प्रवास २ – फिरण्यासाठी काढलेले दिवस!

फिरण्यासाठी ची कायम राहिलेली आठवण…

प्रवास २ - फिरण्यासाठी काढलेले दिवस!
प्रवास २ – फिरण्यासाठी काढलेले दिवस!

फिरण्यासाठी आलेलो असताना अचानक खराब झालेल्या गाडीमुळे आम्ही टेंट बांधलेला. थंडी खूपच वाढत होती मग त्या ठिकाणी आम्ही शेकोटी केली. सगळ्यांना भुका लागलेल्याच मग सगळे आता जेवणाच्या तयारीला लागले. एक एक करून सर्वजण कामाला लागले, काही जेवण बनवत होते तर काही बाकीची कामं आवरत होते. छान हसत खेळत जेवण सुद्धा आटपलं. सर्व आता निवांत बसलेले आपल्या आपल्या गोष्टी सांगत, अश्या वेळेचं वैशिष्ट्यच म्हणा ते! या सगळ्यात कोणाला वेळेचं भानच नाही राहिलं.

मध्यरात्र उलटून गेली तरी कोणाच्या चेहऱ्यावर झोपेचे चिन्हच नव्हतं. जणू काही सगळे आताच येऊन बसलेत मैफिल रंगवायला! त्या मैफिलीत ही एक व्यक्ती अशी होती जी जास्त काही बोलत नव्हती, तिचं नाव मृणाली आणि हिच जी स्टेशन वर जाऊन बसलेली. तिच्या जवळच बसलो होतो. तिला ऑलरेडी सगळे बोलून झालेले, काहीतरी बोल, बोल पण नाही, ती शांतच! काही माहीत नाही अचानक ती खूप नर्व्हस झालेली. एकदम स्तब्ध आणि गूढ विचारात गुंतलेली. सगळे हळू हळू टेंट मध्ये झोपायला जाऊ लागले. ही अजून तशीच, म्हटली नंतर येते मी. काही जण बसले होते थोडा वेळ पण नंतर ते ही निघून गेले. तेवढ्यात तिनेच मला आवाज दिला आणि बोलावलं.

“किती छान वेळ आहे ही. असं वाटतं ह्या वेळेला कैद करून ठेवावं आणि कधीच सोडायचं नाही या कैदेतून.” “काही प्रॉब्लेम झालाय का? आल्यापासून तू अपसेट आहेस आणि मगाशी पण कुणाशी जास्त काही बोलत नव्हतीस फक्त थोडं थोडं मोजकच.” “काही नाही रे, सहजच! मी ट्राय करत होते सगळ्यांमध्ये खूष रहायला, नाहीतर उगाच बोलले असते, चेहरा पाडून बसलीय.” “तेच तर विचारतोय तुला, नेमका काय आहे मनात, सांग तरी! खूप अस्वस्थ झालंय तुला असं पाहून.” “नको इतकं टेन्शन घेऊ. काही क्षणांसाठीच आहे हे,जाईल निघून ही वेळ पण, तू नको काळजी करू.” “किती मनात ठेवणार आहेस? तू बोलून मोकळं कर स्वतःला आणि मला ही.”

“एक खंत आहे मनात माझ्या, आपल्या मैत्रीत जो काही वेळ आपण घालवलाय, तो किती वेळ ठेऊ शकतो आपल्याकडे!” “जोपर्यंत तुझं मन ठेवेल तोपर्यंत ते राहील, अगदी कायम स्वरूपी! आणि जर नसेल ठेवायचं तर पुढील काही क्षणात जाईल सुद्धा!” अचानक हे सर्व का, असं तिला विचारणार तितक्यात तिचा हात मला लागला जसं ती मला स्वतःला सावरण्यासाठी पकडत होती आणि ती खाली पडली. आम्ही आभाळाकडे बघून बोलत होतो त्यामुळे आधी माझं लक्ष नव्हतं पण नंतर तिच्या स्पर्शामुळे आणि तिच्या पडण्यामुळे माझं लक्ष गेलं. आपली मैत्रीण अगदी बोलता बोलता आपल्या डोळ्यांदेखत बेशुद्ध पडते, अस होणं अपेक्षित नव्हतं. मी सर्वाना आवाज दिला आणि बोलवलं. तिला उचलायला गेलो तर तिने अंगच टाकून दिलेलं आणि श्वास घेणं सुद्धा बंद केलेलं! सगळंच खूप भयानक होतं.

प्रवास २ - फिरण्यासाठी काढलेले दिवस!
प्रवास २ – फिरण्यासाठी काढलेले दिवस!

अंगावर शहारे आलेले, भीतीने घामाच्या धारा वाहत होत्या. सगळे घाईघाईने जवळ आले, तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून वैगरे तिला उठवायचा प्रयत्न करू लागले. मी तर घडलेल्या प्रसंगामुळे स्तब्धच झालेलो. काय घडतंय त्यावर विश्वासच बसत नव्हता. अस अवेळी काही होईल ह्याची साधी कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती. नेमकं झालं काय हेच समजत नव्हतं. आम्ही सगळे तिकडे तसेच बसून होतो कारण त्या क्षणाला कोणाकडून काही मदत मिळणं हे अशक्यच होतं. मोबाईल बंद झालेले, रेंज नव्हती. एखादी गाडी सुद्धा दिसत नव्हती. सगळे हताश झालेले आणि आपल्या आवडत्या मैत्रिणीची अशी अवस्था पाहून कोणालाही अश्रू आवरत नव्हते. बऱ्याच वेळाने एक गाडी आली, त्यांचाकडे लिफ्ट मागून त्या गाडीत तिला घेऊन गेले. छोटा टेम्पो होता त्यामुळे त्यात आम्ही सगळे जाऊ शकत नव्हतो मग मी आणि अजून एक मित्र सोडून बाकीच्यांना पुढे पाठवलं आणि आम्ही दोघं मागच्या गाडीने गेलो.

तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये तिला नेलं. तिथे नवीन असल्याने पोलीस केस झाली, पोलिसांनी सगळ्यांची कसून चौकशी केली आणि आम्ही मित्र मैत्रिणी असल्यामुळे सगळी सविस्तर माहिती घेतली. बॉडीच पोस्टमार्टेम झालं आणि रिपोर्ट्स मध्ये मृत्यूच कारण अचानक श्वास बंद झाल्यामुळे मृत्यू झाला असेल, असं आलं. सोबतच हे ही कळून आलं की मागील खूप महिन्यांपासून ती आजारी होती आणि तेच तिच्या अकाली मृत्यूच कारण झालं. तिच्या आईला घाबरत घाबरत कसं बसं घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली आणि तिच्याबद्दल कळवलं. सगळं संपलं होतं त्या क्षणी. तिने कुणालाही या गोष्टीची भणक सुध्दा लागू दिली नाही आणि या प्रवासात मधेच साथ सोडून ती निघून गेली. कुणाची वेळ आली की कोणी कसंही आपल्याला सोडून जातं. प्रवासातल्या काही चांगल्या आठवणी आणि आम्हाला तिची ही कायमची मैत्री अशी एक वेगळीच आठवण देऊन गेली. असा हा प्रवास संपला, अगदी प्रवासाच्या सुरुवातीलाच!

@UgtWorld

Related Posts