एक बर्थडे विश आणि नातं घडायला सुरुवात…
कॉलेजचा लेक्चर चालू होता, कधी संपेल असं झालेलं, शेवटी कसंबसं तो लेक्चर संपला. ब्रेक टाईम होता म्हणून बाहेर निघालो. कालच बर्थडे झालेला, पार्टी मात्र बाकी होती आणि त्या हिशोबाने काही खास मित्र आणि मी चाललो होतो पार्टी करायला. तसंही कॉलेज कॅम्पसमध्ये काय मिळतं खाण्याशिवाय असं बोलून मित्र टोमणे मारत होते. त्या रस्त्याने चालताना वर्गातील काही मुली दिसल्या. आम्ही 4 ते 5 जण असू, यांनी मला मधे ठेवलं होतं आणि बाजूने हे सगळे चालत होते. कोण कसं जाणे पाऊले वळली त्या मुलींच्या दिशेने नकळत. आणि त्यातली एक मुलगी जिचा आज बर्थडे होता, जिच्याशी कधीही बोललो नव्हतो, ती सुद्धा मधोमधच होती. एका बाजूला दोन आणि एका बाजूला एक असा त्यांचा ही ग्रुप आणि ती बर्थडे गर्ल! अचानक आलेलो तिच्या पुढे, सर्व मित्र माझ्याकडे बघत होते, हा करतोय काय असा विचार करत.
ती पण सरप्राईज मला बघून आणि त्या मुली पण माझ्याकडे पाहू लागल्या. मी आपला हात पुढे करून तिला म्हटलं,”हॅपी बर्थडे!” “थँक् यू, आणि तुला पण, काल तुझाही बर्थडे होता ना, मला मिताली ने सांगितलं. “हो, थँक्स!” “चल बाय!” “हो, बाय!” तिथून पुढे जाताच मी विचार करू लागलो, मी का गेलो तिथे अचानक. माझी गाडी तिकडे वळलीच कशी अचानक या विचारात असतानाच मित्राने घेरलं,”क्या बात है भाई! छान हा, डायरेक्ट बर्थडे विश. कधी पोरींशी बोलत नाही आणि आज डायरेक्ट विश, ते पण हात मिळवून,वाह!” “असं काही नाही रे, नकळत झालं ते, मलाच माहीत नाही कसं ते!” “राहूदे रे, आता नको बहाणे देऊ.” ती चिडवाचिडव घरी जाईपर्यंत चालू होती आणि मला हैराण करून सोडलं त्या सर्वांनी.
काही महिने झाले आणि मला ती फेसबुक वर दिसली. मी रिक्वेस्ट पाठवली आणि तिने ऍक्सेप्ट सुद्धा केली. पुढे हळू हळू छान बोलणं चालू झालं आणि मग नंबर पण दिला एकमेकांना. आता ऑनलाईन पण आणि नॉर्मल टेक्स्ट वर पण बोलत होतो. काही महिने असेच गेले, दिवाळी ची वेळ, गावाला असताना मी तिला सहज कॉल केला, तो माझा पहिला कॉल होता तिला! घाबरत घाबरत सुरुवात केली पण नंतर नंतर काही वाटलं नाही, बोलत गेलो. तिथून पुढे मग आम्ही कॉल वर बोलायला लागलो. आता वेळ होती भेटायची, तब्बल 8 महिन्यांनंतर आम्ही भेटणार होतो पहिल्यांदा. ती पहिली भेट आणि ते ठिकाण अजूनही स्पेशल आहे आणि कायम असेल! भेट वाढत गेली, संवाद वाढत गेला, फिरणं ही होऊ लागलं सोबत आता. बर्थडे जवळ येत होता आता माझा आणि तीचा सुद्धा.
तिने सहज विचारलं,”काय हवंय गिफ्ट?” मी म्हटलं,”गुलाब!” ती म्हणाली,”बस एवढच!” “हो, सध्या एवढच, तू भेट अजून काही नको!” सांगितल्याप्रमाणे तिने ते गुलाब आणलं आणि ते माझ्या आयुष्यातील कुठल्याही मुलीने दिलेलं पहिलं गुलाब होतं. कुठलाही मुलगा ते विसरू शकत नाही एका मुलीने त्याला दिलेलं गुलाब आणि मनापासून दिलेला वेळ! वर्ष गेली मैत्रीची अशीच, नातं वाढलं, तिचं माहित नाही पण इतका जीव लावला तिने की, मला तिच्या प्रेमात पाडलं. त्यात काही चुकीचं नव्हतं म्हणा कारण ते होणं स्वाभाविक असतं आणि ते कधीही होऊ शकतं. प्रश्न असा होता की, तिला विचारायचं कसं की मला तू आवडते कारण तिने आधीच सांगून ठेवलेलं, मला असलं काही आवडत नाही. मैत्री छान असते, बाकी मला हे सर्व आवडत नाही.
हेल्पिंग हँड म्हणून मित्र असतातच आणि ते नेहमीच चांगले सजेशन देतात आपल्याला निदान त्यावेळी तरी. त्यांनी ट्रिप प्लॅन केली, म्हटले जा तिला घेऊन फिरायला आणि तिथेच विचार असं वैगरे वैगरे. मी म्हटलं ठीक आहे असं तर असं करून बघू. तिला विचारलं याबद्दल तर ती बोलली,”हो ठीक आहे, जाऊया आपण फिरायला.”मस्त अशा ओपन गार्डन मध्ये त्या किनाऱ्यावर बसलेलो असताना तिला उठवला,म्हटलं चल जरा फिरून येऊ आपण. आणि अस म्हणत चालायला सुरुवात केली आणि मन घट्ट करून तिचा हात पकडून तिला म्हटलं,”मला तू खूप आवडते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
ती स्तब्धच झाली, हे तिला अपेक्षित नव्हतं आणि साहजिक आहे असं होणं अशावेळी. ती गप्पच होती काही वेळ,”काय बोलू तुला मी? हे का असं? आपण फ्रेंड्स आहोत ना चांगले!” मी म्हटलं,”ते तर कायम राहूच आपण आणि आपल्या इतकी छान बॉंडिंग नाही जमणार प्रेमात करायला कुणालाही!” काही न बोलता ती शांतच उभी होती. मी अजूनही तिचा हात माझ्या हातात पकडून होतो आणि पुन्हा एकदा प्रेमाने विचारलं,”काव्या बोल ना काहीतरी!” “काय बोलू मी? सुचतच नाही.” आणि मग तिचा हात सोडून मी माझ्या गुडघ्यांवर बसलो आणि पुन्हा एकदा तिचा हात पकडला आणि म्हटलं,”माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्या वाटेच प्रेम पण मीच करेन, फक्त माझ्यासोबत राहा,राहशील ना?” तिने माझ्याकडे पाहिला आणि एक छान स्माइल देऊन “हो राहीन तुझ्यासोबत!” अस बोलून तिने मला वर ओढलं आणि एक छानशी मिठी मारली, त्या मिठीतच तिचा होकार कळला मला.
आणि म्हणून ती माझ्या आयुष्यातली खूप खास मिठी होती. कारण तो दिवसच खास होता आणि ती सुद्धा! प्रेमाची सोबत जिवलग मैत्रिणीत भेटली,अजून काय हवं होतं! त्या एका बर्थडे विशने माझं आयुष्यच बदलून टाकलं, एक बर्थडे विश!
वाचण्यापासूनचा प्रवास व ते शब्द मनातल्या भावना पर्यंत पोहचण्याचा अप्रतिम क्षण… खूप आवडली
आणि आपल्या ह्या छान प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.. आपला वेळ छान जावो.