नेमकं कसला हा वाद अनामिक मुद्दा घेऊन…
मुद्दा काय? जायचं कुठे आपण आणि कसं ते माहित नाही पण जायची इच्छा मात्र भरपूर आहे. आणि मग अचानक भयानक एक ठिकाण सुचतं, तिथे जायचं ठरतं, त्या ठिकाणी जायचं कसं ते ही ठरतं; पण मुद्दा असा येतो की कोणाला न्यायचं आणि कोणाला नाही. कारण सगळ्यांची मत वेगळी, वेळेनुसार बदलणारी कम्फर्ट लेवल या सगळ्यातून त्या वेळेला निभावून नेणं हा एक मोठा टास्क आहे.
कोणाला नाही नेलं तरी गोंधळ आहेच आणि नेलं तरी प्रॉब्लेम सगळयांना! प्रत्येक येणाऱ्याची येण्याची वेगळी कारणं आणि त्या वेगळ्या कारणांची वेगळी जागा. ज्यांच्या मुळे आपण ठरवलेल्या जागा आणि नेता येणारी माणसं, दोन्ही गोष्टी मुळातच सारख्या राहत नाहीत. त्यांना नेणं किंवा न नेणं, दोन्हींकडून मरणचं आहे.
म्हणजे नेलं तर इथेच का? असं का? आणि बरंच काही. नाही नेलं तर पुन्हा का असं? आलो असतो आम्ही, केलं असतं मॅनेज. पुन्हा नवं वळण, पुन्हा साऱ्या गोष्टींना नव्या वाटा फुटणार, पुन्हा सगळं नव्याने सांगा; कोणी सांगितलंय इतकं करायला. खड्यात जाऊदे सगळं, इतका विचार आता केला तर पुढे बघायलाच नको. कधीही जाता येणं शक्य नाही. त्यापेक्षा न कोणाला सांगता आपलं आपलं जाऊन यायचं म्हणजे कोणाला वेगळं स्पष्टीकरण द्यायला नको.
मोजक्यांना घेऊन जाऊ शकतो, ज्यांच्या तक्रारी कमी आणि मदतीचा हात पुढे असतो. ज्यांचा किमान मानसिक हातभार तरी उपयोगाला येईल. सहभाग दाखवणं हेच काय ते असतं, त्यातूनच कळून येतं की उत्साह आणि वरवरचे हावभाव यातलं अंतर. तुम्ही करा आणि मला सांगा, म्हणजे पुढे नाव ठेवायला हे मोकळे. हे असंच का? ते असंच का? आधी विचारलं तर सांगायला मोकळे ना, आम्ही म्हणालो होतो असं नको, तसं करू पण तुम्ही ऐकलं नाही.
इथून तिथून, फिरून फिरून मुद्दा येतोच मध्ये, का केलं हे? कशाला केलं हे? आणि पुढल्या वेळेला लक्षात ठेवा, आपण काहीही ठरवायचं नाही, सरळ करून मोकळं व्हायचं.