आपलेपण! नक्की हवंय का आपल्याला?

भावनेच्या ओघात चुकतात माणसं, आपल्याला ठाऊक आहे…

आपलेपण! नक्की हवंय का आपल्याला?

का? का पण इतकं वाईट वाटावं आपल्याला. आणि मुळात ज्याच्यामुळे हे सगळं झालंय, त्यांना नेमकं काय सांगणं आहे. म्हणजे असं काय? काय? बोलणार आहेस जेणेकरून समोरच्याचं मन नाराज होणार आहे किंवा मग ते दुखावलं जाणार आहे. तुझ्या मनातून निघून का जात नाही? का अजूनही ते सगळं डोक्यात आहे. आपलेपण! नक्की हवंय का आपल्याला?

काढलं ना मन लिहून मग आता काय बाकी, तू पण समोरच्यासारखं त्यांना जलील करणार आहेस तुझ्या शब्दांनी, तर नको करू रे, सगळ्यांना नाही जमत ते करणं. तुला तर नाहीच जमणार. मान्य आहे, हल्ली खूप जास्त भावनाशून्य झाला आहेस, तरीही नको दुखावू मन समोरच्याचं. त्याने दुखावलं ना! थोडासा दुरावा घे दोघांमध्ये. काही दिवस नको बोलूस त्यांच्याशी. फरक पडेल, नक्कीच पडणार, सवय झाली आहे आणि तुला माहीत आहे तुझी सवय, त्यांना मोडणं अशक्य आहे. जो काही दिलखुलास बोलण्याचा मौका आहे ना! तो त्यांना इतर ठिकाणी अजिबात मिळणार नाही.

होतं रे, चुकतात माणसं त्यांच्या भावनेच्या ओघात आणि बोलताना सर्रास माती खातात. पण आपणही जर त्यांना आरसा दाखवत गेलो ना, तर मात्र गोंधळ होऊ शकतो जो आपल्यासाठी मुळातच चांगला नाही. आपली काळजी घेणं हे आपल्या आवाक्यात असतं. कोणाला आपल्या आयुष्यात किती हक्क द्यायचा याचा अधिकार हा फक्त आणि फक्त आपल्यालाच असतो. त्या अधिकाराचा वापर कितपत योग्य करावा, हे देखील आपल्यालाच बघणं भाग आहे.

मुळात आपण कोणी इतकं वाईट वागू नये. पण जर कोणी आपला वापर करत असेल तर तो थांबवणं फार गरजेच आहे. जर तसं नाही जमलं तर स्वतःवर किळस यायला वेळ लागणार नाही. काळजी दुसऱ्यांची तोपर्यंतच घेऊ शकतो, जोवर आपल्याकडून ते शक्य आहे. एकदा का ती गोष्ट मनातून उतरली, का पुन्हा त्या गोष्टीला शिखर गाठणं, जवळपास अशक्य!

@UgtWorld



Related Posts