मनाची घालमेल करणारा समज…

तिरस्कारवर ठरवलेला समज की आपली समजूत?

मनाची घालमेल करणारा समज…

जरी आपल्याला त्रास होत असेल तरीही आपण आपल्या गोष्टींवर ठाम असतो आणि ज्या वेळी तो राग बाहेर येतो त्यावेळी आपल्याला जाणीव होते की इतका राग खरंच जरुरी होता का? त्यामुळे आपण कोणाला दुखावलं? स्वतःलाच ना! जी चिडचिड केलेली आणि जो त्रागा करून घेतलेला तो आपल्यालाच भारी पडला. कुणाला आपल्या रागासाठी गृहीत धरणं किंवा दरवेळी त्यांना दोषी ठरवणं तितकंसं योग्य नसतं आणि ते आपल्या मनात ठेवूनही उपयोग नसतो. ते एकतर बाहेर पडायला हवं किंवा विसरून जायला हवं. जेणेकरून आपण मोकळे त्या गोष्टींपासून आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून. काही गोष्टी असतात ज्या आपण जितक्या समजू तितक्या अजूनच गुंतत जातात. अशा वेळी त्यांचा समज न घेतलेलाच बरं!

एक मजेदार गोष्ट अशी असते की आपण राग फक्त अर्धवट असलेल्या माहिती मुळे करून घेतो आणि जे निव्वळ चुकीचंच आहे. मी असंही म्हणत नाही की दरवेळी आपणच चुकतो आणि नेहमी आपणच माघार घ्यावी, पण काही वेळेला ते करणं चांगलं असतं. जरी आपली बाजू ठाम असेल आणि समोरची बाजू चुकीची, तरीही आपलं बोलणं किंवा ठाम मत मांडणं हे कधी कधी व्यर्थ असतं. कारण समज ही गोष्ट सगळ्यांनाच समजेल असं नाही. प्रत्येकाला स्पष्टीकरण हवं असतं. असं का? तसं का? हेच का? तेच का? स्वतःच्या आयुष्यापेक्षा त्यांना इतरांच्या आयुष्यामध्ये जास्त रस असतो. कधी कधी तर आपण ज्यांना आपले जवळीक अर्थात आपले मित्र मानतो तेच या उचापती जास्त करतात.

आपला मित्र किती उदास आहे आणि कुठल्या परिस्थिती मध्ये आहे हे न समजून घेता फक्त चेष्टामस्करी करायची आणि त्याला सावरण्याऐवजी चिडवत बसायचं, हे कधी कधी त्यांना अगदी बरोबर जमतं. मान्य आहे, प्रसंगी जे आईवडील समजावू शकत नाही ते मित्र करतात, खूप वेळा मदत देखील करतात. पण कित्येकदा गरज असताना एकही जण मदतीसाठी जागेवर नसावं, याला कुठली मैत्री म्हणावं?

फक्त फिरण्यापूर्तीची किंवा एन्जॉयमेंट साठी ची? याला काय अर्थ आहे का? की फक्त मजामस्ती करायला आपले मित्र; समजुतीच्या वेळी सगळेच गायब! अरे, तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही येऊन मन मोकळं करून जाता, तेव्हा कुणी काही एका शब्दाने बोलत नाही; पण तेच जर आमच्या बाबतीत आलं तर तसं नाही ना होत. तेव्हा समजून घ्यायला किंवा समजवायला ना तुमचं ‘मन’ असतं ना तुमच्याकडे ‘वेळ’ असतो; पण “सॉरी यार, महत्वाची कामं होती” अशी कारणं बिनधास्तपणे माथी मारली जातात.

आपलंही चुकतं म्हणा, आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. एक माफक अपेक्षा अशी की कोणीतरी आपल्याला समजून घेईल. बरं मग कुणी दुसऱ्याने समजून घेतलं तर ते ही त्यांना सहन होत नाही. “आम्हाला का नाही सांगितलं? दुसऱ्यांना का सांगितलं? आम्ही काय आता मित्र नाही राहिलो का?” अशा प्रश्नांचा भडीमार सुरू होतो, जणू काही तिसरं महायुद्धच सुरू करतील. मग अशावेळी खोट्या मैत्रीतल्या प्रेमापेक्षा जो वेळेला उपयोगी पडेल त्यालाच जवळ ठेवावं.

मित्रांमध्येही समजुतीच्या दिखाव्याचे पोशाख घालून वावरणारे खूप असतात. कधी कधी आपण त्यांना ओळखू शकत नाही, पण प्रसंगानुसार ते त्यांची खरी ओळख दाखवून मोकळे होतात. जेव्हा ‘समज’ शब्दाची ‘गैर’ सोबत सांगड घातली जाते आणि मग गैरसमज होतो. तेव्हा हसरी खेळती मैत्री असेल, प्रेम असेल किंवा इतर कोणतंही नातं असेल, त्यात फूट पडतेच. एक क्षण असाही येऊ शकतो की ती नाती कायमची दुरावली जाऊ शकतात, निव्वळ गैरसमजामुळे! म्हणूनच वेळेत स्वतःला समजा आणि मनाला समजून घ्या…

@UgtWorld



Related Posts