कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच ‘ऑनलाइन’ आहे.
सोशल मीडियावर सोसेल तितकंच वावरणाऱ्यांसाठी हे लिहिलेलं नाहीये तरी तुम्ही वाचलत तरी काही हरकत नाही. आज इथे मी सोशल मीडियावर हृदयाच्या अंतापासून व्यक्त होणाऱ्यांचा अनुभव सांगणार आहे. बदलत्या जगात ऑनलाइन जग सुद्धा बदलत गेलंय, जिथे फुल फॉर्म होते तिथे शॉर्ट फॉर्म आले, जिथे फक्त चॅटिंग होती तिथे डेटिंग आली, आणि डेटिंग ऍपस् मूळे ऑनलाइनच मीटिंग सुद्धा झाली. छोट्या छोट्या गोष्टींचे अर्थ मोठे झाले, एका इमोजीच्या मागे अनेक इमोजी सर्रासपणे आले आणि त्यांचेच नकळत चेहरे सुद्धा झाले. प्रत्येक भाव व्यक्त करण्यासाठी ऑनलाइन, प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी ऑनलाइन, प्रत्येक मूड स्वतःला सोडून जगाला सांगण्यासाठी ऑनलाइन… आणि जवळजवळ सगळंच ऑनलाइन. कसं? हे आता तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आणि गरज नसली तरी मी सांगणार… कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच ‘ऑनलाइन’ आहे.
प्रत्येक भावभावनांसाठी इमोजी होतेच पण त्यासोबतीला आलेल्या ऑनलाइन बिनलाइन गोष्टी. ह्याही तितक्याच महत्वाच्या आहेत. अर्थात प्रोफाइल, स्टेटस, स्टोरी, स्नॅप, चॅटिंग, पोस्टिंग, टॅगिंग अगदी सगळंच अपडेट ठेवणं किती कठीण असतं. या बदलत्या ऑनलाइन जगात ‘काही जणांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती सुद्धा निराळ्या आहेत. जसं की, एखाद्याला आनंद झाला की आनंदाचे इमोजी पण तेच जर दुःख झालं किंवा राग आला की मात्र व्यक्त होण्यासाठी एकमेव ओळख असणारा DP म्हणजेच Display Picture दिसेनासा करणे (हे करून कोणतं समाधान मिळतं हे मला comments मध्ये नक्की सांगा) आणि मग अजून थोडं व्यक्त होण्यासाठी ‘इमोजी स्टेटसवर ठेवून मला राग आलाय हे जगभर सांगणे, मी कधी try केलं नाहीये पण बहुतेक याने राग कमी होत असावा!! बरं ह्या सगळ्यांच्या पलिकडे रागाचा बांध फुटणे म्हणजे ब्लॉक अनब्लॉक. याबद्दल नाही बोललेलंच बरं.
सोशल मीडियावर सोशल वर्क करणं हे खूप कठीण असतं पण काहीजण ते सुद्धा खूप छान करतात. म्हणजेच स्टेटसवर अगदी फुकट Spotify उपलब्ध करून देणारे तेही without adds. आपला मूड कोणताही असो, आपल्याला आपले आवडते गाणं त्यांच्या स्टेटसवर मिळणारच!! त्यात मग ब्रेकअप झालेल्यांसाठी ‘Bekhayali me bhi tera hi khayal aaye असो किंवा रात्री अपरात्री Aaj din chadheya’ असो, Anytime ready for us!! काहींचे स्टेटस हे स्टेटस कमी आणि मंदिरच जास्त वाटतात. दर दिवशीचा देव त्यांच्या स्टेटसवर न चुकता दर्शन देणारच. आणि काहींचे स्टेटस हे बघणाऱ्याच्या डोळ्याला लकवा मारून जातात आणि म्हणून ते आयुष्यभर hide असतात. काहीजण त्यांचं छान चाललेलं आयुष्य शेअर करतात, त्यांची स्वप्न स्टेटसवर शेअर करतात पण काही जण तीच स्वप्न “Send me” म्हणून मागून घेतात. त्यात काही लोक त्यांच्या आयुष्यात इतके बिझी असतात जे कधी ऑनलाइनच येत नाहीत. आले तरी आपले मॅसेज बघत नाहीत आणि बघितले तर रिप्लाय देत नाहीत. त्यांना मॅसेज केला की ते जवळपास दीडएक महिन्यांनी एका वाक्यात रिप्लाय देतात “Are jara busy hoto, Sorry”. हे तेच असतात जे परीक्षेला “माझा अभ्यास झाला नाही” म्हणून Exam Top करतात. माझं वैयक्तिक वैर आहे यांच्याशी.
