रेल्वे पास

अनोळखी रेल्वे पास वरील फोटोच्या प्रेमात गुढलेली प्रेमकहाणी

प्रास्ताविक

“अनोळखी रेल्वे पास वरील एका तरुणीच्या फोटोच्या प्रेमात पडलेला ऋषिकेश, व या निनामी प्रेमाकरिता त्या तरुणीचा तो पास त्या तरुणीपर्यंत पोहचवण्यासाठी त्याने केलेले पराकाष्ट व प्रेम सांगणारी ही प्रेमकथा, पण नक्की प्रेमकथाच ना?…रेल्वे पास

रेल्वे पास

ज्या कथेत मुलगा आणि मुलगी प्रामुख्याने असतात ती कथा प्रेमकथाच असावी असा गोड गैरसमज आपला होतोच तसाच काहीसा गोड गैरसमज ऋषिकेशचा सुद्धा झालेला.
“यात्रियों कृपया ध्यान दीजिए, प्लेटफॉर्म क्रमांक दो पर एक बजकर तीस मिनिट पे आने वाली लोकल रद्द कर दी गई है, यात्रियोंको होने वाली असुविधा के लिए हमे खेद है”

तशी गर्दी भरपूर होती स्टेशन वर आणि ऋषी नेहमीप्रमाणे त्याच्या दिड च्या लोकल ची वाट पाहत होता. पण अचानक रद्द झालेल्या या लोकलमुळे त्याला जाण्यास उशीर होणार होता. १:४३ची विरार फास्ट नुकतीच येतेय असं कळलं. माणसांचा अफाट घोळका त्या लोकल मध्ये सेकंदात चढला. तो नेहमीप्रमाणे लेडीज लगेज या डब्याच्या इथे उभा होता. गर्दी पाहून लोकल मध्ये चढण्याचं त्याचं धाडस तर झालं नाहीच शिवाय तेवढयात ती लोकल सुदधा सुटली. एका तरुणीने वाऱ्याच्या वेगात धावत ती चालती लोकल पकडली

“इतकं धाडस मी केलं असतं तर आत्ता ऑलम्पिक मध्ये नक्कीच सुवर्णपदकाचा मानकरी झालो असतो” हा त्याचा त्या वेळीचा बालिश विचार तात्काळ त्याला स्मितहास्य देऊन गेला. १ वाजून ४७ मिनिटांनी पुढची लोकल आली, तो त्या डब्ब्यात जाणार तितक्यात खाली एक रेल्वे पास पडलेला त्याला दिसला. त्याने आजू बाजूला पाहिलं आणि तो उचलला व त्याच्या लक्षात आलं की तो पास एका तरुणीचा आहे. जोरात लोकलचा हॉर्न वाजला नि तो आत शिरला. गर्दी होती, घाम होता आणि शिवाय सोबतीला रोजची लोकल मधली भांडणं! एअरफोनची सोबत ही त्याहूनही उत्तम म्हणून बोरिवली पर्यंत तो सुखरूप पोहचला.

रेल्वे पास

स्वतःचं काम आटपून संध्याकाळी ऋषी घरी परतला. हात पाय धुतले, फ्रेश होऊन मस्त चहा घेतला नि बॅग मधून अभ्यासाची पुस्तकं बाहेर काढताना तो अनोळखी पास सुद्धा त्यांसोबत बाहेर आला. ऋषी नकळत त्या पास आय-डी वरील फोटोस न्याहाळत होता. एक गोड स्माईल,गोऱ्या गालावर नाजूक खळी आणि निरागस डोळे!! असं वाटत होतं पाहतच राहावं त्या फोटो कडे. क्षणात संपूर्ण दिवसाचा शीण घालवलेला त्या निर्जीव पण तितकाच जिवंत असलेल्या तिच्या फोटो ने… निशा, निशा देशमुख नाव होतं त्या तरुणीचं. आणि गम्मत अशी की त्या पास वर आजचीच तारीख होती.

