मानसिक पाळी – पिढ्यानपिढ्या मनांवर बिंबवलेली

मानसिक पाळी – नैसर्गिक वाद की अज्ञानाचा उच्छाद

“मानसिक पाळी” साहजिकच आहे, असं शीर्षक वाचून थोडंसं विचित्र वाटलं असेल; पण इतक्या वर्षांनंतरही लोकांची मानसिकता काही बदललेली नाही. धर्म, देवाच्या नावाखाली कित्येक गोष्टी खपवल्या जातात, त्याकडे कोणी लक्ष देत नाही. कोणी कोणी ते लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला तर त्यालादेखील समाजाआड केलं जातं. तो वेडा आहे, तोंडाला येईल तसं बोलतो असं सांगून त्याच्या शब्दांनाही खोटं आणि निरर्थक ठरवलं जातं. अशा कित्येक गोष्टी डोळ्यांदेखत घडत असूनही आपल्याला काही करता येत नाही. कारण लोकांची मानसिकता अजूनही माती खात आहे.

अजूनही ते अज्ञान पिण्याची सवय काही जात नाहीए. त्यातलीच एक अतिशय घाणेरडी सवय म्हणजे मासिक पाळी दरम्यान दिली जाणारी वागणूक! मासिक पाळी जणू काय संसर्गजन्य रोगच असावा की, “अगं, शिवू नकोस, मला ही होईल’, असे उद्गार काढले जातात. एका कोपऱ्यात बसून रहा, कशाला शिवू नकोस, देवघरात, किचनमध्ये येऊ नको, या सगळ्याला निव्वळ आणि निव्वळ फालतुपणा म्हणता येईल. तो जो त्या दरम्यान त्रास होत असतो, तोच सहन करायला त्यांना किती वाईट वाटत असतं, वाईट हा शब्द कदाचित चुकेल ही माझा, पण तो जो काही त्रागा सहन करतात ती काही साधी बाब नाही आहे. त्याहून ही विचित्र आणि गलिच्छ त्रास म्हणजे ती वागणूक! एका रोग्यालासुद्धा नको तितक्या अटी घालून इतकं बंदीस्त करून ठेवत नसतील, जितक्या एका स्त्री ला एका मुलीला या दरम्यान पाळावं लागतं.

निव्वळ आपलं मानसिक सुख किंवा मग खोटी शान वाचवण्यासाठी एका साध्या जीवाला इतका परकेपणा दिला जातो. बरं, बाहेर ठीक आहे पण निदान घरात तरी मुभा मिळावी मुलीला, बहिणीला, बायकोला; पण नाही, तसं जमत नाही. कोण काय म्हणालं तर? अरे, त्यांना तोंड आहे, काही न काही बोलण्यासाठीच ते! समोरच्यासाठी चांगले शब्द फक्त त्यांचा स्वार्थ पूर्ण झाल्यावरच येतात. हे तर विधीलिखित आहे, त्यात काडीमात्र शंका नाही. पण समाजात आधीपासून चालत आलेलं चलन, रितभात आपण मोडून कसं चालणार? अरे, समाजाचे चोचले पुरवण्यासाठी आहे का आपलं जीवन!

निसर्गाने दिलेल्या गोष्टी आपण अगदी डोक्यावर घेतो, मग हीच गोष्ट इतकी वाईट का वाटावी? ती ही नैसर्गिकच आहे ना? त्याने कसला रोग पसरतो आणि माणसं मरू वैगरे लागतात, असं मी तरी अद्याप ऐकलेल नाही. मग का हा दुजाभाव? काही जण तोंड वर करून सांगतात जसं काय एखादी अभिमानास्पद गोष्ट असावी. तुम्हाला तुमची खोटी शान मिरवायची आहे ती मिरवा ना, उगाच नको त्या गोष्टींची पायखेचणी का करताय? अरे ज्या रक्तस्त्रावावर तुम्ही बोट उठवता, ज्याला तुम्ही अपवित्राचा दर्जा देता; तीच नसती, तर या जगात तोंड वर करून हे सांगत फिरायला तुम्हीदेखील नसता!

कोणत्या प्रकारे तुम्हांला या निसर्गात अस्तित्व प्राप्त झालंय, याचा कधी विचार करून बघितलं आहे का? नाही, कशाला बघायचं ना? त्याने मला सांगितलं, बस झालं. कोणा एकाच्या सांगण्यावरून तुम्ही असले वाहियात नियम स्वतःच्याच घरात लागू करता, मग जगाला इतर काही गोष्टींसाठी कोणत्या तोंडाने दोष देता, समाज असाच तसाच, वैगरे वैगरे. नाहीच बोलू शकत तुम्ही, स्वतःदेखील मातीच खात आहात ना! बदल हवाच अशा जुनाट विचारांत, त्यांना एकत्र करून अगदी कचऱ्यात टाकायला हवं. हे शिवाशिवीचे लाड बंद करून प्रेमाने जवळ घ्यायला हवं. काय हवं नको त्यांना या दरम्यान ते बघायला हवं.

ज्या पोकळ विचारांच्या समाजात आपण राहतो, त्यात आपणही डोळे बंद करून तसंच वागायला हवं, असं काही नाही. एक चांगला समाज घडवण्यासाठी ठोस पाऊलवाट निवडाविच लागते. या पोकळ मानसिकतेला समाजात वरील स्थानावर येऊच दिलं नाही पाहिजे. जर तुम्ही मासिक पाळीला अपवित्र म्हणता, तर मी तुम्हांला मानसिक पाळीची बुद्धी असणारेच म्हणेन, कारण किती ही लपवलं तरी सल ही उघडकीस येतेच आणि कितीही खाली दाबला गेला तरी बदल हा होतोच. त्याला कोणी काही करू शकत नाही. जास्तीस जास्त थोडा वेळ जाईल आणखी पण बदल हा होणारच आणि त्याला कोणी देखील रोखू शकणार नाही.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts