व्यक्त होणारी प्रत्येक भावना शब्दात आपल्याच तऱ्हेने सजते ती असते कविता
कविता म्हटलं की शब्द भावना होतात आणि आपले भाव घेऊन ते शब्द कित्येक गोष्टींना मांडत असतात. या कवितांमधून आपलं मन आपण व्यक्त करत असतो.
प्रत्येक वेळी नवनवीन असं असेल असं नसतं. पण दरवेळी काही ना काही नवीन त्या कवितांमध्ये नक्कीच सापडतं जे आपलं असतं. त्यात आपण आपल्या मनातल्या गोष्टींची प्रतिमा बघतो.
प्रत्येकाच्या वाट्याला एक कवी मन असतं जे त्यांना लिहिण्यास भाग पाडतं. आणि ते प्रेमात पडल्यावरच होतात असं नाही पण बहुतांश वेळेला ते एक चावीच काम नक्कीच करतं. जे आपल्या मनात आयुष्यात अडलेल्या टाळ्याला खोलण्यास मदत करतं.
अशाच काही मराठी कविता या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील. ज्या नक्कीच तुम्हाला आवडतील आणि कोण जाणे पुढच्या क्षणाला तुम्हीही कविता लिहू शकाल…
वेळ
@ugtworld
मी उगाच पाहतो वाट,
ज्याची इच्छाच नाही परतण्याची,
मी बांधून ठेवलेली गाठ,
बहुदा सोडण्याची वेळ जवळ आली!
कठोर कर हे मन,
पुरे झाला हा वेडेपणा,
कित्येक जीव उदार रे तुझ्यावर,
हो आता तरी भूतकाळातून रिकामा!
मधाळ हसणं
@ugtworld
तुझ्या मधाळ हसण्यात
प्रतिबिंब असावं तुझं,
किती प्रयत्न करतोय तरी
मन का अडकावं तिथं,
किमया असावी ही तुझी
कि आणखी काही समजेना बघ,
एका स्मित हास्यामागे
किती शब्द लपलेत बघ…
उदासी
@ugtworld
उदासी दिशाहीन ही,
वाट धुक्यात दडून आहे!
मी मुसाफिर बेफिकिर,
जो गारव्यात हरवून आहे!
वाट पाहून मनात थंडी भरली,
गारठ्यात विचारांची ऊब दाटून आहे!
एक आडोसा मिळाला अशावेळी,
मन आता काही काळ शांत पडून आहे…
अर्थ-अनर्थ
@ugtworld
अर्थ हा अटळ आहे,
त्याचा अनर्थ होणे आहे शक्य!
मग कशाला काळजी हवी
कशाला ही मनात भीती
स्पष्टीकरण उगा का हवीत
आपल्याचं पुस्तकाला आपलीच परवानगी!
अर्थ नाही, ना काही यात तथ्य,
याचा अनर्थ होणे आहेच शक्य!
कोण जाणे
@ugtworld
का कोण जाणे
मी नादान का होतो,
माझ्या एकांताला मी
मैतर मनात होतो,
बालिश भावना होत्या
बालिश च मन होतं,
त्याच उद्देशात मी
स्वतःला हसवत होतो!
अनुमती
तिच्या सोबतीत
@ugtworld
मी अजाण राहिलो,
मलाच कळलं नाही
तिच्या प्रेमात कधी पडलो!
अनंत काळ सुद्धा
कमी होता सहवासात
कित्येक शब्द तर मी
फक्त जवळ ठेवून राहिलो!
समजूतदार ती
मला नेहमी समजत गेली
माझ्या अबोल भावनांना
मी तिच्या डोळ्यात भरत गेलो!
मला आपलंस करताना
तिच्या निरागस स्वभावाला भुललो
तिने स्वतःहून अनुमती दिली
अन आम्ही पूर्णतः प्रेमात पडलो!
स्वार्थ का दिसे मज
स्वार्थ का दिसे मज
@ugtworld
सारखा दिसे मज,
आरसा लागे जो,
मीच का दिसे मज..
वेडेपणा हा अफाट,
अंगार राग फेकत
माती होई सगळीच,
विश्वास आणि प्रेमाच्या
तिरस्कार भावनांत
मीच का दिसे मज..
का कोण जाणे,
वास्तव पेट घेत,
मज दहन भासे यात,
मीच का दिसे मज..
शेवट असावा असाच,
यांस गती नको मुळात,
हा जीव जो असमर्थ,
मीच का दिसे मज…
धीर
@ugtworld
एक आवाज ऐकण्यासाठी
जीव हा कासावीस माझा,
उगाचच हा आव का?
माझा इतका उतावळेपणा का?
ही भावना मला समजेना
पुढे मागे काही सुचेना,
मी जाईन ओतत शब्द अनेक
पण अर्थ त्यांनाही हवा ना!
एकांत सारला बाजूला हा
गाठ-भेट होण्यासाठी नडला हा
मी मोजत होतो घटका
वेळेचा काटा मात्र धीर देऊन गेला..
वाईट का वाटलं प्रश्न समोर
पण बेचैनी का समोर
मी निशब्द विचार घेऊन होतो,
तिचं याच वेळी येणं समोर
भडीमार सारा प्रश्नांचा मनात
किती बोलू आणि किती नको
तिने सहज जवळ करत मला सांगितलं
तू जास्त विचार करू नको…