“मिठीत घे बस! काही बोलू नकोस”

शाब्दिक बांध न तुटता व्यक्त होणारी गोष्ट, मिठीत!

“मिठीत घे बस! काही बोलू नकोस”

“मिठीत घे बस! काही बोलू नकोस”, असं ऐकल्यावर किती छान वाटतं. वाटणारच ते, साहजिकच आहे. कारण त्यापेक्षा ‘भारी’ गोष्ट असेल अशी आपण अपेक्षाच नाही करू शकत. आणि प्रत्येक भेटीत मिळणारी मिठी ही काही सारखी नसते, ती प्रत्येक वेळी वेगळीच असते. कारण त्यात भावना वेगळ्या असतात. कधी त्या, खूप वाट पाहून दमलेल्या मनाला खुश करणाऱ्या असतात तर कधी त्या विरहाच्या लांब अंतरानंतर जुळणाऱ्या वाटांसारख्या असतात.

जितके मिनिट, सेकंड आणि तास आपण लांब राहिलेलो असतो त्याची त्यावेळची भरपाई ही मिठी असते आणि ते ही निशुल्क! जरी शुल्क लागतच असेल तर ते असेल हृदय किंवा दोघांचं मन. ते यासाठी की जेव्हा हृदयाने हृदयाला आलिंगन दिले जाते आणि त्यांचे संवाद हे जेव्हा विनाशब्दाचे होतात, त्यालाच आपण मिठी म्हणतो.

आलिंगन आणि मिठी हे काही वेगळे नाही म्हणा. आपण त्याला आपल्या बाजूने असं समजू शकतो की, आलिंगन हा मुलगा आणि मिठी ही मुलगी आहे. जे एका अशा अर्थाने एक आहेत जो अर्थ म्हणजे प्रेम. आणि आपल्याला माहित आहे प्रेमाची परिभाषा ही वेगळीच असते ती कशातच मोडत नाही. तसंच काहीसं इथेही! त्या दोघात साम्य असतं ते भावनांचे आणि प्रेमाचे. शब्द म्हटले की प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व असतं आणि आपण ते टाळू शकत नाही. आणि ते शब्द कुठल्याही गोष्टीला जिवंतपणाच रूप देऊन जातात.

‘मिठी’ या शब्दालाच बघा, आपण वाचलं तरी आपण त्या विचारात जातो आणि त्या व्यक्तीला मिठी मारायलाही तयार असतो, तर त्याउलट कदाचित मिठीत घेऊन ही मोकळे झालेलो असतो. असंच आहे, या मिठीत सर्व जगच बदलून जातं. मन हरवून जातं, कशाचं म्हणजे कशाचं भान राहत नाही. अगदी एका अनोळखी जगात आपण वावरत असतो. जिथे स्पष्टीकरणाची गरज नाही, ना कसली बोलचाल; फक्त निरागस प्रेम आणि बस आपल्याला हवा तसा सहवास!

मिठीचेही अनेक प्रसंग आहेत. जेव्हा एक मित्र खूप दिवसांनी भेटतो त्या वेळी, अरे यार इतक्या दिवसाने भेटलोय, एक मिठी तर होऊन जातेच. मन उदास असेल त्यावेळी,”मला खूप रडायला येतंय, मला जवळ घे तुझ्या मिठीत घे!”,असं म्हणणारी प्रेयसी किंवा एखादी मैत्रीण ही असेल. कधी कधी “तुझ्या मिठीत खूप मस्त वाटतं”,म्हणणारा प्रियकर ही असतो. यशाच्या भरात घेतलेली आपल्या घरातल्यांची मिठी, त्याला ही कसली तोड नाही. कारण त्या मिठीत सुद्धा वेगळेपण असतं.

मिठी हा शब्द जरी एक असला तरी मिठी घेणारी किंवा देणारी व्यक्ती प्रत्येकासाठी वेगळी असते. काही जण असंही ठरवून बसतात की, मला कुणीही मिठी देणार नाही; पण कालांतराने सहवास आणि संबंध वाढले की तो विचार बदलून जातो आणि मिठीच आगमन होतं. एक गोड प्रेमळ आणि गोंडस अशी मिठी घ्यायलाच हवी. ‘मिठी’ म्हणजे प्रेमाची सुरुवात, नाराजीचा शेवट आणि कायम लागणारी सवय…

©UgtWorld

Related Posts