आता चॅटिंगचा विषय निघालाच आहे तर जरा चॅटिंग विषयी बोलूयात. आपण ज्यांना काडीमात्र भाव देत नसतो त्यांचाच प्रत्येक सेंकंदला मॅसेज येतो. बरं मॅसेज येतो ते येतो पण बरोबर मॅसेज मध्येच ते माती कसे खाऊ शकतात हे? म्हणे “Hii, kashiyes?, jevan zala ka?, jevlis ka?, Bhandi ghaslis ka?, Kontya sabnane ghaslis?” अरे तुला काय करायचंय!!! ह्यांना इग्नोर पण करू शकत नाही म्हणून रिप्लाय देणं हे आपलं परम कर्तव्य समजून रिप्लाय देणारे फक्त “Hmm, k, kk” एवढंच बोलून कसं काय भागवू शकतात. खरं कौतुक त्यांचं वाटतं जे व्हाट्सएपला भातुकली समजून इमोजी इमोजी किंवा स्टिकर स्टिकर खेळतात. हे तेच असतात ज्यांना लहानपणी कच्चा लिंबू म्हणून खेळवायचे. असो! तो चॅटिंग विश्वातला स्वतःचा वेगळा असा समाज, देश, जग करून राहणारे बाबू, बच्चा, शोना, पिल्लू, कुकुडी, मुकुडी ह्या प्रजातींविषयी इतकं काही बोलणार नाही, कारण त्यांनी बोलायला कुठे जागाच ठेवली नाहीये…
मग येतात व्हाट्सएप ग्रुप. शाळेच्या दिवसात अस्तित्वात असलेल्या प्रत्येकाच्या ‘Friends Forever’ नावाच्या ग्रुपसमोर आताचे मोठे मोठे ग्रुपस् फिके पडतील. तरी काही ग्रुप असे आहेत जे दिवसरात्र सुरूच असतात आणि आपल्यासारखेच कित्येक जणांना माहीतच नसतं की त्या ग्रुपमध्ये नक्की काय सुरू आहे. मग आपण ढोबळमानाने त्या हजार-दीडहजार मॅसेज खाली एक मॅसेज टाकतो “A kay bollayt evdha?, Mla pn sanga na!” नाही म्हणजे इतका निरागसपणा येतो कुठून?
सगळ्यात महत्त्वाचे आणि लक्षणीय आणि प्रेक्षणीय म्हणजेच मॅसेजवरून मूड ओळखणारे. हे सहसा कोणाला जमत नाही पण काहींना स्वतःवर इतका विश्वास असतो की त्यांना सतत हेच वाटत असतं की आपलं काहीतरी बिनसलंय. जसं की छोटे रिप्लाय दिले म्हणजे आपलं काहीतरी बिनसलंय, स्टोरी रिपोस्ट नाही केली म्हणजे बिनसलंय, फोटो खाली कॉमेंट नाही केली म्हणजे बिनसलंय, सकाळी रात्री गुड मॉर्निंग आणि गुड नाईट नाही पाठवलं म्हणजे बिनसलंय, जेवताना जेवलीस का असं विचारलं नाही तरी आपलं काहीतरी बिनसलंय… ह्याला काय अर्थ आहे? आणि ह्या सगळ्यातून सुटका म्हणून काहीकाळ आपण ऑफलाईन गेलो किंवा मोकळा श्वास घेत असलो की तेव्हाच नेमकं कोणीतरी कॉल करतं आणि बोलतं की “भावा ऑनलाइन ये, मला महत्वाचं बोलायचंय” अरे कॉल केलाच आहेस तर चार शब्द तोंडाने बोल ना पण नाही आम्हाला चॅटिंग शिवाय फीलच येत नाही!
