आयुष्यात एकदा तरी मदत करावी

निस्वार्थ मनाने जमते का बघा मदत करायला!

आयुष्यात एकदा तरी मदत करावी…

एक छोटीशी मदत देखील खूप काही करून जाते. अगदी अनोळखी माणसं या मदतीने आपले मित्र सुद्धा होतात. काही वेळा अस होतं,आपण केलेली मदत ही आपल्या नजरेत खूप जास्त असते. जास्त याचा अर्थ खूप महत्त्वाची किंवा खूप जवळची असते, त्याची थोडीतरी स्तुती व्हावी असं वाटतं. अशा वेळी ते वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. ह्यात काही गैर नाही किंवा नाराज होण्यासारखं नाही, उलट आपण त्या व्यक्तीला झालेली मदत आणि त्यातून त्याला भेटणारा आनंद मिळवून देत असतो; उपकार नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं आणि ते न दाखवलेलं चांगलंच केव्हाही.

कसं आहे ना, आपण जर चांगल्या हेतूने मदत करू ना एखाद्याला तर ती समोरच्याला आवडते आणि ती आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान देते. आणि नकळत तो चांगला हेतू आपल्या संकटाच्या वेळी आपल्या कामी सुद्धा येतो. साहजिकच आहे सगळेच जण आपला स्वार्थ टाळून कधीच मदत करत नाही, ते त्याबदल्यात काही ना काही अपेक्षा बाळगतात. जसं आपण म्हणतो या जगात काही गोष्टी सोडून काहीच फ्री मिळत नाही,तसंच हे. त्यात प्रेम असेल, माया असेल, हल्ली तर मदत करताना स्वार्थच जास्त बघतात. आपल्याला काय मिळू शकतं या मदतीतून याचा विचार करून ते मदत करतात जे आपल्या बाजूने चुकीचं आहे कारण निःस्वार्थ भावनेने काहीतरी केलं तर ते कितीतरी पटीने जास्त छान असते, स्वार्थ बाळगून केलेल्या मदतीपेक्षा.

आपल्याला तर माहीतच आहे प्रत्येक जण वेगळाच विचार करतो. आपण एखाद्याला जबरदस्ती नाही करू शकत की तू असंच कर,तसंच कर, हे सर्वस्व त्याच्यावर असतं. कुणी केलेली ‘मदत’ ही कधी विसरू नये. काही जण ती सहज विसरून जातात आणि अस दर्शवतात की मदत वैगरे कधी काही झालीच नव्हती. त्याचं आयुष्य तो त्याच्या परीने जगायला बघत असतो. जरी ते आयुष्य आपल्या बाजूने किंवा आपल्या दृष्टीने चुकीचं असलं तरी देखील त्याने ते स्वतः निवडलेलं असतं आणि पुढे काय होईल ह्याचा मात्र विचार केलेला नसतो. तसंच इथेही आहे, मदतीचा हात कुणी देत असेल तर त्याला आपण विचारत बसत नाही की तू ही मदत मनापासून करतोय की तुला याबदल्यात समोरच्याकडून काही हवंय, आता नाही तर नंतर असेल ते पण असेलच काहीतरी.

यात वाईट असं काही नाही म्हणा. त्यांनी त्यांच्या वेळेचा किंवा मदतीचा विचार केला असावा. आम्ही आमचा वेळ ही मदत म्हणून देतो त्या बदल्यात आम्हाला काहीतरी हवंय. असो हे सगळं त्या व्यक्तींवर असतं. त्यामुळे मदतीचा जास्तीस जास्त निस्वार्थ असलेला बरा. त्यामुळे गैरसमज न होता नाती टिकतात. कारण जर परतीची अपेक्षा ठेवली तर उपकाराची भाषा समोर येते आणि मग वाद होऊ शकतात किंवा नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो, वागणं-बोलणं बदलू शकतं. कधी कधी इतक्या वर जातं की ती व्यक्ती सुद्धा त्या नात्यातून बदलून जाते. साहजिक आहे, कुणालाच नको असेल की आपल्याला हवी असणारी माणसं आपल्यापासून दूर जावी आणि आपली जागा कुणा दुसऱ्या व्यक्तीला मिळावी; पण काही वेळेला असंही होतं की बारीकसारीक गोष्टीचा राग मनात ठेवून ते आपली जागा कुणा दुसऱ्याला देऊनही टाकतात. त्याबद्दल आपण वाईट वाटून घ्यायचं काही एक कारण नाही, कारण अशा वेळी त्या व्यक्तीला ना तुमची किंमत असते, ना तुमच्या नात्याची!

‘मदत’ हा एक छोटासा शब्द आहे, जो खूप काही करून जातो मदत केलेल्या व्यक्तीसाठी आणि करणाऱ्यांसाठी. आणि ती फक्त पैशांच्या स्वरूपात कधीच नसते. एखाद्याच मन जाणून त्याला दिलेला आधार ही सुद्धा एक मदतच असते. कुणा सोबत त्याच्या खडतर काळात घालवलेला वेळ ही पण एक प्रकारची मदतच असते. हजारो प्रश्न पडलेल्या व्यक्तीला एखादा साजेसा असा उपाय दिला तरी त्याच्यासाठी आपसूकच ती मदतच ठरते. मदतीचे असे असंख्य प्रकार असले तरी त्याचे दोन च मुख्य मार्ग आहेत, ते म्हणजे ‘निस्वार्थ’ आणि ‘स्वार्थ’. या स्वार्थ ठेवून केलेल्या मदतीत एक गमतीदार गोष्ट अशी की त्यात आपला स्वार्थ ते दुसऱ्याला खुश ठेवण्याचा बघतात, ते फक्त स्वतःसाठी ती मदत करतात कारण त्यांना ते करून छान वाटतं.

‘मदत’ एकदातरी करावी, जशी जमेल तशी, ती कुणाला तरी करूनच किंवा कुणीतरी तुम्हाला केली तरंच त्या शब्दाचा खरा अर्थ कळेल!

©UgtWorld

Related Posts