सोबत अबोल असली तरी सहवास नक्कीच बोलका असतो…

शांत किनारा, चंचल लाटांकडे पाहत आणि सहवासाची झालर घेऊन एक जोडपं तिथल्या कट्यावर सोबत बसलेलं. मनात असंख्य प्रश्नांच भांडार घेऊन आज तरी मनमोकळं बोलता यावं याच विचारात दोघे गुंतून गेलेले. पण त्या प्रश्नांच प्रदर्शन अजून तरी दोघांनी सुद्धा एकमेकांसमोर केलं नव्हतं. त्याच्या काही क्षणापुर्वीच ते जेव्हा भेटले होते, तेव्हा एक छानस निरागस हास्य दोघांच्या चेहऱ्यावर आलेलं. जी मिठी दोन हृदयांची हालचाल जवळपास एकत्र करून टाकते तीच मिठी खूप काही सांगून गेली त्यावेळी. चेहऱ्यावरचं हास्य बघत ते दोघही एकमेकांना निरखून घेत होते. त्या निरखण्याच्या निमित्ताने एकमेकांची खिल्ली उडवण्यात जास्त गुंग झालेले. त्याच कारण असं कि, दोघांनीही जवळपास सारखेच कपडे घातले होते.
सफेद रंगाचं शर्ट आणि ब्लू कलर ची जीन्स. मग काय ! ती म्हणाली “पुढच्या वेळी सांग मला कि मी ह्या ह्या कलर चा शर्ट घालणार आहे” ,तो म्हणतो “हो सांगेन ना नकीच.” त्यावरून ते दोघंही हसायला लागतात. रस्त्याच्या बाजूने चालत असताना अधून मधून हातांनी हातांचा स्पर्श असा होत होता जसं त्यात चुंबक असावं. असे सारखे ते हात एकमेकांकडे आकर्षित होत होते. त्या दोघांनाही त्याची चांगलीच कल्पना होती पण ते ह्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होते. तिने मग हळूच तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवून चालायला सुरुवात केली. तो लाजाळूच्या पानांप्रमाणे स्मित हास्य देत त्याच्या मनातल्या गुलाबी मेहफिलींना गालावर येणाऱ्या लालीत लपवत होता. ती त्या लालीकडे पाहून त्याला छेडत होती, “आय हाय, किती मस्त दिसतोय रे, काय भारी लाजतोय एकदम झकास.”
अशीच मस्ती करत, थोडं रमत गमत ते त्या कट्याजवळ येऊन बसतात. बसण्यापूर्वी वातावरण जरासं वेगळं होत आणि आत्ताचं जरासं निराळं. एकमेकांमध्ये जेमतेम दोन बोटांएवढं अंतर असावं असे बसलेले असताना ती त्याला विचारते “काय बोलतोस ,कसा आहेस ?” तो तिच्याकडे बघून म्हणतो ,”तुझ्यासोबत नेहमीच छान वाटतं.” असं बोलून आपल्या चेहऱयावर आलेलं हास्य ठेवत, त्यांची नजर एका सुंदर दृश्याकडे वळते. पिवळसर लाल झालेला सूर्य आणि त्याच्या किरणांनी आभाळात उतरलेले बहुरंगी चित्र ज्याचं हुबेहूब प्रतिबिंब त्या समुद्राच्या पाण्यावर दिसत होत.
त्यातच लाटांची होणारी धावपळ किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठीची. त्यांच्या त्या बेचैनीमध्ये एक ओढीचं वेगळेपण दिसून येत होत. त्या किनाऱ्याच्या होणाऱ्या स्पर्शाला बिलगून घेण्याचं असंच त्या दृश्याकडे पाहताना दोघांच मनही काहीसं गुंतलं होत. कित्येक स्वप्न आपण आपल्या उराशी बाळगतो आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत सुद्धा करतो. साहजिक आहे आपल्यासाठी ती महत्वाची असतात कारण त्या स्वप्नांशी आपलं भविष्य आणि कुणा दुसऱ्याचे जीवन अवलंबून असतं. ते जोडपं अशीच त्यांची स्वप्न एकमेकांसमोर मांडण्याच्या प्रयत्नात मग्न होतं.
नुकतंच नावारूपाला आलेलं त्यांच नातं आणि त्या नात्यातील प्रेम हे त्यांच्या व्यतिरिक्त कोणी समजेल कि नाही याची त्यांना भीती वाटणं वावगं ठरणार नाही. त्या क्षणी त्यांच्या मनात येणारे अनेक प्रश्न त्यातलाच एक म्हणजे हे नातं जे आता फक्त मैत्रीचं न राहता त्या नात्याने एक पाऊल पुढे सरकवलं आहे. ज्याने मैत्रीच्या कुलुपाला प्रेमाची चावी लावून उघडलं आहे. ते इतरांना सांगावं कि नाही? आणि हो! तर कसं? मुळात हे गरजेचं आहे पण आणि नाही पण. त्या इतरांमध्ये घरातले, मित्रपरिवार आणि काही जवळची माणसं येतात. दोन तरुण जीव जेव्हा एकमेकांवर जिवाच्या आकांताने प्रेम करतात तेव्हा अगदी निष्पाप आणि निस्वार्थ प्रेम ठेवून ते त्यांच्या मर्यादा बाळगतात. स्वतःला सिद्ध करण्यासाठीचा निर्धार एकाकडून नव्हताच, तो दोन्हीकडून तितक्याच तीव्र इच्छेने केलेला होता. अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे सहज आणि सोपी वाटू लागतील त्यात शंका नसावीच.
कारण जे प्रेम आहे ना! त्याने मिळालेलं उत्तर असं होत कि, ती म्हणते “होईल सगळं नीट आपण करू शकतो, आपल्याला हवं ते मिळवू शकतो.” आणि तिच्या ह्या सकारात्मक उत्तरावर तो म्हणतो “आपल्या प्रेमात तितकी ताकद आहे आणि तितकं मनोबल सुद्धा जे आपल्या प्रेमासोबत काहीही निभावून नेऊ शकतं” आता आभाळातील चंद्रकोर स्पष्ट दिसत होती त्यासोबतीला काही चमचमतं चांदणं. सभोवती त्या लॅम्प पोस्टच्या लाईट्स ज्याचा उजेड त्या कट्टयावर पडत होता. त्यात तो आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती शांत निजलेली. त्या सर्व प्रश्नावलींना बाजूला सारून ते निवांत बसून होते. त्या क्षणाला अगदी सहजतेने प्रेमाने एकमेकांचा अंगाचा तो प्रेमळ स्पर्श त्यांना असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं निरसन करत गेला…