जेव्हा दिलेला शब्द, दिलेली वेळ बदलली जाते…

वेळेला दिलेला शब्द नेहमी जपता आला पाहिजे!

जेव्हा दिलेला शब्द, दिलेली वेळ बदलली जाते…

दिलेला शब्द, दिलेली वेळ जेव्हा बदलली जाते , तेव्हा समोरचा या विचारात नसतो की, पुन्हा असं काही झालं तर मी असंच करेन वैगरे; तर तो या विचारात गुंतलेला असतो की, नक्की कारण काय असू शकतं त्यामागचं? का पाळता आला नाही समोरच्याला दिलेला शब्द? नेमकं काय कारण समोर आलं असेल, जेणेकरून ही अशी परिस्थिती समोर आली असावी.

सगळयाच गोष्टींचा एकतर्फी विचार करून चालत नाही. कधी कधी समोरची बाजू समजून घ्यावी आणि मग पुढे काय ते ठरवावं. घाईमध्ये किंवा घडलेल्या प्रसंगाच्या रागापायी आपल्या मनाला त्रास करून न घेता तो निर्णय घ्यावा; जेणेकरून पश्चातापाला जागा नको. त्या वस्तुस्थितीचा आढावा घेणं हे फार गरजेचं असतं. नुसतं डोळ्यांदेखत घडलं म्हणून ते खरं होत नाही आणि नुसतं ऐकून ही गोष्टी खऱ्याच्या खोट्या किंवा खोट्याच्या खऱ्या होत नाहीत.

जरातरी शहानिशा करणं फार गरजेचं असतं, ते करण्यामागे दोन-तीन प्रमुख कारणं असतात. एक तर नातं न तुटावं, त्यात गैरसमज अर्थातच नसावे; दुसरं म्हणजे घेतलेल्या निर्णयाचा उलट परिणाम आपल्या मनावर होता कामा नये, कारण तसं झालंच तर सगळ्या गोष्टी आपल्याला निस्तराव्या लागतील. पुन्हा ते नातं जसं होतं तसं करण्याची सुरुवात हे कठीणच.

त्याहून कठीण म्हणजे मनाची समजूत घालणे, झालेल्या गोष्टींची परतफेड करणं आणि त्यातल्या त्यात त्या गोष्टींना असं भासवून देणं जसं त्या गोष्टी एक वाईट भूतकाळ होता, एक असा भूतकाळ ज्याला विसरणं काही कठीण नाही! मान्य आहे मला, भूतकाळ विसरणं ही काही साधी गोष्ट नाही; पण ती अगदीच न विसरता यावी इतकी कठीण ही नाही.

काही क्षण समोर येतात, काही आठवणींना उजाळा मिळतो; पण त्या अगदी क्षणिक असतात आणि मुळात त्या क्षणिक ठेवता यायला हव्या, जेणेकरून त्या आपल्या वर्तमानावर वर्चस्व प्रस्थापित करणार नाही आणि ज्यांना सहज सावरता येईल. त्या गोष्टी तुम्हांला भारावून सोडतात, हे बऱ्याचदा ऐकलं आहे मी, ठीक आहे; पण कोणत्याही गोष्टीतून बाहेर यायला वेळ कधीच गेलेली नसते, अगदी मरणाच्या काही क्षणाआधी सुद्धा!

@UgtWorld

Related Posts

2 thoughts on “जेव्हा दिलेला शब्द, दिलेली वेळ बदलली जाते…

Comments are closed.