यशस्वी! अगदी सहजच नाही पण काही वेळ घेऊन स्वतःला सावरतात. रागाने फक्त नाश होऊ शकतो सहजपणे, त्याची जाणीव मात्र खूप उशीरा होते. नात्यांमध्ये सगळ्यात वाईट गोष्ट होते ती म्हणजे अहंकारामधील राग! काही व्यक्ती तो पाठीपुढे न बघता व्यक्त करून टाकतात तर काही जण तो आपल्यातच ठेऊन विसरून जातात. “या रागाला शक्य तितका आवरावं आणि या आयुष्याला प्रेमळ साथ द्यावी”.

राग असावा, अगदीच नाही असं नाही. पण तो जास्त नको. तेवढयापूर्ती ठीक आहे. योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी त्याचा उपयोग करावा. उठसूट छोट्या छोट्या गोष्टींमुळे रागवत बसू नये. कुणा दुसऱ्याच्या वागण्यामुळे आपण रागावून स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही. कारण समोरची व्यक्ति स्वतःवर त्या रागाने त्रस्त असतेच. त्यामुळे ती आपल्याला सुद्धा नकळत त्रास देते. मनाला आधार मिळावा यासाठी रागाला उलटं करून त्याला ‘गार’ ठेवा, कारण नितळ पाणी नेहमीच सुंदर दिसतं…

@UgtWorld

Related Posts