सुटकेचा प्रवास

एक प्रवास जगण्यापासून मरणापर्यंत

प्रास्ताविक-‘सुटकेचा प्रवास’ या लघुकथेत Lockdown च्या काळात स्थानिक मजुरांची आणि कामगारांची झालेली दुरावस्था एका व्याकुळ प्रसंगावरून व्यक्त केली आहे.

सुटकेचा प्रवास
सुटकेचा प्रवास

“बहुत थकान सी महसूस हो रही है भाई, तनिक रुकते है थोडा।”
“अभी और चलना है, यही रुक जाएगा तो कैसा चलेगा।” “भाईसाब कह रहे है वो ठीक है, हमे अभी रुकना चाहिये, लल्ले ने अभी तक कुछ भी नही खाया है।”

जमनाच्या बोलण्याला होकार देत त्यांनी तिथेच थांबण्याचा निश्चिय केला. रंजीव आणि गोपाल हे दोघे सख्खे मित्र तर जमना ही गोपालची बायको होती. त्यांच्या सोबत यांच्या सारखेच अजून काही वाटसरू प्रवासात त्यांच्या सोबत होते. सगळ्यांना थांबणं शक्य नव्हतं म्हणून काही जण थांबले तर काही जण चालतच राहिले.

“हम रुक तो गए लेकिन खायेंगे क्या?” गोपाल ने जमनाला प्रश्न केला. ती काहीच बोलली नाही.

तिने आपल्या सोबत असलेल्या सामानातून एक छोटं लाल गाठूडं काढलं. त्यात काही शिळ्या चपात्या होत्या त्या तिने पुढे केल्या

“चलो भाई आज भी इसी से काम चलाना पडेगा!” असं बोलून रंजीव ने चपातीचा एक तुकडा मोडला.

“नाही तो क्या रोज कौनसा फाइव स्टार होटल में खाना खाता है हम?” असे तात्काळ थकवा दूर करणारे विनोद करून गोपाल आणि जमना यांनी सुद्धा जेवायला घेतले. जेवता जेवता त्यांचे लहानगे तीन महिन्याचे बाळ अचानक रडू लागले. बहुदा त्याला ही भूक लागली असावी. “मैं लल्ला को दूध पिलाकर आती हूं, आप खाना खाइये” अस बोलून जमना एक झाडाच्या आडोश्याला जाऊन तिच्या लहानग्याला ती दूध पाजू लागली.

रात्रीचे १२ वाजलेले आणि त्या रस्त्यावर आता सुन्न काळोख पसरलेला कुठेतरी थांबून विश्रांती घ्यावी, उद्या सकाळी उठून पुन्हा चालावं असे विचार सगळ्यांच्याच थकलेल्या मनात येत होते. पण थांबावं कुठे? हा प्रश्न सतत घिरट्या घालत होता. तेव्हा त्यांच्यातल्या एक वाटसरूने एक जागा शोधली. माणसांचा इतका वावर नव्हता आणि बघायला गेलं तर शांतता देखील होती.

सुटकेचा प्रवास
सुटकेचा प्रवास

इथे काही धोका नाही असं मानून त्यांनी तिथे विश्रांती घायचे ठरवले. त्यांनी सोबत असलेली गाठूडी डोक्याखाली धरली आणि विसाव्याचा श्वास सोडला. असं म्हणतात की दिवसभर मेहनत केली की रात्री खूप सुखावणारी झोप लागते आणि त्यांचंही तसच झालं. गोपालला काही केल्या झोप लागत नव्हती. त्याला डोकं टेकवायला कोणताच आधार नव्हता. तो रात्रभर तळमळत होता. आज जर झोपलो नाही तर उद्या चालता येणार नाही असं मनात आणून तो झोपण्याचे अतोनात प्रयत्न करत होता. शेवटी वैतागून त्याने एक फेरफटका मारायचे ठरवले.

फेरफटका मारताना त्याला त्याच्या सुखी संसाराची स्वप्न दिसू लागली. आज आपल्यावर ओढवलेली परिस्थिती ही काही क्षणांची आहे, नक्कीच सुखाचे दिवस येतील, माझा मुलगा होईल, माझं नाव काढेल, त्याच्या नशिबात ही दारिद्र्यता येता कामा नये हे सर्व विचार त्याच्या मनात पुन्हा खंबीरपणे चालण्याची उमेद देऊ लागले. विचारांमध्ये सैर फिरताना त्याला शेवटी डोकं टेकवण्यासाठी एक जागा मिळाली. तो खुश झाला. नुकत्याच पाहिलेल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्याने डोळे बंद केले त्याला सुखाची झोप सुद्धा लागली…

आणि काहीकाळाने त्या रुळावरून स्वप्नांची स्तब्धता तोडणारी गाडी गेली…

— ललित चंद्रकांत सुतार

Related Posts