विचार भिती ने निघणारे भूतकाळातले!
भिती सतत मनात, सतत नकारार्थी विचार, बोलताना जे सहजच जाणवतील. वादच मनात प्रत्येक वेळेला आणि त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. असं, इतकी रागाची लाट मनामध्ये का उसळावी? म्हणजे समोरून तर सांगायचं की मनात काही नाही पण नंतर सारखं तेच तेच उकरून काढायचं, कशाला ते? एकदाच काय ते बोलून टाकावं ना! सारखं सारखं तेच बोलून काही होणार आहे का?
सारख्या रेकून भूतकाळातल्या गोष्टी बदलणार आहेत का, नाही ना! येणारा काळ, त्याला बदलायचं असेल तर किमान आजच्या बद्दल तरी विचार करावा. काहीही मिळत नाही जुन्यापुराण्या गोष्टी जवळ ठेऊन, काहीही मिळत नाही त्याने. कारण नव्या आणि गरजेच्या गोष्टी कुठे राहणार मग? आणि हक्काची जागा मिळणारच नसेल तर का कोणी येईल, साहजिकच आहे ना! ते तरी त्यांचा वेळ का वाया घालवतील आणि तुमच्यातून त्यांचा रस ही निघून जाईल. मग राहाल तुम्ही तिथेच, नेमकं काय चुकलं याचा विचार करत.
या मोकळीक असलेल्या विचारसरणीला मोकळीक द्यायलाच हवी, सारवासारव तरी कितपत केली जाणार प्रत्येक वेळी, कितपत सांभाळणार आपण त्यांच्या चूका आणि त्यांचे ते बोगस मन! जिथे सुधारणा शक्य नाही तिथे बोलून उपयोगच नसतो कधी, कारण त्यांच्या ठरवल्याप्रमाणे ते वागणार असतात; पण तरी देखील आपण चांगलं होईल, चांगले बदल होतील असंच विचार करतो, जो अर्थातच वायफळ असतो पण आपण करतोच. कधीतरी त्याला थांबा द्यायला हवा ना!
बदल थोडा तरी हवा आपल्यात जर समोरचा बदलणारच नसेल कारण तसं नाही केलं तर समोरचा फक्त आणि फक्त फायदाच घेत राहणार. आता त्याचा ही आपल्यालाच भयंकर त्रास होणार ,पण त्यावेळी देखील आपण काही करू शकणार नाही निव्वळ पश्चातापाशिवाय! एक ते नातं सोडून मनाला शांतता मिळेल किंवा मग ते आपल्या जवळ राहून आपल्याला भयंकर असह्य त्रास देत राहणार.
त्याला तरी आपण काय करू शकतो? एक तर सगळी नाती सोडून जाऊ शकतो आणि एकांतात आयुष्य काढू शकतो. कारण कोणीही काहीही आणि कितीही म्हणो, तुम्हांला तुमच्याशिवाय इतर कोणीच नाही सांभाळणार!