गुंतागंतीच्या मनात पडली विचारांची भर
रिकाम्या मनात ज्या काही गोष्टी येत असतात, त्या नेहमीच बरोबर नसतात. त्यांच्या येण्यामागे अनेक विचार असतात, ज्यांच्यामुळे त्यांचं मन नेहमीच गुंतागुंतीत अडकलेलं असतं. न होणाऱ्या गोष्टी मनात जेव्हा येऊ लागतात तेव्हा मनात इतके निष्कर्ष तयार होत असतात, ज्यांच्यावर ताबा ठेवणं खरंच अवघड जातं. आणि मग त्यात अतिविचारांची वृष्टी होते.
मग मनाची चंचलता शिगेला पोहचते, भ्रम येऊन पुढ्यात बसतात आणि त्यात याचा आढावा घेण्यासाठी आपल्याकडे भीती असतेच. वेळेत सारं काही करावं असं होत नाही कधी, काही न काही मागे राहिलेलंच असतं. जेणेकरून पुढल्या त्या गोष्टींना जोडता यावं.
पुन्हा त्याच विचारांशी गाठभेट! म्हणजे याला काही शेवट नाही, असाच सगळे अर्थ लावतात, पण असं काही नसतं. प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच आणि सुरुवात देखील असते. आता ती सुरुवात कोणत्या गोष्टींची हवी याचं थोडंसं भान ठेवता आलं तर सोईस्करच आहे.
किमान नको त्या येणाऱ्या विचारांना थारा तरी मिळणार नाही. डोक्याला थोडा काळ शांतता आणि जीवाला आराम, क्षणिक का असेना! पुढे बघता येईल जे होणार असेल ते, आत्ताच पुढच्या गोष्टी रचून का म्हणून आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा.
रिकामं मन हे कोऱ्या पानासारखं असतं. आपले विचार हे एक प्रकारची शाई बनून बाहेर येत असतात. त्यामुळे आपण त्या कोऱ्या पानावर हवं तेच लिहावं, जे आपल्यासाठी चांगलं असेल. याचा अर्थ असा होत नाही की त्यात दुसऱ्याबद्दल वाईट विचार असेल. अर्थात चांगले विचार म्हटलं की दुसऱ्याचं वाईट होणं शक्यच नाही पण कधी कोणाबद्दलचा राग असतो जो लवकर गेलेला नसला की त्याच्याशी निगडित असलेले विचार जात नसतात.
म्हणून चांगल्या विचरसरणीची ओढ लागली तर आपल्याला हवी असलेली वाटचाल नक्कीच गाठता येते. थोडा धीर असावा काही कठीण बाबतीत कारण ते कठीण काहीही असू शकतं. त्यात परिस्थिती येऊ शकते, मानसिकता येऊ शकते आणि अर्थातच आपल्याला नको असलेल्या गोष्टीसुद्धा. मग तेव्हा मन कामात किंवा आपल्या आवडीत रमवून रिकामा वेळ भरून टाकायचा.