एक संदर्भ मनातला त्याच्या असण्याचा…

माझ्या मनातला तो

प्रत्येकाचं मन त्याच्या आवडीच्या गोष्टी मनात जपत असतं. त्याचबरोबर एखादी व्यक्ती सुद्धा जवळ ठेवतं. “मनाच्या जवळ कोणी आहे का?” हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो कोणाला त्यावेळेला एक तर त्या व्यक्तीचं नाव कळतं किंवा मग त्याचं वर्णन ऐकू येत. हळूहळू आपल्याला कळत जातं की कितपत आहे त्याची महत्वता. मुळात मनात आहे म्हटलं की, आपसूकच विचार येतात. कोणीतरी खास आहे. असंच कोणीतरी खास आहे मनात माझ्या ज्याचं हुबेहूब वर्णन करणं मला जमणार नाही पण काही गोष्टी आहेत ज्यावरून अंदाज येईल की, कसा आहे तो जो माझ्या मनात आहे, माझ्या मनातला तो.

माझी संगत बरीच छोटी असली तरी माझं मित्रमंडळ भरपूर मोठं आहे. त्यात काही माणसं जवळची आहेत आणि काही छान अशी आहेत. पण मनाजवळ एकच आहे. बरेच जण असतात आपल्यासाठी असं म्हणतात पण मुळातच फार कमी जण खरोखरच त्या क्षणाला तिथे असतात. माझ्या मोजक्या सेलिब्रेशन मध्ये तो सोबत असतो.

जेव्हा कधी विचारावं का रे येत नाहीस तर म्हणतो की, “आहेत ना तुझे मित्रमैत्रिणी, कशाला हवाय आणखी मी त्यात.” “अरे पण चल ना सोबत, हवा आहेस तू मला इथे”. “बघ तुझ्यासोबत कोणी ओळखीचं नसतं तर मी आलो असतो जोडीला पण आता आहेत ना इतके जण. मला नाही आवडत ते. मला सारखे शंभर प्रश्न विचारणार आणि मला वाईट नको वाटायला म्हणून तुझ्याशी नेहमी वागतात तसेही नाही वागणार. मग ते तुला ऑकवर्ड वाटणार जे मला नाही आवडणार!” “अरे तसं पण कोणाला माहित आहे, मला तू आवडतोस ते.” “मला विचारशील तर सगळ्यांना, कारण तुझं वागणं माझ्या सोबत असताना खूप वेगळं असतं आणि ते सर्वांच्या नजरेत पटकन दिसून येत.”

“त्याचं काही नाही इतकं. ते आपोआप होतं. मला नाही माहित कसं ते”. असच बोलून नेहमी येणं टाळतो तो. पण सोबत कोणी नसलं की मात्र मग जास्त काही विचारत नाही फक्त इतकंच की, “कुठे भेटायचं आहे आपण ?” मग येतो बरोबर. आधी यायचा माझ्यासोबत मित्रांच्या पार्टीला वगैरे तेव्हा आम्ही मित्रच होतो म्हणा, पण जास्त वेळा नाही यायचं असच ह्याने नंतर ठरवलं वाटतं. पण अधून मधून म्हणायचा, “तू खुश असल्यावर ज्या पद्धतीने बोलतेस ना ते मला छान वाटतं, तुला मनातल्या भावना मोकळ्या करायच्या असताना जेव्हा तू बोलतेस ना माझ्याशी, ते मला खूप जास्त आवडतं. कारण त्यावेळेला तुला दुसरं कोणी चालत नाही. कोण जाणे का असं, पण ते मला बरं वाटतं. तसही आपल्या जवळच्या माणसाने एकवेळ आनंदाच्या वेळी नसेल सोबत तर काही वाटत नाही पण गरजेच्या वेळी नक्की असायला हवं. मनाला आधार देणं हे सगळ्यांना जमतंच असं नाही ना.” हे त्याचं बोलणं ऐकून मग मी गप्प बसते.

वर्णन राहिलंच ना, आमच्या गप्पाच आल्या. खूप छान आहे असं म्हणनार नाही पण त्याच्यापेक्षा छान मला माझ्यासाठी कोणी वाटत नाही. मला समजत असून देखील जर मी चुकले तर त्यावर अगदी मऊपणे समजावून मला समजून घेतो. एखाद्या मुलीला तिचा हट्ट पुरवणारा हवाच असतो म्हणा. त्याच सोबत तिच्या मनातल्या गोष्टी कितपत तिच्या तोंडून ऐकून घेतो हे पण हवं. नुसतं ऐकतोय म्हणून तर सगळेच ऐकतात पण त्या ऐकण्यामागे त्यांचं कितपत लक्ष आहे हे पण गरजेचं असतं.

बऱ्याच वेळेला गैरसमजामुळे नाती तुटतात. तेही भेट होत नाही किंवा हवं तितकं बोलणंच होत नाही, आणि तू मला वेळच देत नाही असं बरंच काही. पण याची एक गोष्ट मला फार आवडते आणि ज्याच्यामुळे मला त्याच्यावर राग येतच नाही आणि आला तरी तो क्षणिक असतो. कारण तो इतकं मस्त सांभाळतो मला आणि आमच्या ह्या नात्याला की, खूपच स्पेशल असल्याची जाणीव दरवेळी होते. असं वेगळं तर काही नाही सांगितलं असावं मी पण तरीही असाच आहे तो. अरे हो नुसता समजूतदार नाही हा, खूप मस्ती करत असतो. सतत काही ना काही असतंच चालू. किती ते नवनवीन प्रकार त्याचे मला हसवण्यासाठी.

काय माहित कुठून इतकं सुचतं त्याला. पण म्हणतो, “हे फक्त तुझ्यासाठी, दुसरं कोणासोबत मी अशी मस्ती नाही करणार.” “का रे असं ?” “साहजिक आहे, तू माझ्यासाठी खास आहेस बाकीचे नाहीत.” सध्याला इतकं पुरेसं आहे. बाकीचं नंतर कधीतरी…

@UgtWorld



Related Posts