जगातल्या प्रत्येक ‘ती’च्या अपूर्ण इच्छा पूर्ण होताना तिच्या गालाला आलेली खळी…
प्रास्ताविक – प्रस्तुत कथेत रोजच्या दिनक्रमात गुरफटलेल्या व सामान्य गृहिणीच्या मनात खोलवर रुजलेल्या इच्छा,आकांक्षा आणि त्या आपल्या साथीदारासह उमलू पाहणाऱ्या इच्छांना पूर्णत्वास नेण्यासाठी एका गृहिणीने केलेल्या एकतर्फी अट्टाहासास एकाएकी आलेले उधाण सांगणारी कथा ‘मावळतीच्या खळी गालाला’…
तुझं माझं म्हणता म्हणता कधी आपलं झालं हे तुझं तुला किंवा माझं मलाच कळलं नव्हतं त्या क्षणी. तू गप्प होतीस अगदी त्या अवखळ लाटांमध्ये तुझा आवाज लपलेला, त्या मावळत्या सूर्याच्या अंधुक किरणांत तू तुझे रंग शोधत होतीस आणि मी मात्र निःशब्द होतो अगदी पूर्वी सारखाच. तुला मला बरंच काही सांगायचं होतं, बोलायचं होतं पण वेळ संधी देत नव्हती आणि मी वेळ देत नव्हतो. शांत निवांत होती ती सायंकाळ. एकमेकांच्या हातात हात होते अन परतीच्या वाटेने आपण निघालेलो.
तू कित्येकदा म्हणत होतीस
“थोडा वेळ इथे थांबता आलं असतं तर बरं झालं असतं ना!” आणि मी मात्र
“आत्ता रात्र होईल आणि खूप उशिरही झालाय, घरी रीमा एकटीच आहे निघावं लागेल” मी माझं बोलणं व्यक्त करून रिकामा झालो पण तुझ्या मनाची घालमेल जाणण्यात त्या क्षणी कमी पडलो.
“थांबूया का थोडा वेळ? सारखं सारखं नाही अनुभवता येणार मला हे पायांना स्पर्श करून जाणारं पाणी, नाही बघता येणार खरे खुरे शंख शिंपले. थोडा वेळ थांबशील का? माझ्यासाठी” तू खूप मनापासून बोलत होतीस हे सगळं पण मी मात्र तुझं बोलणं हसण्यावारीच घेतलं.
“अगं येऊ की परत कधीतरी, कुठे चाललोय का मी की हा समुद्र कुठे चाललाय? परत येऊ आपण इथे असाच फावला वेळ काढून” तू गप्पच होतीस. मी तुझा हात पुन्हा हातात घेतला आणि
“चल जाऊ आत्ता घरी, घरी आपलं पिल्लू आपली वाट बघत असेल”
तू जोरात माझा हात झटकलास, आणि रागाने वळलीस.
मी विचारलं तुला की काय झालं रागवायला तर तू काहीच बोलत नव्हतीस. खरं तर तू खूप काही बोलून गेलेलीस डोळ्यातून, स्पर्शातून पण मी ऐकलंच नव्हतं. इतकी वर्षे आपण एकत्र आहोत पण कधी जाणवलंच नाही ग, हेच की इच्छा,आकांक्षा ह्या कितीही काहीही बदललं तरी तशाच असतात त्यांना मरण हा प्रकार नसतोच. तू चालत होतीस तुझ्या डोळ्यात पाणी होतं पण ते पाणी बाहेर येण्याचं धाडस करत नव्हतं. पाठ केलीस आणि त्या पाण्यालाही तू माझ्यापासून लपवलेलंस. इतका का त्रागा करून घेतलेलास ग तेव्हा ?”
“खरतर मला राग आलाच नव्हता रे फक्त वाईट वाटलेलं, याचंच की मी माझ्या इच्छा अपेक्षा या मावळत्या सूर्या प्रमाणे मनातूनही मावळून टाकलेल्या. त्याचाच खरतर त्रास होत होता मला. आणि मनात खूप खोलवर दाबून ठेवलेल्या या इच्छांना अथांग सागराच्या पिवळ्या लाटा बघून उधाण आलेलं. मला खरंतर तुझ्यासोबतच थांबायचं होतं तिथे पण तू नाही म्हणालास अन अश्रू अनावर झाले आणि लाटांच्या खाऱ्या पाण्याला आपलंसं समजून त्यात मिसळायला सुरू झाले. कित्येक दिवसांनी मनापासून रडले रे तेव्हा, तू तिथेच थांबलास हे बाकी बरं केलंस निदान मला स्वतःशी एकट्यात स्वतःच्या आतल्या आवाजात बोलता तरी आलं. खरं सांगू जर त्या क्षणी तू थांबला नसतास ना तर बिंधास्त मोकळीक मिळाली असती रे मला समुद्राकडे पाहून जोरात ओरडायला, त्या पाण्यात पाय आपटत झोंबणारा ओलावा अनुभवायला, वाळूवर स्वतःचं नाव बदामात लिहायला, खारा गारवा डोळे बंद करून झेलायला. पण तू बघत होतास अन म्हणून हे सगळं मनातच राहिलं.
