कधीतरी आपल्या मुलांचा, त्या कर्तबगार जीवाचा विचार करा!
किती अशी स्वप्न आहेत सध्याला जी सरळ सरळ मारली जातात. आणि आपल्या अपेक्षांची बंद गाठोडी दिली जातात डोक्यावर. मानलं की, अपेक्षा पूर्ण करता आल्या पाहिजेत. पण त्या लादल्या जाऊ नयेत असं मला वाटतं. असते एकेका ठिकाणांची वस्तुस्थिती, जिथे सर्रास “नाही” म्हटलं जातं काही नवीन आणि आवडीचं करण्यासाठी.
कारण एक भीती असते, नाही झालं हवं तसं तर करणार काय? पण असा विचार का नाही करत की तसं झालं तर किती चांगलं आहे. एक वेगळं अस्तित्व! एक समाधान मिळेल आयुष्यभरासाठी. आणि जर का नाहीच झालं ठरवलंय तसं तर आहेतच तुमची अपेक्षांची ओझी उरांवर घेतलेली. त्यात वेगळं काही नसणार आहे ना! अजूनही स्वतःच्या मुलांना साहस देण्याऐवजी नाराज केलं जातं. हवं ते करण्यापासून नाही बोललं जातं त्यांना. सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे पैसे आणि सगळे हेच म्हणतात. ते असेल ही खरं. आहेच म्हणा!
पण दरवेळी आणि सगळीकडे तसं नसतं ना! काही काळासाठी परिस्थिती आणि कारणं असतात. पण एकदा संधी द्यायला अडचण काय? पण नाही आधीच निष्कर्ष काढून ठेवायचा. “काही होत नाही ते केल्यावर, हे कर, ते कर. ह्याने असं होईल त्याने तसं होईल. पण आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत ना. निरागस आणि जिद्दी मुलं-मुली आपली इच्छा, आपलं ध्येयं सोडून देतात आपल्या घरच्यांसाठी. त्यांच्या विरोधात जात नाही. भले त्यांची वाट चुकेल आयुष्यात तरीही.
असं नसतं कि आई-वडील चुकीचे असतात, पण असंही नसतं ते दरवेळी बरोबरच असतील. काही अपवाद असतात म्हणा. पण परिस्थती एकाच्या बाजूला राहत नाही. वेळ नेहमी बदलत असते आणि ती आता फार वेगळी आहे. आधीच्या वेळी मार्ग कमी जागा भरपूर होत्या आता जागा कमी पण मार्ग भरपूर आहेत. आता ते भ्रष्टाचार सोडलं आणि काही जगजाहीर गोष्टी सोडल्या तर बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या.
वेळ सारखी सारखी परत येत नाही. याचा अर्थ असं नाही कि आपल्या आई वडिलांशी भांडत सुटा आणि हट्ट धरून बसा मला हे हवंच. सगळ्याच वेळी तुम्हाला हवं ते देता येईल असं नाही ना! पण जमेल तेव्हा देतीलच नक्की. राहिली गोष्ट आवड आणि कमाई ची तर कमाई ला ढीगभर पर्याय असतात (सध्याला नोकरी कमी आणि बेरोजगार जास्त आहेत). पण जे आवडतं ते एकदा तरी करून बघावं. आपल्या आयुष्यातल्या धेय्याला सोडू नका. आता नाही तर पुढे जाऊन ते पूर्ण होतच आणि नाही झालं तर त्याला साजेसं करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे असतंच.
स्वतःच्या गोष्टींसाठी लढणं फार गरजेचं आहे आजच्या घडीला. आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी ,मांडता आल्या पाहिजेत समोरच्या कडे. मग ते आई वडील असो किंवा मग कठीण परिस्थिती. दोन्ही कडे मार्ग असतात. जर नाहीच आई वडील तर मी स्वतःच्या जीवावर करेन पण करणार तेच जे मला जास्त चांगलं येतं. अशावेळी थोडंसं धीरानं आणि समजदारीने काम घायचं. ज्यात माझा कोणी हाथ धरू शकत नाही. का म्हणून मी मागे हटू, कारण की माझ्या मित्राने हे केलं, त्यांचं असं झालं माझं कसं होईल? अरे सगळ्यांचं जर सारखं होणार असतं तर इतकी माणसं जगात आलीच नसती. प्रत्येकाची वेळ त्याच्या हातात असते. वेळ आणि संधी सुटता कामा नये.