रंग पसरला क्षणांचा संपूर्ण मनावर…
“रंग लावूनी लाल गुलाबी गाल तुझे चमकले. क्षणीच संपूर्ण प्रेमरंग मिसळला त्यात. इतक्यात कसा ओसरेल चेहऱ्यावरुनी. तुझ्या त्या मऊ हाताने फिरकी घेतली. त्यातून लागणाऱ्या रंगानी गालातच घरं केली. नवनवीन तराणे उमजू लागले जरी, गाली दोन्ही हातांची तळपाने रंगीत बनुनी उमटली”. सगळ्यात गडद रंग जडतो तो प्रेमाचा, मैत्रीचा आणि काही अविस्मरणीय अशा क्षणांचा. हा मिसळतो क्षणांमध्ये आणि मग रंगवून टाकतो ती प्रत्येक सोबत, ते प्रत्येक नातं जे मनाशी घट्ट जुळलेलं आहे. त्यातूनच नवे बीज रोवले जातात अधिक द्रुढ झालेल्या किंवा नव्याने रंगीत होणाऱ्या नात्यांचे. जांभई जशी जागी होत चालली होती तसं कळत चाललं होत की आता आपल्या गालावरची बेरंग जमीन आता नव्या पद्धतीने निरनिराळ्या रंगाने रंगणार आहे.
सकाळ होताच सगळीकडे रंगच रंग आणि त्यात न्हाऊन गेलेले सर्वजण. धाडधाड, थाकथाक, दरवाज्याची बेल सतत वाजवून आरडाओरड करत,”ऐ उठ चल ,बाहेर ये पटकन नाहीतर आम्ही आत येऊ”. त्यावेळी आपला चेहरा इतका निरागस असतो ना ! लहान मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव फिके पडतील अशाप्रकारचा. कपडे बदलू दिले तर ठीक नाहीतर,”चला उचला असाच” म्हणून सरळ घराच्या बाहेर ओढायच. त्यावेळीचं एक प्रसिद्ध वाक्य “शिस्तीत चेहरा पुढे करायचा हात खाली ठेवून जर नाही केलं तर तुला माहितीच आहे काय होईल ते”. असं जरी म्हटलेलं असलं तरी तेच करतात जे त्यांना करायचं असतं. पोटात काही नसल्यावर आपण जसे तुटून पडतो जेवणावर तसे सगळेच तुटून पडतात.
मैत्रीचा रंग प्रथम दर्जाचा लागतो. पुन्हा पुन्हा लावून तो आणखी खुलून उठतो. गोडपणाचा पेहराव आता अलगदपणे खोडसर बनून धिंगाणा घालत सुटतो. कोरडा रंग आणि कोरड अंग जास्त बघवत नाही ना म्हणून पाण्याच्या बादल्या भरून त्यातल पाणी इतक्या फटाफट अस ओतत होते जस कि त्यांना यापेक्षा जास्त काही चांगलं करताच येत नाही. भिजलेल्या अंगाचा थरकाप सुरु ,त्यातूनही एकाला जरी असं दिसलं कि रंग निघालाय तर हमला म्हणून पुन्हा सगळे तुटून पडतात. चेहऱ्याची प्रत्येक बाजूने मसाज होत होती ती पण फ्री ,फरक इतकाच कि यावेळी ती रंगाने होत होती. एकच रंग चेहऱ्यावर असेल तर “अरे हाच रंग लावलाय का थांब हा !” असं म्हणून असतील नसतील ते सर्व रंग लावणार. म्हणजे एकूणतः त्या दिवशी प्रत्येकातला कलाकार जागा होतो चेहऱ्यावरती रंगरंगोटी करायला. एकदा का मनासारखे भिजले सर्वजण कि मग पुन्हा धिंगाणा.
उत्सवाचा कहर असून कसलंच भान नसतं ,बेधुंदीत न्याहारी करून एकमेकांत भिंगतो. त्याच वेळी कुणीतरी त्या रंगाला एक शीतल झालर देत आवाज देतं “थंडाई कोणाकोणाला हवीय ?”. या क्षणाला तरी कोणाकडून नाही ऐकायची शक्यताच नव्हती. एक दोन सिप पिऊन थंडाईचे “अहा ! एक नंबर ” असं पटकन निघालं. त्यासोबतीला गाणी आणि त्या गाण्यांचा आवाज कानावर पडताच तिच्या चालीत तल्लीन व्हायला वेळ लागत नाही. नवनवे हातवारे अनोखे हावभाव चेहऱ्यावरचे जे आपण पाहिलेले असतात म्हणा पण रंगात ते जरा वेगळे वाटणे स्वाभाविक आहे. हसून हसून पोट दुखतं कारण पाय जेव्हा पुरेसे पडत नाहीत नाचण्यासाठी तेव्हा लोळून नाचायला सुरुवात झालेली असते. जमेल तसे चित्रविचित्र स्टेप्स करून प्रत्येकजण नाचण्यात गुंग असतो. आणि याच श्रेय असत ते थंडाई मध्ये असणारा भांग याच.
भांग असलेली थंडाई एकदा का घश्याखाली गेली कि मग त्याची पातळी सरळ वरच्या स्थराची असते. पण त्याची एक वेगळीच मजा असते, जी त्या दिवशी तरी जास्तच येते. चेहऱ्यावरचे ते चाळे कॅमेऱ्यात अगदी स्पष्ट्पणे कैद होतात. रंगीत कपडे आणि त्याने तयार झालेला तो अवतार आणि त्यावर तंद्री धमाल करून टाकते. इतकं करून भूक तर लागतेच ना मग काय घरातून पुरणपोळीचा सुगंध येतच असतो. ढापायच्या चार पाच आणि मग आणायच्या खायला त्या. थोडं थोडं वाटायचं पण हि शिस्त काही वेळेपुरतीच कारण ते संपलं कि “मला पण, मला पण” असे नारे लागायचे, अजिबात उशीर न करता. आणलेल्या त्या पुरणाच्या पोळ्या अशा गायब होतात जणू त्या आणल्याचं नव्हत्या त्या अजूनही घरीच बनत आहेत.
आणि आपली वाट बघत आहे कधी येऊन घेऊन जाईल असं. प्रत्येकजण दमलेल अंग घेऊन मिळेल तिथे बसतात कारण त्या दिवशी सगळं माफ असतं खासकरून कपड्यांसाठी आणि थकलेल्या शरीराला अराम देण्यासाठी. सगळे मस्तपैकी गोल करून गप्पांची पंगत एन्जॉय करायला चालू करतात. त्यांनतर असं वाटतं आयुष्याच्या बेरंग धावपळीला एक रंगीत आणि वेगळाच पैलू मिळतो आणि तो क्षण रंगवून जातो. त्यासोबतच काही काळ राहता येईल असा विलक्षण निवारा देतो. रंग स्वतःच्या रंगात न्हाहून आपलं जगणं रंगीत करतो. “मिठी त्या रंग मिसळलेल्या अंगाची लहर म्हणा, झलक दिसली ती स्मित हास्याची. सोडवत नाही सहवासाची गट्टी त्यावेळी, तरी नजरेची ही जुगलबंदी आपसुकच होणारी…