आपण नक्की समज देतो की समजून घेतो!
समज सध्या मग्न असेल कुठेतरी, बहुतेक तिला नको त्या गोष्टी मिळाल्या असतील. खास करून त्याच गोष्टी ज्या गैरसमजात बुडालेल्या असतात. मग त्या सर्वांचा एक सारासार विचार करून हे असं कसं झालं, ह्याची कारणं निष्पन्न करणार. ह्यात काही गोष्टी नव्हत्या त्या कुठून आल्या. मनात विचारांची एक ओळ नसावी पण आता शब्दांच्या रांगा तयार झाल्यात.
फक्त कोणीतरी जुना शब्द, जुनी आठवण किंवा जुना एखादा क्षण उकरून काढला. त्याच्या या एका गोष्टीमुळे सारं काही बदललं जाऊ शकतं. हे मात्र त्या क्षणाच्या, आठवणींच्या लक्षात आलं नसावं. आता असं मनात प्रश्न येत असणार की वस्तुंना, गोष्टींना मन देऊन, शब्दांचा आधार देऊन त्यांना नक्की काय साध्य करायचं आहे.
साध्य असं काही नाही, पण त्यामुळे एका गोष्टीत नक्कीच फरक पडेल ती म्हणजे आपली विचारसरणी. आपला दृष्टिकोन बदलू शकतो आणि गोष्टींकडे बघण्याची दृष्टी एकदा बदलली तर मग आपल्या आयुष्यात बराच फरक पडतो. निरर्थक समज आणि वायफळ गैरसमज निघून जातात. ते आपल्या जवळ सहसा टिकत नाहीत आणि ह्याने नक्कीच काही प्रमाणात का असेना, मनातील नको असलेल्या भावना दूर ठेवता येतात.
आयुष्यात फक्त सहज-सोपं मिळतं असं नसतं पण ते सरळ सोपं नक्कीच करता येऊ शकतं. आता ज्यांना आपली मानसिकता बदलण्याची इच्छाच नाही, ज्यांना स्वतःमध्ये बदल करायला कमीपणा वाटतो, ज्यांना ‘मी असं वागायला लागलो, तर कोण काय म्हणेल’, याची सतत भीती वाटते; त्यांना हे नाही करता येणार. या आधी तरी कोणाला काय वाटलं होतं का? नाही.
त्यामुळे ‘मनातील ते निरर्थक समज काढून टाका’. एका बदलत्या विचारसरणीमध्ये आणि एका फिरत्या चलबिचल मनामध्ये किंचितच फरक असतो. विचारांना उमेदेची दिशा हवी. खोट्या दिलास्याने फक्त निराशाच मिळू शकते, दुसरं काही नाही.