माझा एक टक लागलेला त्या सूर्या कडे आणि तो बिचारा माझ्यासारखाच स्वतःच्या दिनक्रमात गुरफटून मावळून गेलेला. राहिला फक्त त्याचा दिवसभराचा पिवळ्या किरणांचा थकवा, जो अंधारात कधी दिसत नाही आणि दिवसा दिसू देत नाही. तो थकवा जाणवतो तो फक्त आपल्यालाच. मग पुन्हा पहाट आहेच, तीही तिच्या दिनक्रमाशी प्रामाणिक होती आणि मी ही. म्हणून डोळ्यात भरून घेत होते त्याचं मावळतेपण. पुन्हा कधी संधी मिळेल नाही मिळेल काही सांगता येत नव्हतं म्हणून पापण्याही मिटण्याची इच्छा नव्हती. माझा तिथून पाय निघत नव्हता क्षणाक्षणाला वाटत होतं की तू यावंस आणि येणाऱ्या लाटांचं पाणी माझ्यावर उडवावस,घट्ट मिठी मारावीस आणि कानाजवळ येऊन हळुवार आय लव्ह यु म्हणावसं अगदी हिंदी चित्रपटातल्या हिरो सारखं. विचारांचा धुमाकूळ माजलेला मनात, दडून राहिलेल्या कित्येक स्वप्नांना आज आयुष्याचा शेवटचा दिवस समजून पूर्ण करायचं होतं पण स्वप्नांच्या लपंडावात मला शोधणारं कोणीच नव्हतं, तेवढ्यात तू तिथे आलीस मला त्रास द्यायला…”
“त्रास नाही ग आई!! मला घरी कंटाळा आलेला म्हणून म्हटलं आई बाबांना जाऊन थोडं डिस्टर्ब करावं पण इथे येऊन बघते तर काय बाबा ह्या टोकाला तर तू त्या! तुला काय झालं म्हणून विचारलं तर तू म्हणालीस
“काही नाही, मला थोडं एकटीला सोड”
तुला एकटीला सोडायला आलेले का मी? मग कशी बरं सोडेन. असो चल आत्ता बाबा वाट बघतोय तिथे आपली. नाही गेलो तर रागवेल. पण तू येशील तर ना, तुझं आपलं नाहीच! बरं भांडलीय का बाबा सोबत तर म्हणे त्यांनाच जाऊन विचार. ह्याला काय अर्थ आहे मग मलाच नाईलाजाने तुला जबरदस्तीने बाबांजवळ घेऊन जावं लागलं. खरतर मी तिथे मज्जा करायला आलेले जस की समुद्राकडे पाहून जोरात ओरडायचं होतं मला, समुद्राचं पाणी स्वतःवर उडवायचं होतं, वाळू वर माझं नाव लिहायचं होतं आणि त्या खारट लागणाऱ्या भन्नाट वाऱ्याची चव घ्यायची होती. तू एन्जॉय करशील का माझ्यासोबत हे सगळं…प्लीज!! नाहीतर मला एकटीला कंटाळा येईल. मग…
“मग मी तुझ्या बाबाकडे एकतर्फी नजर टाकली तेव्हा तुझ्या बाबाने एक गोड स्माईल देऊन माझ्या अंगावर येणाऱ्या लाटांचं पाणी उडवलं आणि डोळ्यांनीच होकार दिला, अगदी जग जिंकल्यासारखं वाटत होतं रे तेव्हा मला, तू वरवर जरी शांत दिसत असलास तरी तुलाही खळखळून हसता येतं हे त्या दिवशी कळलेलं मला. कुणास ठाऊक तुला अचानक काय झालेलं, तू तुझे बाहू पसरलेलेस मला घट्ट मिठी मारण्यासाठी. सगळी स्वप्न क्षणी पूर्ण झालेली. मुली समोर आय लव्ह यु म्हणायला लाजत होतास तू म्हणून ओठांचे इशारे केलेलेस.
आभाळ ठेंगणं वाटत होतं रे त्या दिवशी. तुझा, तिचा हात हातात होता फक्त माझी बोलण्याची ताकद नव्हती जी तू मला त्या क्षणी नजरेतून दिलेलीस. ओले चिंब झालेलो आपण त्या खाऱ्या आणि खऱ्या आठवणींत. आणि त्यातही माझे ते खारे आनंदाश्रू कोणालाही दिसू न देता अगदी आनंदाने मावळतीच्या लाटांमध्ये कसे मिसळले हे माझं मलाच कळलं नाही…
— ललित चंद्रकांत सुतार
(छायाचित्रण-ईर्षा सोवनी)