जगप्रसिद्ध असं इन्स्टाग्राम जिथे आपण आणि आपली ओळख कितपत लोकांपर्यंत मर्यादित आहे हे जाणतो. जिथे follow केलं की ओळखीचा, follow back केलं की जवळचा आणि unfollow केलं की शत्रू हे विभाग पडतात. पण इथे ही माती आहेच जी त्यांच्या इंस्टा bio मध्ये विखुरलेली दिसते/खाल्लेली दिसते जस की “eake murder on 30 Feb, King of Mumbai, Pro, Papaki pari, Aaicha babadya” अशा अतिसुंदर विक्षिप्त माहितीने त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली असते आणि नवल ह्याच गोष्टीचं वाटतं की ह्यांचे followers Ik पेक्षाही जास्त असतात. आणि या सगळ्यांचे वडीलधारे म्हणजे Facebook. जे या सगळ्यांना जोडून ठेवतात. तिथेही परिस्थिती वेगळी नाहीये पण काही जण फक्त मित्राच्या फोटोला Haha रिऍक्ट करायला आणि like केल्यावर येणार “टुचुक” हा आवाज ऐकायला Facebookवर भेट देतात.
हे सगळं पुरे नव्हतं म्हणून मग आलं Snapchat. हो हो, माझ्यासारखे कित्येक अतिप्रमाणिक लोक कुत्र्याचे, मांजरींचे filter लावून फोटो काढायला Snapchat वापरतात पण ते Snap streaks? ते का असतं हे अजून तरी कळलं नाहीये. माझे एकसोबत 100 पेक्षा जास्त Streaks झालेयत. त्यावर काही गिफ्ट वैगरे मिळणार असेल तर नक्की कळवा.
या ऑनलाइन जगात सगळ्यात मोठा या सगळ्यांपेक्षा वेगळा असा Scam सुरुये. ज्याने Netflix, Zee5, Voot, Amazon Prime Video, SonyLiv यांसारख्या कित्येक OTT चॅनल्सना देशोधडीला लावलंय तो म्हणजे टेलिग्राम. जिथे चॅटिंग होत नाही पण चिटिंग होते. कोणताही चित्रपट असो वा सिरीज तिथे फुकटात उपलब्ध होतात. नाही म्हणजे मीही तिथलाच एक आहे पण तरी… (चलता है) ज्यांना टेलिग्राम वापरता येत नाही ते त्याला Uninstall करतात आणि त्याला शिव्या घालतात. अरे पाप लागेल तुम्हाला वेड्यांनो, पाप. अरे आयुष्यात कधीतरी काहीतरी स्वतःहून समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण नाही आम्हाला प्रत्येक गोष्ट हातातच हवीय!
सध्या ऑनलाइन बिनलाइन जरा जास्तच सुरुये अगदी तुम्ही कॉलेज मध्ये लेक्चर बंक करून मनापासून चौपाट्यांवर हिंडायला जायचात, फिरायला जायचात पण आता मात्र तुम्ही फक्त लेक्चरला हजेरी लावून मनापासून अंथरुणात जाता. ऑनलाइन खूप जास्त गप्पा होतात पण तेच समोरासमोर आलं की का गप्प होतात? आपण आपला स्वभाव ऑनलाइन केलाय, आपण ऑनलाइन झालोय आणि बहुतेक त्यामुळेच ऑफलाईन जगात वावरणं आपल्याला जमत नाही. सध्याच्या ऑनलाइन जगात हे चालायचंच. फक्त या सगळ्यातून ऑफलाईन जगात वावरणं सोडू नका कारण ऑनलाइन जगात आपण आपली कितीही मोठी ओळख निर्माण केली तरी ती आपल्याला ऑफलाईन जगातच शेवटपर्यंत टिकवायची आहे.