मन आणि त्यातली रिकामी जागा…

मन, कधी कधी असं वाटतं आपल्याला की आपल्या मनात कित्येक गोष्टी सुरु आहेत. पण अंततः असं जाणवतं की तसं काहीच नाहीए. तो फक्त आपला भ्रम आहे. मुळात तिथे असणाऱ्या गोष्टी या नसतातच. तिथे असतो तो त्यांचा उरला सुरलेला भास. त्यामुळे हा जो भास आहे तो भाग पडतो विश्वास ठेवायला कि विचार आणि गोष्टी आहेत तिथे. पण अस्तित्वात असं काहीच नसतं.
मुळात आपण ज्या विचारांच्या वाटेवरून जात असतो ती वाट केव्हाच संपलेली असते. पण ज्या उरलेल्या पाऊलखुणा असतात, त्या मात्र आपल्याला खात्री देण्याचा प्रयत्न करत असतात. जेणेकरून आपण पुन्हा विचार करायला मोकळे. जे विचार नव्हते मनात ते तिथे येण्याची जणू वाटच बघत होते. म्हणजे त्यांना हवं तसं बीज रोवता येईल त्यांचं. नंतर आपण सुरु होतो पडताळणी करायला काय काय वाढलंय आपल्यासाठी ते बघायला.
खरं तर आपण हे सोडून द्यावं असं सगळेच सांगू लागतात. “अरे जरा विचार कमी करत जा, किती तो ताण डोक्याला.” आता त्यांना सांगेल तरी कोण कि मनातले विचार हे मुळातच नाहीत. तर त्यांचा फक्त भास च आहे. जो पुरेसा आहे झोप उडवायला कोणाचीही. पण त्यालाही काही पर्याय असणारच. कारण प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, मग याला नसावा असं होणं शक्यच नाही. फक्त तो काय आहे हे शोधणं गरजेच आहे सध्याला. हल्ली बरीच जण बेचैन असतात त्यांची त्यांची कारणं आहेत म्हणा! पण स्वतःकडे लक्ष देणं हे ही तितकंच महत्वाचं आहे.
रिकामं मन जेव्हा भरत जातं ते रिकामं होणं थोडं अवघड होऊन जातं. कारण प्रत्येक जण ते सांगेलच असं नाही. काही जण ते स्वतःकडेच ठेवतात. कोणालाही सांगून स्वतःच हसू करून घेण्याऐवजी ते बरं, नाही का! काही जण मात्र पटकन मन मोकळं करून टाकतात त्यांच्या माणसांकडे किंवा त्यांना ज्यांच्या कडे ह्या गोष्टी बोलायला सोपं वाटतं तिकडे. पर्याय फक्त मिळायला हवेत त्या त्या वेळेला मग गोष्टी सोप्या होतात. नाही मिळालं तरी हरकत नाही पुढल्या क्षणाला पर्याय असतोच. फैज अहमद फैज यांनी लिहिलंच आहे,
दिल ना उमीद तो नहीं नाकाम ही तो है,
लंबी है ग़म की शाम मगर शाम ही तो है