अनोळखी ओळखीतून होणारी अनपेक्षित भेट!
खूप जोरात पाऊस पडत होता. विजा कडाडत होत्या, ढग आपले आवाज देत आरडाओरडा करत होते. त्यात रात्रीला सुरुवात होत आलेली, सगळं अंग भिजून गेलेलं, मोबाईल आणि पाकीट तेवढं मात्र भिजायचं राहिलं होतं, क्षणात तेही भिजतील असंच वाटत होतं. समोर ओळखीचा चहा वाला दिसला तिथे जाऊन थांबलो. त्याला म्हटलं एक कटिंग बनव गरम गरम मस्त आलं टाकून. 5 एक मिनिट नंतर तो बोलला हे घ्या साहेब. चहाचा एक घोट घशाखाली गेला तेव्हा किती बरं वाटलं, गारठलेल्या शरीराला एक हलकीशी ऊब मिळाली आतल्याआत. इतकं सगळं चालू असताना एक अनोळखी स्कूटी तिथे येऊन थांबली.
लांबसडक केस त्या हेल्मेट च्या बाहेरूनच दिसत होते, ते बांधलेले सुद्धा नव्हते. हेल्मेट काढला तिने त्यावेळी “वॉव” हलक्या स्वरात माझं मी मलाच उच्चारलं. किती मस्त वाटत होती ती खूपच सूंदर, तसंही भिजल्यावर मुलीचं रूप काही वेगळीच दिशा घेतं. तिचे पाणीदार डोळे त्या पावसातल्या सरीला टक्कर देत होते. नाक आपलं छोटसं पण तरतरीत. ओठ मात्र गुबगुबीत गुलाबी असे, लिपस्टिक सगळी गेली असणार त्या पावसात.
तिने पाहिलं, मी मान लगेच फिरवली आणि म्हटलं अजून एक कटिंग दे, तिच्यासाठी नव्हतं ते, माझ्यासाठीच होतं! ती आता बाजूला येऊन उभी राहिली होती,”एक कटिंग द्या”, असं त्याला बोलली. त्याने दोन कप भरले, एक मला दिलं आणि एक तिला दिलं. “थंडी जास्तच भरलीय वाटत अंगात!”, तोंडातल्या तोंडात ती अनोळखी मुुलगी बोलली.
पैसे द्यायला गेलो त्याला तर नेमकी १०० ची नोट होती, सुटे पैसेच नव्हते. आता काय करायचं, समोर मुलगी आणि त्यात इज्जतचा भाजीपाला होणार! बरं त्याने ही यायच्या अगोदरच एका माणसाला सुट्टे पैसे दिलेले, सांगितलं की सुट्टे पैसे संपलेत. खरं तर इतका विचार नको करायला होता आणि मुळात हे सगळे वायफळ विचार होते. तिने तर डायरेक्ट ५०० ची नोट दिली, बोलली सुट्टेच नाहीत जवळ! त्याने मला विचारलं, दादा तुमच्याकडे आहेत का सुट्टे, मी म्हटलं माझ्याकडे पण १०० आहे. इथे कुठे जवळ दुकान ही नाही का? की, आपल्याला सुट्टे मिळतील, ती त्याला विचारत होती. मी म्हटलं, इथे ना दुकानं लवकर बंद होतात. “जाऊद्या हो नंतर द्या पैसे. मी इथेच आहे आणि तसंही हे साहेब नेहमी येतातच, ते देतील पैसे.”, तो चहा वाला बोलला.
ती बोलते ते देतील हो तुमचे साहेब, माझं काय? मी या रस्त्याला सहसा येत नाही. “राहुद्या ओ, तुमच्यासारख्या सुंदर मुलींसाठी माझ्याकडून गिफ्ट!” “थँक् यु हा!” “मित्रा मला पण दे ना गिफ्ट यार, मी पण छान दिसतो, इतका काही वाईट नाही!” “दादा तुम्ही दोन कप प्यायलात ना, एक असता तर तुम्हाला पण गिफ्ट दिला असता.” अरे इतक्या वेळा पितो मी इथे चहा, अजून एकदाही मला असं गिफ्ट दिलं नाहीस.” ” तुला काही प्रॉब्लेम होतोय का, ते मला गिफ्ट देतात तर!” “मला काही प्रॉब्लेम नाही तसं, मी आपला सहज त्याच्याशी बोलतोय!” “तुमचं बोलणं चालू द्या मग, थँक् यु दादा चहासाठी!” असं बोलून ती निघणारच तितक्यात, ” ऎक ना तू त्या साईड ला चालली आहेस तर मला तिथवर सोडशील का?” ” हा ठीक आहे, सोडते चल.” “उद्या देतो रे तुझे पैसे.”
त्या भर पावसात ती गाडी चालवत होती आणि मी तिच्या मागे बॅक साईड च्या हँडल ला पकडून बसलेलो. तिने तरी जॅकेट घातलं होतं, मी मात्र असंच संपूर्ण भिजून गेलेलो. वाटलं नव्हतं जिची मी तारीफ केली काही वेळा पूर्वी तिच्याच स्कूटी च्या बॅक सीट वर बसलोय मी! मस्त वाटत होतं, भिजून तर गेलोच होतो, त्यात ती राईड तिच्यासोबत आहे, क्या बात है! “कुठे सोडू तुला सांग, मी इथून लेफ्ट ला जाणार आहे.” “मलाही लेफ्ट ला जायचं आहे, तिथे थोडं पुढे ‘खानपान हॉटेल’ आहे तिथे सोड. तिथून जवळ आहे माझं घर.” आता म्हटलं पोहचणार आपण आणि हिच्याशी परत बोलायला मिळेल की नाही ठाऊक नाही.
मी म्हटलं,”पुन्हा भेट मला अशी हेल्प करायला म्हणजे मला लिफ्ट द्यायला.” “नको, असं जर आपण भेटलो तर त्या चहावाल्याचं नुकसान होईल, सपाट होईल त्याच कामकाज अशी फ्री गिफ्टेड चहा प्यायला लागलो की!” “हाहा,ते तर आहेच पण नेहमी नेहमी पैसे जवळ नसतील अस नाहीच ना!” “हो, तू बोलतोय ते बरोबर आहे पण असं भेटण्याऐवजी बाहेर भेटू ना,जास्त मजा येईल.”
तिच्याकडून नुकतीच परमिशन मिळाली होती तिला पुन्हा भेटण्याची, खूप खुश झालो होतो त्यावेळी. तिने त्या हॉटेल जवळ सोडलं, हँडशेक केला आणि ‘पुन्हा भेटू’ असं बोलून निघून गेली. ती संध्याकाळ आणि सुरू होणारी रात्र, दोघीनींही छान कंपनी शोधून दिली…