सहवास नात्यातल्या गोडव्याला जपायला असतोच
मनातील भाव व्यक्त करताना थोडासा वेळ लागतोच त्यासाठी पुरेसा सहवास हवा असतो. तो सहवास खूप अशा गोष्टींसाठी जागा करून देतो. अडकलेले विचार ,न व्यक्त करता आलेलं प्रेम आणि असं अजून बरच काही. दुपारची वेळ घरी दुसरं कोणी नसताना दरवाज्याची बेल वाजते. पाऊले दरवाज्याकडे वळतात आणि त्या छोटयाश्या दुर्बिणीतून बाहेर बघण्यासाठी कि आता या वेळी नेमकं कोण आलं असावं. पण बाहेरचं काही दिसेना कारण बाहेर असलेल्या व्यक्तीने त्या दुर्बिणीच्या बाहेरील भागाला झाकून टाकलं होत हाथाने. आता दरवाजा उघडण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मग तो उघडून पाहिला तर आपल्याला अपेक्षित नसणार सरप्राईज गिफ्ट जर समोर आलं कि जसे हावभाव होतात चेहऱ्यावरचे तसच काहीस झालं होत त्यावेळी.
अगदी मनातून खूपच खुश पण भारावलेलं मन सावरू देईल तर ना !. मग काय ,जरासं सावरल मनाला आणि आत यायला सांगितलं त्या सरप्राईज गिफ्टला आणि जणू आनंदाचा कहर झालेला त्यावेळी आणि चेहऱ्यावर तो स्पष्ट दिसत सुद्धा होता. एव्हाना ते गिफ्ट एक व्यक्ती आहे हे कळलंच असेल मनाला आणि तीच व्यक्ती जेव्हा आपल्याला कित्येक दिवसातून भेटते तेव्हा तो क्षण साठवून ठेवण्यासारखा असतो. कारण शब्द अबोल असून डोळ्याने बोलले जाणारे शब्दच खूप असतात आणि सोबतीला भावना मनातल्या ज्या चेहऱ्यावर हळूहळू येतच असतात. त्या क्षणी त्या व्यक्तीच येणं हे अनपेक्षित होत कारण सलग तीन चार दिवस कुठलाच संवाद झालेला नसताना हे असं होणं कुणाला अपेक्षित असेल पण असं झालं होत आणि ते खूप छान होत.
बेड(सोफा) समोरच होता त्यावर बसायला सांगितलं ,बाहेर प्रचंड गरम त्यामुळे पंखा सुद्धा फास्ट केला होता. अशा वेळी पाणी देणं हे स्वाभाविक असत पण त्याउलट एक थंडगार पेय आणून दिल ,आपण सॉफ्ट ड्रिंक म्हणतो त्यातलच एक. सहसा ते सॉफ्ट ड्रिंक नसतं घरात पण त्यावेळी किंवा त्याच दिवशी सकाळी कस कोण जाणे नकळत आणून ठेवलं होत. काचेचे दोन गोल गरगरीत ग्लास आणले आणि त्यात ते ओतलं. सोड्याचा फ़ेस ग्लासच्या काठापर्यंत आलेला आणि आता बाहेर पडतो कि काय ! असं चाललं होत. त्याला काठोकाठ भरलं आणि आता आयत्या वेळी खायला काय करावं तर एक पॅकेट भेटलं पास्ता-च. कसलीच वाट न बघता गॅस सुरु केला बर्नर वर भांड ठेवून दोन कप पाण्यात तो पास्ता पटकन केला.
जवळपास पाच ते सात मिनटे लागली असावी त्याला आणि इतक्या कमी वेळात हेच सोयीचं होत. एका डिश मधे तो पास्ता काढून घेतला आणि आता किचन मधून पुन्हा हॉल मध्ये. सोफ्यावरच ती डिश ठेवली आणि ते दोन गोल गरगरीत ग्लास जे आता बाहेरून सुद्धा भिजले होते. खरतर तो पास्ता झाला होता हवा तसा आणि तिखट ,त्यावर ते पेय एकदम मस्तच वाटत होत. गप्पाना अजून तरी सुरुवात नव्हती कारण दोघंही खाण्यापिण्यात मग्न होतो. एक घास इथून भरवायचा एक घास तिथून भरवला जायचा. असं करत तो पास्ता संपला आणि आता उरलेलं ते सॉफ्ट ड्रिंक ही संपवलं. डिश आणि ते ग्लास आत ठेवले ,आता रणांगण मोकळं होत विचारांची मारामारी होणार होती ,अर्धवट राहून गेलेली बोलणी समोर येणार होती. नजरेची घातक लढाई कि नेमकं काय असेल ते जाणून घेण्याची ती जवळपास संपतच अली होती ,जी बराच वेळ सुरु होती.
आता दोघांमधलं अंतर जरासं कमी झालेलं. भेटीचे ते दुरावे त्या क्षणीच नाहीसे झालेले आणि असं वाटतं होत कि कधी दूर गेलोच नव्हतो. शब्द खेळ सुरु झाला अखेर जेव्हा समोरून विचारपूस चालू झाली ,”काय म्हणतो ! कसा आहेस ?”. उत्तरही वाटच बघत होत कि कधी एकदा प्रश्न येतोय आणि मी जातोय त्या प्रश्नाला भेटायला. “मी मस्त आहे आता, तू समोर आहेस ना !”. हेच उत्तर येणार हे माहित होत तिला बहुदा म्हणून एक स्मित हास्य आलं पटकन तिच्या चेहऱ्यावर ,गालाची लाली उठून दिसतं होती. काही न बोलता एकमेकांकडे पाहण्यातच तेव्हाचे क्षण रंगून जात होते आणि वेळदेखील आमच्याचसाठी थांबली होती. कित्येक दिवसाची कसर त्या छोटयाश्या सहवासातून भरून काढण्याचा प्रयत्न चालू होता.
नजर इतकी गुंग झालेली कि हाताची मिठी घेत असताना दोघांचं एकटक लक्ष त्या मिठीकडेच. पुढल्याच क्षणाला मग त्या हातांची मिठी त्यांच्याकडे बघत हळुवार सोडवली आणि मग ती अलगद कुशीत आली. छातीची धडधड वाढायच्या ऐवजी हळू हळू चालली होती बहुतेक तिच्या स्पर्शाची जादू असेल. पण आपण म्हणतो ना काही गोष्टी फक्त अनुभवता येऊ शकतात ती गोष्ट शब्द सुद्धा स्पष्ट करू शकत नाही. त्या कुशीत तिच्या शरीराची उब जाणवत होती. ती निरागस पणे तशीच डोळे मिटून झोपलेली आणि मला माझ्या हृदयाची धकधक स्पष्ट ऐकू येत होती ,जणू मी तिला मोजण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यात तिच्या हृदयाची धकधक जी खूप हळुवार अगदी मधुर आवाज करत माझ्यात मिसळत चालली होती. हृदय सुद्धा आता सारखंच असावं दोघांच अस एकाच वेळी ते चालत होत.
वेळेने तशी बरीच मदत केली होती तिचा वेग कमी करत थोड्याशा काळातही बरेच अनमोल क्षण दिले होते. असा सहवास अमूल्य होता, कारण त्यात निरागस प्रेम आणि सामंज्यस अस मन होत.