सुखाला विरजण पुन्हा एकदा!

सुखाला हलकं का असेना दूर लोटलं जातं…

सुखाला विरजण पुन्हा एकदा!

सुखाचे चार क्षण घालवणे असा विचार जरी आला तरी पुढच्या क्षणी काही ना काही वाढून ठेवलेलं असतं. पुन्हा मग ती सुरुवात आणि पुन्हा ठरल्या प्रमाणे त्या सुखाला विरजण. पण मग असं का होत असेल? काहीतरी सुरू ठेवण्यासाठी काही ना काही होत राहणं, हा निसर्गाचा नियमच आहे.

काही जण एकच विषय घेऊन रडत बसतात, असंच झालं, तसंच झालं; आणि त्यात पुढे जाण्याच्या मार्गाकडे सहजतेने दुर्लक्ष केले जाते, पुन्हा तेच रडगाणं सुरू. तसंच मग हाती असलेली संधी सोडून आपण परिणामांची गळाभेट करण्यासाठी तयार झालेलो असतो. मुभा असते आपल्याकडे त्या प्रत्येक वेळेची, वेळेवर सावरण्याची आणि वेळेला संधी देऊन आपल्या खोट्या मतांना मोडीस काढण्याची.

पण आपल्या डोळ्यांवर एक पडदा असतो. त्या पडद्यावर लिहिलेलं असतं. कोण काय बोलेल आपल्याला जर आपण हा निर्णय घेतला तर, पण महत्वाची गोष्ट विसरली जाते, ती म्हणजे जीवन. जीवन आपलं आहे आणि दुसऱ्यांच्या मताने ते नाही चालत. तेच मनावर हल्ली मोठा घात करतात. सुखाला हलकं का असेना दूर लोटतात.

माझ्या मित्रांचा जर दृष्टिकोन माझ्याबद्दल बदलला तर माझं काय होईल? मला ते पुन्हा आहे तसं स्वीकारतील का? असे हजारो मतांची हजारो प्रश्न आपल्याला पडतात. पण खरंच जर कोणाला तुमची काळजी असेल तर ते तुम्हांला तुम्ही आहात तसं नक्कीच स्वीकारतील, मग त्यात कोणीही असो, परिवार, मित्रमैत्रिणी, प्रेयसी-प्रियकर वा आणखी कोणी. कारण त्यापेक्षा इतर काही कोणाला महत्वाचं वाटत असेल तर त्याला आपण स्वार्थच म्हणू शकतो, दुसरं काही नाही!

ज्याने हा स्वार्थ पाळला त्याने नात्याचा गळा दाबला. त्याचा हेतू हा त्यावेळी नाही तर नंतर उघडकीस येतो जेव्हा दोघांपैकी एकाचा घात होतो आणि विश्वास उडतो. सारं काही समज आणि सांभाळल्या गेलेल्या त्या वेळेवर निर्भर करतं आणि ते फार कमी वेळा होतं! सुखाला विनवण्या करण्याऐवजी थोडंसं मनातलं सांभाळलं तर नक्कीच बरं पडेल.

@UgtWorld



Related Posts