अज्ञानातून मनात बसवलेला “रावण”

माणसात नसलेला "रावण"

हल्लीची तरुण पिढी सणवार साजरे करण्यासाठी पुढाकार घायला लागली आहे. आपली संस्कृती म्हणून किती आणि असच करायचं म्हणून किती जण करतात हे सगळ्यांनाच माहित आहे. आपल्या अंतर्मनात मान्य करा अथवा नका करू पण रावण आणि रावणाचे कित्येक गुण आपल्यात आहेत. पण तो कोणता एक आपल्यावर हावी आहे हे मात्र त्या माणसाला तरी माहित असेल का? कदाचित हो! कदाचित नाही देखील! नक्की काय?

आपल्या अहंकाराला कितपत आणि कोणत्या ठिकाणी सन्मान मिळू शकतो, याचा विचार आजवर कोणत्या मनाने केलाय? बहुतांश लोक आता विचार करायला सुरुवात ही करतील. हा असा कसा प्रश्न पडलाय! बुद्धीला चालना देताना कोणत्या विचारधारेला आपण जवळ करतो, हे देखील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना माहित नसेल. किंबहुना त्यांच्या प्रत्येक गोष्ट करण्यातल्या असणारा मोह मात्र काही आवरत नाही. आजकालची पिढी शारीरिक जवळीक शिवाय राहूच शकत नाही असं का म्हणतात बरं?

इच्छेला मार्ग मरण नसतं असं म्हणतात. खरंच तर आहे म्हणा! मत्सर म्हणजेच या द्वेषापायी कित्येक जण कोणत्या कोणत्या थराला जातात हे सर्वांना ठाऊक आहेच. क्रोध आवरतच नाही. अर्थात रागाच्या भरात भानच नसेल तर करणार तरी काय? करून काय होईल! याची पर्वा तरी कोण करतं? कोणी नाही करत, मुळातच याची कोणाला पर्वा नसते. माणसाला गर्व असतो, पायाच्या तळापासून हातांच्या नखापर्यंत. लोभच अनावर होतो एका वेळेनंतर म्हणा. त्याला तरी काय म्हणावं? असो, आहे तर आहे, चालू दे तसंच!

माणसात नसलेला "रावण"

रावणाच्या बाबतीतल्या काही गोष्टी वरती मांडल्या आहेत. पण त्याच रावणाचं अस्तित्व आपण जेव्हा जाळायला बघतो. त्या जाळण्यामागे आपण स्वतःतल्या किती वाईट गोष्टी मनातून जाळतो, असा प्रश्न किती जणांना पडतो? माहिती नाही! याउलट आपण असंख्य चांगल्या गोष्टी त्याच अग्नीत सर्रास जाळून टाकतो. याची खंत किती लोकांना जाणवते? त्याकडे मात्र कोणच लक्ष देत नाही. आपण आपले त्या रावणाला जाळण्याच्या उत्साहात मग्न असतो. अज्ञानातून असो किंवा सज्ञानातून असो, सतत वाईट गोष्टीच नष्ट करता येतात, असं खरंच आहे का?

आदर्श मानून चालताना त्यात कित्येक गुण असामान्य आहेत. त्यात कोणालाच रस का नाही? आपल्या कलागुणांना वारसा देण्याची इच्छा आजकाल का होत नाही? सतत तुलना करत असलेलं आपलं मन जरासं वेगळं असावं असा अट्टाहास नको का? चित्त थाऱ्यावर असताना त्याला लोभाचे आजारपण तरी कशाला? त्या जळत्या अग्नीमध्ये आपल्यातले द्वेष, लालसा, हवस, तिरस्काराची भावना यातील गोष्टी का जाळू नयेत. मुळातच अति चांगुलपणा ह्यालाही त्या अग्नीत विलीन करून टाकणं सध्याच्या घडीला बरं पडेल.

@UgtWorld

Related Posts