एकच वेळ असते, एकच क्षण असतो! Let’s go
Let’s Go… सर्वत्र चमचमती लाईट्स आणि त्या विविध लाईट्सच्या रंगाने सजलेला तो फार्महाउस. इतकी सजावट असूनही फारशी गर्दी नव्हती. वीस-एक माणसं असावीत ती सुद्धा घरातलीच. प्रश्न असा पडला होता कि लग्न किंवा साखरपुडा तर नसेल ना! कारण फोन कॉल वर तर जास्त काही सांगितलं नव्हतं. फक्त पत्ता आला होता मेसेजने. त्या हिशोबाने तिथे गेटच्या बाहेर नुकतच पोहचून त्या फार्महाउसकडे बघत नेमकं काय असेल याचं अनुमान लावत असताना नंदिनी त्या गेट जवळ आली. ती जणू काही त्यांचीच वाट बघत होती.
ती समोर भेटल्यानंतर कळलं, कि आज तिचा वाढदिवसच आहे फक्त आणि काही प्रसंगांमुळे तिची फॅमिली इथे फार्महाउसवर तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घेऊन आली होती. तिच्या आईच्या सांगण्याप्रमाणे कुठल्याही मित्रांना किंवा मैत्रिणींना येण्यास बंदी नव्हती. त्यानुसार तिने तिच्या काही खास मित्र-मैत्रिणीनांच बोलावलं होत. कारण तिला माहित होत की कोणी येवो न येवो, तिचे जवळचे मित्रमैत्रिण नक्की येणार. ते फार्महाउस शहरापासून बरच लांब होत आणि म्हणूनच तिने जास्त कोणाला सांगितलं नाही याबाबतीत कारण तिला तिच्या फॅमिलीच मनही मोडायचं नव्हतं.
इतकं असूनही तिला तिच्या मित्रांशिवाय वाढदिवस साजरा करायचा नव्हता म्हणून तिने त्यांना बोलावून घेतलं होतं. २ बाइक्स होत्या त्यावेळी,२ मुली आणि १ मुलगा. त्यांच्या ग्रुप मधले अजून २ जण यायचे बाकी होते ते कुठेत असं ती विचारातच होती त्यांना तितक्यात मागून एक स्कुटी आली त्यावर एक मुलगा-मुलगी आले. आता सगळेच जमा झालेले पण एकाच्याही हातात गिफ्ट नव्हतं, तिला त्याच आश्चर्य वाटणं स्वाभाविक होत पण तिने ते आपल्या चेहऱ्यावर अजिबात दर्शवलं नाही. ते समोर होते त्या क्षणी तिच्यासाठी हे कुठल्याही गिफ्ट पेक्षा कमी नव्हतं.
आत जाता-जाता तिच्यासाठी शुभेच्छांच गाणं सुरु होत. तिने तिच्या आई-वडिलांना सांगून ठेवलं होत, त्यामुळे घरात पाय ठेवताच त्यांच्या स्वागतासाठी त्या उभ्या होत्या. सर्वांची ओळख झाल्यानंतर लगेचच ती त्या सगळ्यांना त्या फार्महाउसच्या टेरेस वर घेऊन गेली, जेणेकरून मनमोकळं बोलता येईल. बऱ्याच दिवसांनी त्यांची ग्रुप भेट झालेली त्यात ती तिच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यामुळे सगळेच खुश होते. आता काही वेळातच तीच बर्थडे सेलेब्रेशन सुरु होणार होतं.
आता सगळे खाली जमले होते आणि तिच्या पुढ्यात तो केक होता. केक कटिंग करताना पुन्हा एकदा सर्वजण “Happy Birthday to नंदिनी” असे टाळ्या वाजवत शुभेच्छा देत होते. त्या डान्स आणि गाण्याच्या धुंदीत सगळे मग्न व्हायला सुरुवात झालेली. काही वेळाने खानपान झाल्यानंतर सगळ्यांची आवराआवर सुरु झाली, आता झोपायच्या तयारीत होते सगळे कारण बराच उशीर झालेला. आणि ह्यांची गँग सगळ्यांच्या नकळत पुन्हा टेरेसवर जाऊन बसलेली. काही वेळ चर्चा करून मग एक-एक जण हळू हळू खाली उतरत होता. कुणाला भनकही न लागता ते सर्व घराच्या बाहेर आलेले. आपल्या बाइक्स आणि स्कुटी काढून ढकलत ढकलत गेट बाहेर घेऊन गेले.
काही अंतरावर जाऊन त्यांनी त्यांच्या गाड्या स्टार्ट केल्या आणि निघाले आपली स्वारी घेऊन. त्यातली एक स्कुटी नंदिनी चालवत होती आणि बाकीचे तिच्या मागोमागचं त्यांच्या गाडीवर. ठिकाण असं ठरलं नव्हतं नेमकं कुठे जाणार त्यांच. सभोवतालची झाडे आणि अंगाला भिडणारा गार वारा अस समीकरण झालेलं त्यावेळी. घरच्यांना न सांगता गपचूप निघालेली यांची गँग आता सध्या टेन्शन फ्री राईड घेत होती. त्या सवारी मध्ये नंदिनी स्वच्छंदीच्या आणि मैत्रीच्या प्रेमातल्या क्षणांना आपलंस करून घेत चाललेली.
गर्द चांदणं मोकळ्या आभाळात आणि त्यात निघालेले हे मुसाफिर. मध्य रात्र उलटून गेली असावी त्यातच सप्तर्षीतल्या ताऱ्याप्रमाणे यांची रंगत वाढत चालली होती. पुढे रस्त्याच्या आडोशाला एक मैदान होत तिथे यांनी त्यांच्या गाड्या लावल्या. तिथे शेकोटी करणं तितक अवघड नव्हतं म्हणा आणि त्यासाठी लागणारं सामान हे घेऊनच आलेले. जवळपास सुकलेली झाड असल्यामुळे जाळण्यासाठी लाकडं आणि फांद्या पुरेश्या होत्या. ती शेकोटी करता करता बॅगेतलं खाण्यापिण्याचं हलकं खाद्य घेऊन सगळे त्या शेकोटी भोवती मोकळ्या मैदानात बसलेले.
नंदिनी आता खूप खुश होती, तिचा असा वाढदिवस साजरा होईल हे तिला वाटलं पण नव्हतं. तिने जे एकदा सहज आपल्या मित्रांपुढे बोलून दाखवलं होत, त्याच मित्रांसोबत ते बोलण खरं झालं. या निसर्गाच्या अशा बेधुंद सानिध्यात असणं हे एक आपलेआपच सुख आहे हे तिला ठाऊक होत. आता वेळ होती तिच्या गिफ्टची कारण सुरुवातीला दिसलेले रिकामे हाथ ह्यावरून तिने असंच गृहीत धरलं होत कि यांनी काही आणलच नसावं. आता तिच्यापुढ्यात एक मोठी वस्तू जवळपास तिच्या उंचीच्या अर्धी असावी उंचीला आणि त्यावर प्रत्येकाने दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा.
त्या गिफ्टच पॅकिंग असं केलेलं कि तिला ओळखूच नाही येणार नेमकं काय असावं. तिने ते ओपन करताच, तिला रिऍक्ट कस होऊ हे सुचत नसल्यामुळे ती त्या गिफ्टकडे बघण्यातच गुंग होती. त्यांनी तिला तिच्या आवडीची गिटार गिफ्ट दिली होती त्यावेळी. तिची हॉबी सिंगिंग आणि गिटार प्ले करणं आहे हे त्यांना सगळ्यांना माहित होतं आणि ते याच दिवसाची वाट बघत होते तिला ते गिटार द्यायला. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, पण सगळ्यांनी एक ग्रुप मिठी मारून तिला पुन्हा खुश करून टाकलं.
जुनं गिटार बिघडलं जरी असलं तरी त्यावर ती आधी प्रॅक्टिस करायची. आता नवीन गिटार होतं हातात आणि त्या सुंदर रात्री तिच्या आवाजात गाणं ऐकण्याची सर्वांची फर्माईश होती. तिने त्यांच्यासाठी ती पूर्णही केली. तिच्या गोड आवाजाच्या सोबतीला गिटारची मेलोडिक धून एक अनोखा माहोल करून रात्र सजवत होती. त्या सुरांच्या लयीत त्यांच्यातले दोघे जण रोमँटिक डान्स करत होते आणि काही त्यांची नक्कल. सकाळचा पहिला प्रहर होत आला होता आणि आता सगळं आवरून हे पुन्हा फार्महाउसकडे निघत होते.
तिचा तो वाढदिवस अविस्मरणीय झालेला आणि अनोख्या ठिकाणी साजरा झाला होता अगदी तिच्या मनासारखा. आता परत निघण्याच्या वेळी तिने सगळ्यांना विचारलं “जायचं ना?” सगळे एका सुरात म्हणाले, “Let’s Go…”