समजूत जवळ हवी किमान थोडीतरी…

समजूत काढता यायला हवी, प्रयत्न तरी असावा!

समजूत जवळ हवी किमान थोडीतरी…

मिळकत हवी सवलत हवी, श्वास घेण्यासाठी मोकळी हवा हवी. सगळं एका वाक्यात कसं जमणार? समजणार तरी कसं ते सगळं. स्पष्टीकरण नाही म्हणता येणार पण काही गोष्टी उलगडलेल्या बऱ्या ज्या मनाच्या कोठडीत कैद असतात. ज्यांची खरी जागा आपल्या मनात नसून या निसर्गात त्यांची जी कोणती जागा असेल तिथे आहे. त्या गोष्टी अशा आहेत ज्या स्वतःजवळ ठेवल्या तर स्वतःला त्रास करून घेण्यासारख्या असतात. पण ज्याच्याजवळ व्यक्तीच नसणार हे सगळं बोलायला ते काय करणार, कोणाशी बोलणार. सर्वाना कोणी ना कोणी सोबत असेलच असं नाही ना! असली तरी पूर्णतः मनाला मोकळीक देता येते असं नाही होत.

काही जण त्यांचं मन लिखाणातून व्यक्त करतात परंतु तेही घाबरतात कोणाला वाचायला देताना. कारण अर्थ असतो एक, त्याचे अर्थ काढतात अनेक. त्यानंतर होणारे मतभेद, तयार होणारी नवीन मतं आणि मग चर्चा जी असते मुद्दा विसरलेली. आणि त्याने न होणारी गोष्ट सुद्धा मनात येऊन घर करून जाते. मनाला हुरहूर लागून राहते असं होईल कि काय आता ?

एका त्रासलेल्या मनाला नेहमीच प्रेमाची गरज असते. एका मुक्या मनाला बोलीची जोड हवी असते. म्हणजेच एका बोलक्या मनाची सोबत फार आवश्यक असते. ज्याच्या सहवासात तो स्वतःला आपलसं समजून त्याचं मन मोकळं करू शकेल. त्यांनतर किमान इतकं तरी कळून येईल कि, नेमकं मनात काय चाललय किंवा काय त्रास होतोय मनाला. भावनिक किंवा मानसिक कोणतं प्रमुख कारण आहे जे कळून येऊ शकतं त्या सहवासात, त्या बोलचालीत.

सुरुवातीला ते थोडं अवघड वाटतं पण नंतर एकदा त्या मनाला शाश्वती झाली की त्यांनतर आपण मुक्तपणे आपलं मन मोकळं करू शकतो. पण अश्या बऱ्याच वेळेला विश्वासाचा प्रश्न समोर येतो कोणी आपल्या भावनांचा खेळ केला तर. कोणी आपलं मन पुन्हा दुखावलं तर. आधीच आपल्या मनाची अवस्था खराब आहे त्यात आणखी भर पडली तर परत त्या त्रासाला निमंत्रण जाणार. जे साहजिक आहे कोणालाही आवडणार नाही.

एक भीती मनात लागून राहिलेली असते. जिचं कारण याआधी विश्वासाची झालेली मोडतोड असू शकते किंवा बोललेल्या काही गुपित गोष्टी नको त्या व्यक्तीला कोणा दुसऱ्याकडून कळलेल्या असल्यामुळे सुद्धा असू शकतं. काही कारणं शब्दात स्पष्ट करता येत नाहीत आणि ती कदाचित मांडता पण येणार नाहीत. पुन्हा जर त्याचा अर्थ चुकीचा घेतला तर आणखी चलबिचल मनाची.

काही जण म्हणतात ना, एकदा झालेली गोष्ट पुन्हा होत नाही. आणि ती कदाचित होत ही नसेल. वेळ आणि अंदाज दोन पेहलू आहेत ज्यात वेळेचा अंदाज तर घेता येतो पण तो खरा असेल याची खात्री आपण देऊ शकत नाही. अंदाजानुसार वेळ बदलायला गेलो तर हवं तसं होतच अस नाही, पण ते पूर्णपणे चुकलेलं असतं असंही नाही. थोडं घोळ झाल्यासारखं वाटतं पण हे वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यात काही चुकीचं नाही कारण ते नैसर्गिक आहे.

आपली समजूत थोडीशी मजबूत असायला हवी, थोडासा दिलासा पण हवा जवळ ज्याची साथ थोडावेळ का असेना मन शांत करते. वेळेची संगत वेळ बदलते तिच्या वेळेनुसार. तिला तिच्या अंदाजावर विश्वास बसला की ती आपोआपच तिची वाट बदलते. अगदी गरजेच्या ठिकाणी आणि गरजेच्या वेळी. आणि तीच वेळ आपल्यासाठी असते एकदम योग्य.

@UgtWorld



Related Posts