एका मुलाने त्याच्या वडिलांना लिहिलेलं पत्र…
एक पत्र आलं मला, वाचून थोडं मन हळवं झालं! कारण ते होतंच तसं. चला आपण पण बघूया काही भाग त्यातला. एका मुलाने त्याच्या वडिलांना लिहिलेलं पत्र.
“बाबा, कसे आहात? बरे नाहीत ना तुम्ही, मला माहित आहे खूप विचार असतात मनात तुमच्या. सगळ्या बारीक सारीक गोष्टींचे! असं काय तसं काय, हे का ते का? बऱ्याच गोष्टी येतात त्यात म्हणा! पण काही गोष्टी तुम्ही स्वतःहून सांगता मला जेव्हा तुम्हाला बोलावंसं वाटतं तेव्हा. मग आपण काही वेळ चर्चा करत असतो त्याबद्दल आणि काही गोष्टीत सहमत असतं आपलं आणि काहीं मध्ये नसतं सुद्धा. काही जण आपल्याच ओळखीतले म्हणत होते मला तुझे बाबा ड्रिंक करतात. मी म्हटलं, त्यात काय विशेष ते तर सगळेच करतात आणि थोडंफार लागतच ना हल्ली. आता मला काहीच वाटत नाही त्याचं. अरे पण ते जास्त ड्रिंक करतात हल्ली एक दिवस आड त्याच काय! आणि मग ते चांगलं नाही वाटत ना.
“हे बघा! ते माझे बाबा आहेत. त्यांना काय करायचं आणि काय नाही ते चांगलं माहित असतं. त्यात तुम्ही म्हणता कि रोज रोज करतात तर ते मला पटलेलं नाही. मुळात मी त्यांच्या बद्दल काही ऐकून घेऊ शकत नाही कुठल्याही परिस्थितीत. कधी कधी काही गोष्टीत अडकाठी होते माझी बोलताना म्हणा, पण नेहमी नाही. त्यात आमचं बोलणं खूप स्पष्ट आणि मोकळ्या पद्धतीचं असतं. आणि त्यामुळे सहसा काही हरकत नाही येत कुठल्या गोष्टीसाठी. मी पण काही वेळेला सांगतो त्यांना कि बाबा जास्त ड्रिंक करणं वगैरे याने काहीच सार्थक नाही होत. काही क्षणापुरतं विस्मरण आणि पुढे तेच तेच सुरु राहतं.”
“ते ही मला नेहमी म्हणतात, काही गोष्टी सांगण्यापलीकडे असतात. ज्या तू नाही समजू शकत बाळा. पण बाबा मी आहे ना तुमच्यासाठी! तुम्हाला काहीही बोलावंसं वाटलं, कशात काही लागलं तर तुम्ही मला सांगत जा पण हे ड्रिंक वगैरे नको आपल्याला. मला अजिबात आवडत नाही कोणी तुम्हाला बोललेलं. मग मला राग येतो ते तसं ऐकून. कुणाला बोलायला पण होत नाही कारण तुम्ही कोणाला उलट बोलू देत नाहीत आणि पुढच्या क्षणाला गप्प बसावं लागतं. साधीशी गोष्ट आहे, मला एवढंच म्हणायचं आहे आता नको काही. बस झालं सगळं स्वतःला सावरा आणि स्वतःकडे लक्ष द्या.”
“काही जणांना तुमची खूप गरज असते आणि त्यासाठी तुमचं जवळ असणं फार गरजेचं असतं. जास्त काही बोलणार नाही मी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला. कारण मला नाही आवडत तुम्हाला काही बोलायला. ज्या खडतर प्रवासातून तुम्ही वर आलात त्याचा अंदाजा आहे मला. त्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक त्रासाची जाणीव आहे मला. तुम्ही छान आणि नेहमी हसत राहा, म्हणजे आई ला पण तेवढच सुख. थोडं कमी टेन्शन घेत जा, उगाच वायफळ गोष्टींचा विचार करून आपलं मन दुखावण्यापेक्षा सोडून द्या त्या गोष्टी.”
असे काही क्षण, काही नाती असतात जी आपल्याला जपता येतात अगदी छान पणे. यातच बघू शकतो आपण त्याने त्या दोघांचं मन किती सोजवळ पणे मांडलं आहे. त्याच्या बाबांवर असणारा विश्वास आणि त्यांच्या प्रति असलेला लगाव भावून जात असेल मनाला. तर हा त्या पत्रातला विशेष भाग होता पूर्ण पत्र पुन्हा कधीतरी…
मनाला स्पर्शून जाणारे, वडिलांबद्दल आदर असणारे पत्र आहे हे
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद..