प्रेमरंगी संध्याकाळ दोघांसाठी सुद्धा सजलेली…
एक संध्याकाळ अशीच फिरतीवरची, मंद वाऱ्याची झुळूक घेत गाणी गुणगुणत चाललेली. तिची जणू इच्छाच पूर्ण झाली असावी अशी ती वागत होती. तिचा आनंद ती मनसोक्तपणे वाटत चाललेली. तिच्या त्या सुखात सर्वांना भागीदार बनवत चाललेली. बहुतेक ती सुद्धा कोणाच्या तरी प्रेमात पडली होती. अशाच एका संध्याकाळी ते दोघे भेटणार होते, त्यांच्या प्रेमळ मैत्रीला वेळ द्यायला. हलक्याफुलक्या शब्दाने स्वागत करत हात मिळवणी करून एक हक्काची अशी मिठी घेत. त्या मिठीतुन व्यक्त झालेले अबोल शब्द वेचत त्यांनी बोलणं सुरू केलं. साधी-सुधी चर्चा तात्पुरती होती त्या वेळी, नेहमीची भेट आणि आजच्या भेटीत बराच फरक जाणवत होता.
दोघेही आज अगदी मन बेचैन असल्याप्रमाणे वागत होते. आज त्यांच्या मैत्रीच्या मोकळेपणाला जणू प्रेमाचा हलका वारा लागलेला. मैत्रीतून प्रेमात जायला अडचण अशी का यावी,आपण बहुदा विचार करून एक तर सोडून देतो किंवा मग त्या प्रेमाच्या वाटेवर चालू लागतो. तसंच आता वाटू लागलं होतं सारं काही, तो माहोलच असा रमला होता. त्यांचं मैत्रीचं नातं बदलेल की काय पण असं झालं नाही, ते पूर्ववत बोलू आणि मस्ती करू लागले. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय असं तो म्हणाला आणि तिला एक छोटंसं गिफ्ट दिलं. ते तिच्यासाठी अगदी अनपेक्षित होतं कारण या आधी अश्या प्रकारे कधी गिफ्ट्स ची देवाणघेवाण झाली नव्हती. त्यामुळे ही तिच्यासाठी त्यांच्या मैत्रीतली नवीन च गोष्ट होती. त्याने तिला ते गिफ्ट ओपन करण्यासाठी आग्रह केला आणि म्हटलं, सांग कसं आहे ते?
तिने ते गिफ्ट ओपन केलं आणि त्याच्याकडे बघितलं. तो अगदी ती काय बोलेल ह्या काळजीत बेचैन झालेला. तेवढ्यात तिने हलकं स स्मित हास्य दिलं आणि म्हटली खूप सुंदर आहे गिफ्ट, मला फार आवडलं. गिफ्ट मध्ये एक गुलाब होतं आणि अनेक गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला एक छोटासा बॉक्स, ज्यामध्ये त्या दोघांच्या फोटो ची छानशी फ्रेम होती. तिने खुश होऊन त्याला पटकन मिठी मारली आणि त्याचे गाल अगदी लालबुंद झालेले.
काही क्षण स्तब्धच झालेला तो कारण नेहमीसारखी मिठी नव्हती ती, त्यात बरेच नवीन भाव जाणवत होते. त्या क्षणात तो अडकला होता आणि ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्या ओपन गार्डन मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती, ते छान मधोमध हिरव्यागार गवतावर बसले होते. तिने त्याला विचारलं,”हे आज का दिलं? आज काही खास आहे की सहजच?” त्यावर तो म्हणाला,” आपल्या मैत्रीला छान नाव देऊ स वाटलं बस म्हणून!” “आणि ते काय आहे, सांगशील?” ते ऐकून त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. काही वेळ तर तो शांतच होता आणि तीही त्याच्या डोळयांत बघत उत्तर शोधायच्या प्रयत्नात होती.
नजरेची कमालच अशी असते, डोळे बोलायला लागले की शब्दांची गरज च भासत नाही. त्याने तिचा हात आपल्या हातात धरला आणि म्हणाला,” या मैत्रीला आता प्रेमाच्या सोबतीची गरज आहे. तीच मैत्री जर प्रेमात असेल तर तिला आपोआप एक नाव मिळेल आणि ते असं की आपण मित्र-मैत्रिणीतून प्रेयसी-प्रियकर बनू आणि त्यामुळेच आपण एकत्र येऊ एक जोडपं म्हणून!” तिचा हात अजूनही त्याच्याच हातात होता. ती त्याकडेच बघत होती. ती होकार देईल असं त्याला वाटत होतं पण नाही म्हणेल की काय अशी किंचित भीती ही होती.
तिने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि तो हातात असलेला हात काढून घेत उभी राहिली. तो समोर होता आणि ती त्याच्या बाजूने जाऊ लागली होती. तो त्याची नजर खाली करून बसलेला,त्याने वळूनही मागे पाहिलं नाही. तितक्यात त्याच्या कानाजवळ हळूच तिच्या ओठांचा स्पर्श झाला आणि तो स्पर्श होता तिच्या शब्दांचा. “मला तू आवडतोस आणि माझं प्रेम आहे तुझ्यावर! मला माझं पुढचं आयुष्य तुझ्या सोबत घालवायला आवडेल. तुला आवडेल का तुझं हे आयुष्य माझ्यासोबत घालवायला?” तो एकदम आश्चर्यचकित झाला.
त्या वेळी काय करू आणि काय नको असं त्याला झालेलं. तिथून उठून त्याने तिचा हात पुन्हा आपल्या हातात घेऊन त्याला हळूच किस केला आणि तिला म्हणाला,”हो, नक्कीच आवडेल मला तुझ्या सोबत!” त्या क्षणापासुन त्यांनी धरलेला एकमेकांचा हात संपूर्ण गार्डन फिरे पर्यंत तसाच होता आणि तिथून निघताना सुद्धा ती पकड तशीच होती, जणू काही ती आता पक्की झाली होती. तिच्या प्रेमाची कबुली आणि त्याच्या मनातल्या प्रेमाची एकी झाली होती. ते त्यांच्यासाठी अगदी एखाद्या स्वप्नाची पूर्तता झाल्याप्रमाणे होतं. आणि साहजिकच आहे कुठल्याही व्यक्तीला आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीकडून प्रेमाची कबुली मिळाल्यावर असंच काहीसं होतं, जसं त्या वेळी त्याच आणि तिचं झालं होतं. ती संध्याकाळ खरंच अविस्मरणीय अशी होती, अगदी प्रेमरंगी संध्याकाळ दोघांसाठी सुद्धा!
Ekdm bhari.
Thank you ?
Khup chan
धन्यवाद! आपला वेळ छान जावो..