सोशल मीडिया वर ही सापडते का या शोधात त्याने फेसबुक आणि इंस्टाग्राम यांना प्रचंड त्रास दिला, पण ती काही सापडली नाही. त्याने आता मनाशी ठाम निश्चय केलेला की “कोणत्याही परिस्थितीत हिचा पास हिला परत करायचा”. का कुणास ठाऊक त्याने असं का केलं, ह्याचं त्याला स्वतःला ही नवल वाटत होतं. कारण एरवी कॉलेजचे असाईमेन्ट सुद्धा वेळेत न देणारा तो आता या अनोळखी निशाची मदत करण्यासाठी उत्सुक झालेला.

रेल्वे पास

दुसऱ्या दिवशी तीच वेळ १ वाजून ३० मिनिटं. त्या भयाण गर्दीत ऋषी तिला वेड्यासारखा शोधत होता, तिची वाट पाहत होता. “फोटोत सगळेच वेगळे दिसतात, हिचं सुद्धा असंच असेल तर? म्हणून ओळखता येत नाहीये का मला?” असे बरेच विचार त्याला सतावून गेले पण तिला शोधण्याचा वेडा नाद काही त्याचा सुटला नाही. रोज शोधायचा तो तिला. अगदी त्याच वेळी जाऊन तासंतास तिथे थांबायचा, पण नाहीच. तब्बल सहा दिवस पालटले. १:४३च्या लोकल मध्ये ऋषी त्या पास कडे एकटक बघत बसलेला. त्याचं कुठेच लक्ष नव्हतं. इतक्यात एका आवाजाने त्याला खुणावलं.

“एक्सक्युज मी, थोडं बाजूला सरकाल का?” वर न पाहताच तो बाजूला सरकला. ती जी कोणी होती ती त्याच्या बाजूला येऊन बसली. तो अजूनही त्या पास मध्येच गुंग होता
“इतकं का पाहताय तिला निरखुन?” त्याचं लक्ष वेधत त्याच्या बाजूला बसलेली ती त्याला म्हणाली.
“डोळे, डोळे पाहतोय मी तिचे” त्याने अडकत उत्तर दिलं. काही व्यक्ती फोटो मध्ये वेगळ्या आणि खऱ्या आयुष्यात वेगळ्या दिसतात हे त्या दिवशी त्याला पटलं. त्या तरुणीने त्याच्या हातातला पास हिसकावला तेव्हा त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. निशाच होती ती. तिच्या फोटो पेक्षाही सुंदर होती ती, पण इतक्या सहजा सहजी भेटेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं त्याला. मी तिला चोर वाटलो असेल म्हणून तर तिने पास हिसकावून नाही ना घेतला? या विचारात ऋषी ने तिला घडलेला प्रकार म्हणजे तिला शोधण्यासाठी केलेला आटापिटा, धडपड तो शब्दांच्या धडपडीत सांगत होता.
“अरे हो हो! जस्ट चिल, इतका का पॅनिक होतोस? हे घे पाणी पी आणि शांत हो” तिने बॉटल उघडून त्याला दिली व त्याच्याकडे बघून ती गोड हसली.
“हसतेस का तू?”
“अरे अनोळखी आहोत आपण, इतकं का स्पष्टीकरण द्यायचं, हो पण मला तुझा निरागस प्रामाणिकपणा पाहून हसू आलं. आणि थँक्स अ लॉट! चल बाय, माझं स्टेशन आलं मी निघते, टेक केअर” असं बोलून ती निघून गेली पण जाताजाता त्याला अनोळखी बोलून आपलंसं करून गेलेली ती.

ती परतावी अशी कधी त्याची इच्छा नव्हतीच आणि ती परतलीही नाही पण एक समाधानी हासू मात्र त्याच्याजवळ ती अलगत विसरून गेलेली..

-शायAr

Related Posts