त्याच भावना, तीच नाती पण सफर नवा!
गोष्टी सुटल्या जात नाहीत, काही राहतात जवळ त्या सतत काहीतरी सांगण्यासाठी किंवा जाणवून देण्यासाठी. काही तर सोडल्या की आपोआप सुटतात. कधी-कधी आयुष्यातील अनेक किंवा किंबहुना काही असे प्रसंग आपल्याला बरच बदलून जातात आणि नव्या जगात आणून सोडतात. ज्याची आपण एकतर फक्त कल्पना करू शकतो किंवा मग त्याचा विचारही कधी मनात आलेला नसतो.
सगळ्यांपासून वेगळं जेव्हा जगावं लागतं ना! त्या क्षणी कित्येकवेळा असं जगणं नकोस वाटतं. कोणी नसतं जवळ दोन गोष्टी मनातल्या बोलायला सुद्धा. पण हेच जगणं हीच एकाकी पुढे जाऊन आपलंस करून घेते. तेव्हा मात्र कोणा दुसऱ्याची खरंच गरज भासत नाही. त्यातूनच एकाची दुसऱ्याला किती गरज असू शकते हे तात्काळ जाणवतं. आणि बहुदा ते ओळखल्यानंतरच पुढची पाऊलवाट ठरवली जाते आयुष्याचा सफर कितपत आणि कसा होणार हे कळतं आपल्याला.
एका छान अशा व्यक्तीने मला सांगितले होत एकदा की, “आपल्याला हवं तर सगळंच असतं, पण नेमकं त्यातलं गरजेचं काय आहे हे आपल्याला कळालं पाहिजे”. आयुष्यातील बरीच गणितं हवं काय आणि गरजेचं काय हे निवडण्यातच चुकतात. त्याच क्षणाला आणि त्यामुळेच सगळा संदर्भ चुकतो, अगदी सगळाच.
खरा सफर तेव्हा सुरु होतो जेव्हा जुन्या गोष्टी ही अनोळखी वाटू लागतात. नवं जग, नवे लोक नव्या गोष्टी आणि आपलं काम जे नेहमीचं असून सुद्धा नवं असल्यासारखं आपल्याला जाणवतं. तसं म्हणायला गेलं तर आपला दृष्टीकोन बदलेला असतो. खऱ्या अर्थाने सांगायचं तर मन थाऱ्यावर नसतं आणि त्याची मनस्थिती देखील. त्याला अफाट कारणं असू शकतात. आणि ती आपण गुलदस्त्यातच ठेवूया मी तर असच म्हणेन कारण भूतकाळात जाऊन जर काही बदलता येत असेल तर ते म्हणजे येणारा भूतकाळ बदलणे.
त्या झालेल्या पाऊलवाटेवर पुन्हा न चालणे हेच योग्य. नाती बदलतात सगळीच, मग ते मित्रमैत्रिणी असलेलं असेल किंवा मग प्रेमाचं फुलपाखरू असलेलं नातं असेल. त्यात भर म्हणजे घरातलंच नातं जेव्हा समजूत दाखवायला कमी पडतं तेव्हा मात्र कहर होतो. पण साहजिक आहे आपण कुणाला दोष देऊ शकत नाही. ज्याच्या त्याच्या आयुष्याला जो तो जबाबदार. समजुतीचा पाया जेव्हा खचला जातो मग ते प्रेमाच्या भानगडीत का असेना किंवा मग एखाद्या विश्वासू नात्यात का असेना वेळ आपल्या विरोधात जाते बहुतेक आणि आपली परीक्षा सुरु होते तीही विना मार्क्स मिळणारी. ज्यात कितीही लिखाण करा तुम्ही नापास होणार हि काळ्या दगडावरची रेघ. कारण समजूनच घ्यायचं नसतं ना, त्यामुळे आपली मात पक्की.
एक आधार असायला हवा स्वतःला, कोणावर अवलंबून न राहता कोणाकडे मला वेळ द्या अशी भीक न मागता. त्याहून महत्वाचे म्हणजे कुणाकडून अपेक्षा बाळगण्याची चूक नकोच करायला. थोडीशी असू शकते पण पुन्हा त्रास त्यापेक्षा नकोच ते. सगळी नाती जमेल तितकी मोकळीक देऊन सांभाळावी, झेपेल इतकीच सहनशक्ती ठेऊन जपावी. कारण एक चूक जरी झाली त्यावर चर्चा होणं तर दूरच तो विषय नाहीच यायला हवा असा करार होतो आणि पुढे जाऊन फक्त तिरस्कार त्यापलीकडे काही नाही.
सगळे म्हणत असतात, ”नवीन व्यक्ती आली की जुन्या व्यक्तीची जागा जाते.” खर तर कोणी कुणाची जागा घेऊच शकत नाही. प्रत्येकाची एक वेगळी सर असते ती दुसऱ्याला येईल असं कस होईल. थोड्याफार गोष्टी नकल करून करताही येतील पण नात्याचा खरेपणा नाही गाठता येत. मनाला दिलासा म्हणून किंवा कृत्रिम भावनांचा आधार घेऊन केला जाणारा प्रयत्न इतकंच साध्य होत. पण ही पाऊलवाट कधी न संपणारी असते. आयुष्य संपेल तेव्हाच काय ती संपेल. कठीण वेळेतून बाहेर निघत असताना नावापुरती ओळख दाखवणारी नाती खूप असतात.
त्यात पण काही इतकी जवळची वाटतात कि, जणू आता हे आपला जीवच ओवाळून टाकतील वाटतं. पण हा सगळा आपला भास असतो. खरतर फक्त आपला रंग दाखवायचा असतो खरा-खोटा जो कोणताही असेल तो. काही दिवसांनी जेव्हा रंग कळू लागतात तेव्हा कळतं ही बोलण्याची पद्धत का बदललीय, हे वागणं असं का सुरु आहे. आपल्या आयुष्यात बरीच जणं अशी असतात जी आपण त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहोत हे दाखवण्यासाठी नको तितकं आणि काय-काय बोलतात.
पण खरेपणात ह्यांनाच आपण नको असतो. कारण त्यांना अचानक एक काळजी वाटू लागते ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील एखाद्या जवळच्या व्यक्तींना हिरसावुन तर नाही ना घेणार. आणि ही बाब आपल्याला आपल्या खाजगी लोकांकडूनच पाहायला मिळते. इंग्लिश मध्ये म्हणतात ना ते ”क्लोज फ्रेंड्स” तसलं काहीसं. मुळात जवळचीच व्यक्ती आपली कुणीतरी हे मात्र नक्की. ही ”पाऊलवाट” हा भावनिक ”सफर” गुंतागुंतीचेच असतात. त्यातला एकतर गुंता सुटतो किंवा मग आपल्याला पुन्हा नवा गुंता सोडवायला मिळतो.