ज्वलंत गोष्टींच मरण पाहिलं मी…

दहन पाहिलं मी काल माझ्या डोळ्यांदेखत. अगदी माझ्या उंची इतकंच लांब अंतर असावं, त्या जळत्या देहामध्ये आणि माझ्यामध्ये. अंतर माझी उंची नाही, अंतर होतं ते फक्त जीवन आणि मरणाचं! ते शरीर दाह सहन करत होतं, या समाजातून, त्याच्या मनस्तापापासून आणि स्वतःपासून लांब जाणार होतं. कुठे, हे त्याचं त्यालासुद्धा माहित नसावं आणि कदाचित जे अग्नी देत होते किंवा जे शवविधीच्या कार्यात उपस्थित होते त्यांनासुद्धा कल्पना नसावी, ते फक्त त्यांची उपस्थिती लावण्याकरिता आलेले.
पुन्हा एकदा तो शव विचारशून्य असावा. काय? कसं? केव्हा? आणि का हा असा सोहळा तयार होणार असतो? त्याला तरी कोणती कल्पना असेल की, आपण असे या जळत्या लाकडांवर झोपलेलो असू. मी गूढ विचारात होतो हे सर्व पाहून, की नेमकं असं कोणतं नातं तुटतं, जे हे इथे रडत आहेत, त्यांचे हे अश्रूदेखील क्षणिक आहेत. त्यांचं प्रेमदेखील क्षणिकच असेल ना! मलातरी असंच दिसतं. सारे काही क्षुल्लक वाटतं. त्या असलेल्या नात्यांमध्ये काडीमात्र संबंध उरत नाही. आणि त्या जळत्या पेटत्या वणव्यातल्या धुरात ते निघून जातं.
डोळ्यातून काही ते दृश्य जातंच नाही माझ्या आणि त्यात भावनाशून्य असलेला मी, डोळ्यांत कणभर पाणी देखील निर्माण करू शकलो नाही. आता प्रश्न असा की, अश्रू निर्माण कसे करणार आपण? ते सुद्धा खोटेनाटे! नाहीच जमत ते मला तरी. कित्येक जण जेव्हा आपल्याला मिठी मारत रडत असतात ना, त्यावेळी क्षणभर का असेना पण डोळ्यांत पाणी येतं पण माझ्या ते ही येत नाही आणि आलं ही नाही कधी. विचित्र असावं बहुधा हे सारं! काही काही जण असं म्हणतात, मन कमजोर असल्यामुळे तसं होतं आणि त्याचमुळे असं होत असावं.
पण त्यांना काय म्हणावं? किती सहनशक्ती लागते सगळयांना सांभाळून, त्यांचं मन राखून त्यांना आधार देण्यासाठी. असो, सगळयांना हे सांगून कितपत पटणार, ह्याची काही मी शाश्वती देऊ शकत नाही; पण ज्या क्षणाला अनुभव येत जातील, त्या क्षणाला नक्कीच ह्याची त्यांना शाश्वती मिळेल. तसं जमणार नाही म्हणा सगळ्यांनाच करणं पण केलं तर होईल आणि अनुभव नक्कीच वेगळा असेल.