इम्पॉर्टन्स देताना नक्कीच विचार करा!

इम्पॉर्टन्स, ज्याचा फायदा लोक चांगलाच घेतात…

इम्पॉर्टन्स देताना नक्कीच विचार करा!

आपण कधी विचारतो याची ते वाटच पाहत असतात, जेणेकरून ठरवलेली उत्तरं आपल्या माथी मारून आपल्या बंधनातून त्यांना मुक्त होता यावं. किती विचित्र वाटतं हे ऐकूनच, नाही का! पण कितीही नाकारलं तरी हेच खरं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर सरळ आणि सोपं आहे, जेव्हा कधी आपल्याला एकाच वेळी खूप जणांचे कॉल येतात तेव्हा आपण सगळ्यांनाच पुन्हा कॉल करतोच असं नाही. काही करतही असतील म्हणा,”आम्ही कॉल बॅक करतो हं!” पण सर्वात आधी आपण त्याच नंबर वर कॉल बॅक करतो ज्याला आपण जास्त इम्पॉर्टन्स अर्थातच महत्व देतो, आणि नंतर बाकीचे इतर. कळत नकळत का होईना पण आपण आयुष्यात जी गोष्ट महत्वाची मानतो तीच आधी करतो.

खरंच असं होत असेल का? ह्याच उत्तर मात्र आपल्या सर्वांकडे असतं. काही वेळा ते द्यायला आपण टाळत असतो, कारण जर खरं समोर आलं तर काय होईल आणि काय नाही या विचारांच्या भीती मध्येच आपण गुंतलेले असतो. सर्वच गोष्टी सांगितल्या पाहिजे असं काही गरजेचं नसतं म्हणा, काही गोष्टी या गुलदस्त्यातच राहू द्याव्या आपल्या चांगल्यासाठी. सगळं खरं बाहेर आलेलं सुद्धा घातक ठरू शकतं, त्याला कुठेतरी प्रमाण असलंच पाहिजे. अति सत्य हे प्रत्येकालाच नको असतं, ते सहन व्हायला हवं ना.

उगाच आपलं बोलायचं म्हणून सर्व काही बोलण्यात अर्थ नाही, जेवढं गरजेचं आहे तितकसं गरजेच्या क्षणी बोलता आलं तरी पुरेसं असतं. सगळेच ऐकण्यासाठी उत्सुक नसतात. त्यांना फक्त बोलायला आवडतं आणि ते ज्या व्यक्ती ला महत्व देतात तिथेच जास्त बोलतात आणि तिथेच ऐकून सुद्धा घेतात. ज्या क्षणी असं वाटेल ती व्यक्ती ऐकण्यात उत्सुक नाही त्याक्षणीच ते त्यांच्यासमोर बोलणं कमी करतात आणि योगायोगाने कुणी असं भेटून जातं जे त्यांचं तेच बोलणं मन लावून ऐकतात. आणि मग हळू हळू आधीची व्यक्ती जी असते जवळ म्हणा आपल्या पण तितकीशी महत्वाची किंवा जवळची राहत नाही जितकी अगोदर असते.

मन पण कसं असतं ना, ज्यावेळी आपल्याला वाटतं की कोणी आपल्याला दुखावत आहे हे माहीत असून पण ते खरं आहे की खोटं, याचा आधी विचार करतो. आपला विश्वास नसतो खरंतर त्यावेळी. जसजशा गोष्टी पुढे सरकतात तसतसा आपल्याला जाणीव होते की, ती व्यक्ती आपल्याला दुखावत नाहीये तर आपण स्वतःच स्वतःला दुखवतोय आणि ते म्हणजे त्या व्यक्तीला तितकसं महत्व देऊन, ज्यामुळे त्या व्यक्तीला आपल्याला दुखवायचा हक्कच दिला जातो. हे सर्व आपल्या हातात असतं म्हणा आपण त्या वेळी फक्त नात्याचा सहवास आणि त्यात घालवलेले क्षण पाहत असतो. त्याव्यतिरिक्त आपण काही बघतच नाही. ‘इम्पॉर्टन्स’ जितकं स्वतःला देता यायला हवं, तितकंच दुसऱ्यांना जपून देता यायला हवं.

आता जपून म्हणजे निवडक व्यक्ती असाव्या महत्वाच्या आणि त्याही अगदी सच्च्या, जेणेकरून तुमच्या महत्व दिलेल्या विश्वासाला ते पात्र ठरतील. आणि कुणाला किती महत्व द्यावं हे सर्वस्वी आपल्याजवळ असतं, कुणाच्या सांगण्यावरून आपण ते कधीच करत नाही,कधीच नाही!

@UgtWorld

Related Posts