सौ – अनेक अक्षारतील एक प्रेम कहाणी

कहाणी न जुळलेल्या जोडीची

सौ - अनेक अक्षारतील एक प्रेम कहाणी
सौ – अनेक अक्षारतील एक प्रेमकहाणी

मित्र जोड्या लावण्यात गुंग होते आणि मी मात्र माझ्या आयुष्याच्या शास्त्रीय कारणांमध्येच गुरफटून गेलेलो. माझ्या मनात एकच असा ढोबळ विचार होता की अशी जोडी मिळावी जी २५-३० शब्दात नाही तर मोठमोठ्या पेरेग्राफ मध्ये माझ्याच मनावर माझी प्रेम कहाणी लिहेल, १० ओळीत नसलं तरी चालेल पण मोजक्याच शब्दात तिचं स्वमत मनमोकळेपणाने मांडेल. पण जोड्या लावता लावता कधी एका शब्दातली उत्तरं एका वाक्यात झाली हे कळलंच नाही.

माझ्या प्रामाणिक मित्रांच करावं तितक कौतुक कमीच होत कारण त्यांनी पहिल्यांदा चुकीची जोडी चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी लावलेली. दांपट्टयानी शब्दांखालून नव्हे तर शब्दांव तिच्यावर लाईन मारली आणि मारता मारता कधी तिच्या शब्दांनी येऊन आमची….. राहूदे! मी माझी बाजू सावरत होतो. वाक्यांमधल्या रिकाम्या जागेत ती नेमका चुकीचा शब्द ओळखून आम्हाला सुनावत होती. फरक स्पष्ट होता तिच्यात नि माझ्यात, मोजक्याच शब्दात तिने तिचं स्वमत मांडलेलं आणि माझ्या प्रत्येक शब्दाला वाक्याला तिने पूर्णविराम लावलेला.

ती तात्पुरती तिथून निघून गेली आणि मित्र मात्र तिने त्यांच्यावर झाडलेल्या वाक्यप्रचारांचे अर्थ मला विचारत होते… लाज ? अर्थात नव्हतीच. पण तिला दुखावून मला वाईट वाटत होतं.. रात्री प्रेम, प्रेयसी, साखरपुढा, लग्न या शब्दांतून हृदयाच्या गटात न बसणारा शब्द शोधत होतो मात्र सगळे शब्द अचूक होते. मग शेवटी एकच निश्चय ध्यानी मनी बाळगला तो म्हणजे तिच्या रुसाव्या फुगव्याचा सहसंबंध प्रेमाशी जोडून तिला कायमचं आपलंसं करावं.

दोस्तांनी ती कुठे राहते, काय करते ह्या सगळ्या टिपा मला दिल्या पण महत्वाची टीप द्यायला विसरले कधी न्हवे ते तिला पत्र लिहायचे ठरवले, माफी पत्र! आणि ते मुद्देसुत लिहिलं सुद्धा पण स्वतःच्या नावाएवजी सवयीप्रमाणे ‘क-ख-ग’च लिहिलं. तिच्यापर्यंत पत्र पोहचवणार कोण? अशा वेळी मित्रांवर विश्वास ठेवू की नको या विरुद्ध विचारांत होतो तेवढ्यात एका दोस्ताने पुढाकार घेतला. पत्र पोहोचलं आणि प्रत्युत्तर सुद्धा आलं. सर्वप्रथम तिने व्याकरणाच्या चुकाच काढल्या आणि क्षणात मला माझ्या अज्ञानाची जाणीव करून दिली.

तिने आम्हा सगळ्यांना शेवटची संधी देऊन माफ केलेलं पण खाली स्वतःची ओळख “आपली विश्वासू सौ अ.ब.क” अशी लिहिलेली आणि हे वाचून माझ्या मनाची अवस्था परीक्षेत कोणी उत्तर सांगत नसल्यावर जी अवस्था होते अगदी तशी झालेली. एकंदरीत तिच्या स्वभावाच्या आणि परिस्थितीच्या गटात न बसणाराच होतो मी पण पेपर तर पूर्ण लिहिलेला मग मार्क गेले कुठे या निरागस विचारात होतो. तिला विचारून बघावं का? तर नको, अजून मार्क जाण्याची दाट शक्यता मग मीच लहानपणी उत्तरपत्रिकेच्या शेवटी अगदी प्रेमाने समाप्त लिहिणाऱ्या मुला प्रमाणे या प्रेमकहाणीला समाप्त लावला नि मित्रांना माझी एका सौ या अक्षरातली प्रेम कहाणी काय होती हे सविस्तर उत्तरातून सांगण्याच्या प्रयत्नात मग्न झालो.

-शायAr

Related Posts