अंधूक प्रेमात हवी असलेली छोटीशी आशा!
“साद घाल तू मनाशी, साद दे मला मग! या वेड्या जीवाला अलगद मिठीत घे मग. तू म्हणशील किती ती गाऱ्हाणी तुझी, किती त्या अटी, या तुझ्या कल्पनेला थोडा आराम देता आला तर बघ… अबोल अशी होकारी नजरेतून दिसू लागली, बोलण्याची आपली पध्दत आणखी निखरू लागली! तुझ्या मनातल्या गोष्टींना ओठांची वाचा देता आली तर बघ, नेहमी वेळेला मनवतेस ना माझ्यासाठी त्याच वेळेकडे आपल्यासाठी थोडा आणखी वेळ घेता येतो का बघ…” या काव्य संवादात कित्येक गोष्टींची उलाढाल होते, खासकरून भावनेतून व्यक्त होणाऱ्या अनेक स्पष्ट पण तितक्याच अंधूक गोष्टी.
प्रेमात प्रत्येक जण त्यांच्या सोयीप्रमाणे अटी घालत असतो. इतकाच वेळ बोलायचं, इतकंच बोलायचं. आणखी नको नको त्या कित्येक गोष्टी उगाच लोकं आपल्या अंगाशी ओढून घेतात. जबरदस्ती मन मारून त्याच व्यक्तीच्या सानिध्यात आपलं प्रेम वाया घालवत असतात. असुदे आता कोणाला सांगायचं म्हणजे आपल्याच पायावर दगड मारण्यासारखं आहे. पण मधेच कशाला हे सगळं हवंय नाही का!
प्रेमात असताना त्या निरागस भावनेचा हल्ली विचारच नसतो ना म्हणून आलं ते मनात. अजूनही काही जण त्यांच्या प्रेमाला महत्व देतात इतरांच्या बोलण्यापेक्षा. आपल्या गोष्टींचा भोबाटा करत फिरत नाहीत. आपल्यासाठी समोरच्याला किती वेळ काढता येईल याचा जरासा विचार करता आला तरी पुरेसं आहे. गैरसमजुतीच्या प्रवाहात प्रेमाची नौका बुडण्याआधी तिला किमान समजुतीचा, प्रेमळ संवादाचा हलका आधार असावा.