नवीन नाती भुरळ पाडतात पण जूनी तिथेच असतात…
सोपं असतं जवळची नाती आपल्या आयुष्यातून सहज घालवणं कारण आता त्याच्या सगळ्या भावना तुम्हांला कंटाळवाण्या वाटू लागतात. कदाचित त्याच भावना आता कोणा नवीन व्यक्तीकडून मिळू लागल्या असतात ना! मग जुन्या नात्यांना कसं आणि का महत्व देणार ना आपण, नाहीच देणार.
का द्यावं, याचं तेव्हा अगदी स्पष्टीकरणासाहित उत्तर देखील तयार असतं. नवनवीन फुलं आवडतात, पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक फूल तोडून त्याचा सुगंध घेऊन ते फेकून द्यावं. माणसांची मनं म्हणजे काही फुलं नव्हे, प्रेमात पाडावं, भावनिक जवळता निर्माण करून मग सोडून जावं.
आणि हो, सरळ सोडून जाता ही येत नाही ना! अबोला निर्माण करायचा, केलेल्या मेसेजेसना उत्तरं द्यायची नाही किंवा मग टाळाटाळ करायची. नंतर मग अगदीच कंटाळा आला असेल किंवा कोणी बोलायला नसेल तेव्हा मग करायचा मेसेज, अर्थात फक्त वेळ जाण्यासाठी म्हणून!
हीच कहाणी वेगळी असते काही काळापूर्वी, म्हणजे बोलल्याशिवाय वेळ जात नाही; मन मानत नाही, भेटायला मन उतावीळ होतं. भेटल्या-भेटल्या मिठी मारली जाते. कित्येक गोष्टी असतात पण एका नव्या व्यक्तीच्या येण्याने सारं काही पुढल्या क्षणालाच बदलतं.
एका क्षणाला तुम्ही महत्वाचे असता आणि अगदी पुढच्या क्षणातच तुम्ही कोण आणि का ह्या इतक्या अपेक्षा माझ्याकडून, असा प्रतिसाद मिळतो. नाही मिळत वेळ, समजत का नाही? म्हणजे आधी वेळ काढला जात होता आणि आता त्या वेळेला वाटणी आली ना, मग तुम्हांला गृहीत धरलं जाऊ लागतं.
आणि मग शेवटी एक मोठं वाक्य येतं,’तू मला समजून घेत नाही’. हे दोन्हीकडून ऐकू येतं, मुलगा असो किंवा मुलगी. आता हे सगळं प्रेमातच होत असेल असं वाटेल; पण नाही, मैत्रीतदेखील असाच प्रकार घडतो. तिथेही काही वेगळं नसतं. एक वेळेस मन जड होऊन ओरडेल पण पुन्हा त्या मैत्रीत तसा गोडवा आणण्यासाठी अजिबात पुढाकार घेणार नाही.
कसं घेणार, एकदा जखम झालेली आहे आणि ती अगदी ताजी असतानाच पुन्हा तो घात अंगावर घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काही जण तितकंही करतात, पण मग त्यांना मूर्खात धरलं जातं कारण ज्याच्यासाठी हे सगळं घडत असतं त्यालाच किंमत नसते. अर्थ आणि ते नातं, दोन्हीही एका काळानंतर धूसर होऊन जातं! आणि नाती तुटत जातात अगदी सहज.