रात्रीच्या झोपेत झालेला तो भयाण स्पर्श

काही स्पर्श शब्दात किंवा अनुभवात कुठेही मांडता येत नाही…

रात्रीच्या झोपेत झालेला तो भयाण स्पर्श

मध्य रात्रीची वेळ सरून गेलेली, घड्याळाचे काटे आवाज करत पुढे सरकत होते इतकी शांतता पसरलेली. आणि त्यात वारा आजूबाजूने फिरत होता नको नको ते आवाज काढत. हॉल मधली खिडकी अचानक चमकलेली दिसत होती त्या समोरच्या बिल्डिंगच्या लाइट मुळे. त्या खिडकीत वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिसत होते. हवेचा स्पर्श होऊन हलत डुलत होते. भीतीत कळतच नव्हते कि त्या फक्त झाडाच्या फांद्या आहेत कारण त्यातहि कधी न दिसणारे आकार दिसत होते जस कि ते आपल्यालाच बघत आहेत आणि कुठल्याही क्षणाला येऊन भेटतील. समोर बेड वर पण कुणी नव्हतं झोपलं आणि बेड रूम पण बंद होता. त्यात मोरीतून पाण्याचा आवाज येत होता. नळ घट्ट बंद केलेला असूनही तो टप टप आवाज करत होता जणू त्यालाही आज गाण्याची हौस झाली असावी.

अंगावरची चादर हळूच डोक्यावर ओढून घेतली मात्र डोळे आणि कान जागेचं होते. ते झोपतील तरी कसे त्यांना इतक काही दिसलं होत आणि त्या निरनिराळ्या आवाजामुळे जे ओळखीचे असून अनोळखी झालेले आवाज, आता ते नेमकं काय यांच्यात ते अडकले होते आणि त्यांनी मनालाही अडकवून टाकलं होतं. घसा आता कोरडा पडत चालला होता. कसबसं हिम्मत करून डोक्यावरची चादर खाली सारून इकडे तिकडे पाहिलं हॉल एकदम भयानक वाटत होता पण आता घट्ट मन करून किचन कडे पाऊले वळवली. फ्रिज उघडला पाणी घेतलं आणि मागे सरलो कारण समोर पुन्हा किचन च्या खिडकीत तशेच काही आकार दिसत होते.

एक घोट घेऊन इकडे तिकडे बघत पुन्हा दुसरा घोट असं हळू हळू पाणी घशाखाली जात होत. मागे सरकत असताना टेबलला पाय लागला आणि अंगावर काटाच आला. अचानक झालेला तो जोराचा स्पर्श हा टेबलचाच आहे हे ओळखायला काही वेळ गेला. आता त्याच टेबलवर बसून गटागट पाणी प्यालो. आता त्याचा आवाज येणार नाही असं होऊच शकत नाही. त्या क्षणी तरी, हो पाणी पितानाचा सुद्धा आवाज येत होता. घश्यातुन जेव्हा ते पोटात उतरत होत तेव्हाचा तो आवाज येत होता.

आता पुन्हा वाटचाल करत त्या मधल्या पॅसेज मधून हॉलकडे येत असताना मोरीकडे वळलो आणि तो नळ एकदाचा बंद केला. बंद तर केला नळ पण आता वाऱ्याच काय? कारण नळाच्या पाण्याचा आवाज तर बंद झाला होता या वाऱ्याचा आवाज कसा बंद करायचा. बिल्डिंगला अटॅच असलेल्या पाइपमधून तो ये जा करत होता आणि नको नको ते आवाज काढत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा अंथरुणात घुसलो. यावेळी चादर सरळ डोक्यावरून घेतली होती आणि त्यात थंडीमुळे पंखा बंद केलेला.

पोटावर झोपलेलं असताना अचानक पाठीवर कसला तरी स्पर्श झाला जस की कुणीतरी आपल्या पाठीवरून हळू हळू हात फिरवत आहे. आता शरीराचा थरकाप होत होता हातपाय कापू लागलेले त्या अनोख्या स्पर्शाने. चादर अजून वर खेचत गुडपुन घेतलं पण नेमके तळपाय मोकळे झाले. आता पाठीवरचा स्पर्श जाणवत नव्हता त्याची हालचाल बंद झाल्यासारखी वाटत होती. तर दुसऱ्याच क्षणी पायांना बर्फासारखा थंडगार स्पर्श झाला, त्या स्पर्शाचं वर्णन करावं तरी कस एका क्षणी मऊ तर एका क्षणी रफ होता तो.

पण त्याचा थंडपना काही जात नव्हता. काय करावं काय नाही असं चाललं होत मला, पाय चादरीत घ्यायचे होते पण कुणीतरी ते पकडून ठेवलेले असंच वाटत होत. कारणं कितीही ताकद लावून देखील मला माझ शरीर हलवता येत नव्हतं. ते तिथल्या तिथं जगडून गेलं होत बर्फ गोठतो ना तसंच अगदी. डोळे उघडण्याची हिम्मत तरी कशी होईल यावेळी पण ते उघडण्यासाठी माझी धडपड चालू होती. माझ्या संपूर्ण शरीरावर माझा ताबाच नव्हता अजिबात हलता येत नव्हतं. शेवटी अंग मोकळं झाल्यासारखं वाटलं पटकन पाय आत घेतले आणि स्वतःला त्या चादरीत कोंडून घेतलं. कारण त्या क्षणी तरी ती चादर माझं संरक्षण करत होती जस ढाल लढाईत करते त्याप्रमाणेच त्यामुळे तिच्यातून बाहेर निघायची हिम्मत तरी होत नव्हती.

त्या उठाठेवीत झोप कधी लागली कळलंच नाही सकाळी फोन वाजला त्याच्या आवाजाने जाग आली. रात्रीचा तो प्रसंग आठवण्याचं धाडस होतच नव्हतं. होईल तरी कस अवस्थाच अशी झाली कि आठवण काढताच अंगावर काटा येत होता. तो स्पर्श बापरे ! इतका थंड, आजपर्यंत इतका थंड स्पर्श कुणाचा झाला नव्हता. आणि त्या गार वाऱ्याची झुळुक सतत त्या पायांना भासत होती त्या प्रत्येक स्पर्शानंतर. एक वेगळाच अनुभव त्या रात्रीचा कायमचा लक्षात राहील असाच होता. बरं ते स्वप्न असं मानून पण ते जात नव्हतं कारण काही स्वप्नातला स्पर्श खरा खुऱ्या स्पर्शाला सुद्धा लाजवेल असा असतो. इथे ते घडलेलं, एक स्वप्न नाहीच हे मन पक्क करून बसलं आहे. काही स्पर्श वेगळंच अगदी वेगळंच स्थान करून जातात. कायमच आपल्यासोबत राहण्यासाठी आणि आपल्याचसाठी…

@UgtWorld

Related Posts