नात्यातला किंवा आठवणींतला दुरावा

दुरावा- कधी हवा तर कधी नको!

नात्यातला किंवा आठवणींतला दुरावा

शब्द जरी ऐकला तरी एकदम काटा येतो अंगावर, खऱ्या आयुष्यात असेल तर कसं होईल? आपल्या आवडीच्या गोष्टींपासून, व्यक्तींपासून दुरावा हा आपल्याला नकोसा असतो; त्याउलट नावडत्या त्रासदायक गोष्टींपासून असलेला हा छान वाटतो. सहसा काही गोष्टी असतात ज्या खूप जास्त जवळ असतात. आपल्या परिवाराला सोडलं तर एखादी जवळची मैत्री असते किंवा ते प्रेम असू शकतं.

नेहमी आपण विचार करतो की, आपल्याला जे आवडतं ते कायम जवळ हवं, आपल्याचसाठी! त्यापासून कधीच लांब नको जायला किंवा थोडाही दुरावा नको. असं सारखं मनात लागून राहिलेलं असतं. तरीही कधी काही कारणास्तव किंवा नकळत का होईना पण तसं करायला लागतं. सहन करणं हे त्या वेळी समजतं आणि काही अशक्य प्रसंगामुळे सहनशक्ती सुद्धा वाढते, तीही अनपेक्षितपणे. जेव्हा आपण आपलं मन एका गोष्टीत अडकवतो तेव्हा त्या गोष्टींपासुन आपण वेगळ्याच प्रकारचा दुरावा ठेवून असतो, जो कधी संपतो आणि कधी वाढतो, हे आपल्याला पण सांगता येत नाही.

सरळ सरळ सांगायचं झालं तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करतो तेव्हा आपण अजाणपणे दुरावा ओढून घेतलेला असतो आणि तो कायमचा असतो. जर चुकून पुन्हा त्यात आवड निर्माण झाली तर मात्र तो दुरावा संपतो सुद्धा. सगळ्यात जास्त हा शब्द आजवर आपण फक्त आणि फक्त प्रेमात ऐकला आहे. आता असं प्रश्न पडेल की प्रेमातच का? आपल्या परिवारापासून किंवा आपल्या काही जवळच्या मित्रांपासून लांब असेल तरीही दुरावा असतोच ना!

अगदी बरोबर आहे ते, पण जर आपल्यात आणि आपल्या घरच्यांमध्ये प्रेम च नसेल तर मग तो दुरावा तरी कशा बाबतीतला? आवडीचा की नावडीचा! दोन्हींमध्ये प्रेम हे असतंच; फक्त नावडीमधील प्रेम संपलेलं असतं, पण प्रेम असतंच आणि ज्या गोष्टींवर प्रेम असतं त्यापासून लांब गेल्यावर दुरावा हा येतोच. कसंही आणि केव्हाही तो क्षणिक असेल किंवा कायमचा देखील असेल. आपण ऐकतो वाईट गोष्टींपासून लांब राहणं चांगलं; तरीसुद्धा काही वाईट गोष्टी आपल्याला खूप काही चांगलं शिकवून जातात आणि ते अगदी बरोबर असतं आपल्यासाठी.

हे एक असं समीकरण आहे की, जे खूप सोपं असतं. जरी ते वेदनादायक असलं तरी ते खूप उपयुक्त देखील असतं. जास्त काही अवघड नसतं यात समजून घ्यायला कारण तो आपोआप आपल्याला समजलं जाईल अशीच परिस्थिती निर्माण करतो आणि हो, जर गैरसमज झालाच तर वेळेनुसार हाच दुरावा त्याची चांगलीच समज देतो. थोडं अवघड जातं म्हणा, हे सारं सांभाळताना पण एकदा सवय झाली की होतं ते पुन्हा पहिल्यासारखं.

प्रत्येक गोष्ट आपल्यापासून दूर जाणार असतेच हे आपल्याला माहीत असतं. फक्त ती जोवर जवळ आहे तोवर तिची किंमत नसते, पण हा दुरावाच आपल्याला त्याची जाणीव करून देतो. या दुराव्याला आपण किती ही नकार दिला तरी तो आपल्या जीवनाचा भाग आहे; मग तो प्रेमात असेल किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीत असेल, तो असतोच! जर त्याला चांगल्या बाजूने पाहिला तर तो आवडेल थोडासा, तरीही जास्त नकोच तो दुरावा आणि त्याचं आवडणं सुद्धा!

@UgtWorld



Related Posts