प्रवासाचा दिवस सोबतीचा सहवास…
सकाळी सकाळी सुखाची झोप मोडून कुठे जायचं म्हणजे वैतागच! पण काय करणार, वेळप्रसंगी कामच अशी असतात की जावं लागतं. कधी कधी कामा व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी जावं लागतं मग ते फिरण्यासाठी असेल किंवा कोणाला भेटण्यासाठी. असंच एक दिवस फिरण्यासाठी काढलेला असतो आपण, खूप काही ठरवून ठेवलेलं असतं, असंच करायचं तसंच करायचं वैगरे वैगरे. अशीच सकाळची वेळ होती, तयारी चालू असताना कॉल आला,”निघ लवकर घरातून. अजून किती वेळ?” पटापट आवरून निघालो घरातून. मोजून ६ जण आम्ही. सगळे स्टेशन ला भेटणार होतो, त्या हिशोबाने मी ऑटो पकडून स्टेशनला पोचलो.
सगळे अगदी तयारीनिशी आलेले, डेस्टीनेशन होतं दार्जिलिंग! ट्रेनची अनाऊंसमेंट झाली, सीट रिझर्व होत्या त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. बसलो आम्ही ट्रेन मध्ये आणि आमचा प्रवास सुरु झाला. हळू हळू ट्रेनने स्पीड वाढवत जलद अंतर कापायला सुरुवात केली. आमच्यात ४ मुलं आणि 2 मुली होत्या. धिंगाणा चालू होता नुसता, जोरजोरात गाणी,मस्ती आणि बरंच काही! काही वेळाने सगळे दमून झोपी गेले. काही वेळाने पाणी पिण्यासाठी म्हणून जाग आली तेव्हा बघितलं तर सगळे झोपलेले आणि आमच्यातली एक व्यक्ती गायब होती. उठून इथे तिथे नीट बघितलं, म्हटलं फ्रेश वैगरे होण्यासाठी गेली असेल त्यामुळे आणखी काही वेळ वाट पाहिली. अर्धा तास झाला तरीही तिचा काही पत्ता नाही, आता कोणाची झोप मोड करून त्यांना काही विचारणं व्यर्थ वाटत होतं मग म्हटलं, आधी आपणच बघू कुठे दिसतेय का?
ट्रेन क्रॉसिंग होती वाटतं त्यावेळी, त्यामुळे ट्रेन प्लॅटफॉर्मलाच उभी होती. मी हिला शोधत शोधत दरवाज्याजवळ आलो. खाली उतरलो, भर उन्हाची वेळ म्हणून की काय, वर्दळ कमी होती. एका ठिकाणी नीट बघितलं तर ही दिसली, एकटीच बसलेली. “काय इथे अचानक! कोणाला माहीत पण नाहीये तू इथे आहेस. सगळे नुसते गाढ झोपेत.” “काही नाही, सहजच आले. बोर झाली होती बसून आणि झोपून तिकडे. मग आली जरा बाहेर!” “असं शांत शांत राहिलीस की कळून येतं तुझं काहीतरी बिनसलं आहे ते, तुला हवं असेल तर तू बोलू शकतेस माझ्याशी!” “आठवण आली रे जुन्या गोष्टींची, काही माणसं सहज जातात ना यार निघून! आपण काहीच करू शकत नाही त्यावेळी आणि त्यांना मनातून काढावं म्हटलं तरी जमत नाही.” “हो,ती माणसं जवळची असली की असंच होतं. ना धड विसरू शकतो ना धड बोलू शकतो, काहीच राहत नाही पहिल्यासारखं!”
“ते सगळे किती शांत झोपलेत ना! कुणाला माहीत सुद्धा नसेल आपण बाहेर आहोत आणि त्यातही मी कधीपासून बाहेर आलीए हे तर बिलकुलच माहीत नसेल.” “एवढं लक्षात ठेव, हातात असलेली वेळ आणि चांगले करता येणारे क्षण हे कधीच निसटू देऊ नये. आणि…” तितक्यात हॉर्न वाजला. आम्ही परत आलो ट्रेन मध्ये, आपल्या आपल्या जागेवर येऊन बसलो. काहीजण उठले होते तर काहीजण अजून ही अगदी स्वप्नांच्या दुनियेत! तिथून पुढचा वेळ असंच गप्पा-गाणी, एकमेकांची टिंगलटवाळी करण्यात गेला आणि आम्ही पोहचलो आमच्या डेस्टिनेशनला, तब्बल दीड दिवसांनी!
आम्हाला घ्यायला एक मित्र येणार होता. त्याचीच मग आम्ही वाट बघत थांबलेलो. काही वेळाने एक स्कॉर्पिओ आली, त्यात तो मित्र होता. आम्ही सगळे त्यात बसलो आणि त्याच्या घरी जायला निघालो. रस्ता इतका सुंदर, आजूबाजूला नुस्ती गर्द झाडी, रंगबेरंगी फुलांच्या बागा, चहाचे मळे आणि खूप काही. संध्याकाळ सरत आलेली आणि इतक्यातच अचानक गाडी बंद पडली. आम्ही सगळे जण बाहेर आलो. आजूबाजूला फक्त झाडे आणि आणि तो लांब वळणावळणाचा रस्ता. आता लिफ्ट मागावी म्हटलं तर दुसरी कुठली गाडी ही येईना आणि दुसरं म्हणजे वातावरणात वाढलेला गारवा! अंगावर स्वेटर असूनही सगळे अगदी कुडकुडायला लागले होते. मग काय, आम्हीही तयारीनिशी गेलेलो!
काही हुशार होते ज्यांनी टेंट आणलेले, तेच तिथे जवळपास जागा बघून लावले. जे काही आमच्याजवळ होतं ते खाल्लं आणि बसलो छान शेकोटी करून! आता तो मित्र तिथलाच होता म्हणून लाकडं आणण्यापासून टेंट करायच्या ठिकाणापर्यंत सगळीकडेच त्याची मदत झाली. गप्पांच्या मैफिली, रातकिड्यांची किर्रकिर्र, शुभ्र दाट चांदणं आणि सोबतीला अर्धा लपलेला चंद्र; इतकं सुंदर दृष्य होतं ते, अगदी डोळयात साठवून ठेवावं असं! अचानक खराब झालेल्या गाडीमुळे इतका छान अनुभव आला आणि तो सगळ्यांना चांगलाच लक्षात राहिला. त्यावेळी काही असे क्षणही आले जे कोणी कधीही विसरणार नाही. कारण त्या ठिकाणी त्या रात्री अश्या काही गोष्टी घडल्या ज्यामुळे सर्वांना तो दिवस आठवणीत राहील कधीही विसरला जाऊ शकत नाही आणि त्या गोष्टी कोणत्या आणि कोणते ते क्षण हे कळेल आपल्याला लवकरच…
तोपर्यंत प्रवास चालू ठेवा आणि प्रवासातल्या आठवणी साठवून ठेवा. Continue Reading…